Total Pageviews

Tuesday, 6 September 2011

JAILS IN INDIA

अण्णा हजारे यांनी २८ ऑगस्ट रोजी आपले बारा दिवसांचे उपोषण सोडल्यानंतर त्यांना दिल्लीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून डिस्चार्ज घेतल्यानंतर ते आपल्या गावी रवाना झाले. जेल दिल्लीतील बारा दिवसांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातील आपले अनुभव राळेगणसिद्धी येथील जाहीर सभेत आपल्या समर्थकांना कथन करताना अण्णा म्हणाले, ‘‘उपोषण सुरू करण्यापूर्वीच दिल्ली पोलिसांनी मला उचलले आणि तिहार जेलमध्ये टाकले, परंतु जेलमध्ये जाणे हे मी भूषण मानतो. कधी कुणावर कसा प्रसंग येईल हे सांगता येणार नाही. त्यासाठी या देशातील प्रत्येक नागरिकाने एक ना एक दिवस जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. भ्रष्टाचारविरोधात जेल भरो आंदोलन सुरू केले पाहिजे. जेलमध्ये दोन वेळ जेवणाची एक वेळच्या नाश्त्याची उत्तम सोय आहे!’’ अण्णा म्हणतात ते बरोबर आहे. जेलमध्ये अलीकडे उत्तम दर्जाचा आहार दिला जात आहे. खाण्याची तेथे बिल्कुल आबाळ नाही, परंतु तेथे जेवण किती वाजता दिले जाते? जेलमधील व्यवस्थेचे काय? अण्णांना राजकीय कैदी म्हणून व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यात आली, पण सामान्य कैद्यांचे काय? सामान्य कैद्यांना जेलमध्ये काय सुविधा आहेत? महाराष्ट्रात आज ३२ कारागृहे आहेत, परंतु कारागृहाच्या क्षमतेपेक्षा त्या ठिकाणी दुप्पट-तिप्पट आरोपी आज कोंबले जात आहेत. आर्थर रोड असो, ठाणे असो अथवा येरवडा असो. या जेलमध्ये कैदी एकमेकांच्या अंगावर झोपत आहेत इतकी तेथील दारुण परिस्थिती आहे. ज्यांच्याकडे मसल पॉवर आहे ते गुंड आपल्या दहशतीच्या जोरावर आपल्या हस्तकांमार्फत हव्या तशा मोक्याच्या जागा बळकावतात. अशा वेळेला तेथील असहाय कारागृह अधिकारी कर्मचारीही काही करू शकत नाही. कारागृह अधिकारी कर्मचारी संघटित टोळ्यांच्या गुंडांना वचकूनच असतात. त्यामुळे कारागृहात संघटित नसलेल्या सामान्य कैद्यांकडून बडे गुंड कपडे धुणे, मॉलिश करून घेणे आदी कामे कारागृहात करून घेतात. अगदी लैंगिक शोषणही करतात. त्यामुळे या कारागृहांना सुधारगृह म्हणणेच चुकीचे आहे.जेलमध्ये एखादा बडा व्यापारी गेला आणि त्याला संघटित गुंड टोळ्यांमध्ये ठेवले तर गुंड तेथेच त्याच्याकडून खंडणीची मागणी करतात आणि हवालामार्फत ती वसूल करतात. कारागृहात गेलेली व्यक्ती सुधारण्याऐवजी अधिक बिघडते. याला जेलमधील वातावरणच कारणीभूत आहे. जेलमध्ये जर योग्य सुविधा दिल्या, नीट व्यवस्थापन केले तर सारे देशवासीय भ्रष्टाचाराच्या विरोधात जेलमध्ये जाण्यास तयार आहेत, परंतु शासनाचे जेल व्यवस्थापनाकडे कमालीचे दुर्लक्ष आहे. वर्षानुवर्षे कोणताही अपराध नसताना आज हजारो निरपराध लोक जेलमध्ये सडत आहेत. आपल्याकडे न्यायनिवाडा लवकर होत नसल्याने निरपराध लोकांना जेलमध्ये नाहक मरणयातना भोगाव्या लागत आहेत.जेलमध्ये दाऊद, अरुण गवळी, छोटा राजन आदी टोळ्यांचे गुंड असतात. आज याच टोळ्यांची जेलमध्ये चलती असते. एकदा जेलमध्ये गेलेली व्यक्ती सहसा लवकर बाहेर येत नाही. जेल म्हणजेडंम्पिंग पॉइंट’ झाले आहेत. बॉम्बस्फोट घडविणार्‍या अतिरेक्यांचीही जेलमध्ये एकी आहे. ही एकी मात्र आपल्या देशाच्या मुळावर आली आहे. जेलमध्येच आजकाल बॉम्बस्फोटाची कटकारस्थाने रचली जातात, परंतु पोलिसांना जेलमध्ये जाऊन (कोर्टाच्या परवानगीशिवाय) चौकशी करण्याचा अधिकार नसल्याने पोलिसांना अलीकडील बॉम्बस्फोट मालिकांवर प्रकाश पाडणे कठीण झाले आहे.बॉम्बस्फोट घडविणारे अतिरेकी इतके पुढे गेले आहेत की, आता त्यांनी आपणास मांसाहारी जेवण नियमित मिळावे अशी मागणी केली आहे. जेलमधील आरोपींना चांगला आहार मिळावा, चांगली वागणूक मिळावी, प्राथमिक सुविधा मिळाव्यात याबद्दल कुणाचे दुमत नाही, परंतु तेथे बॉम्बस्फोटातील आघाडीच्या आरोपींची प्रचंड दहशत आहे, तर कारण नसताना आज निरपराध लोक वर्षानुवर्षे खटला सुरू होत नसल्यामुळे कारागृहात जीव मुठीत घेऊन नाहक सडत आहेत. त्याबद्दल शासनाने आता गंभीर होणे आवश्यक आहे. खटले लवकर मार्गी लावण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. जेलमध्ये जागा नसताना तुम्ही त्या ठिकाणी वर्षानुवर्षे जादा आरोपी कसे काय कोंबता? त्यांची मानसिक, शारीरिक छळणूक का करता? खतरनाक गुंडांऐवजी तेथे आज सामान्य आरोपीच मोठ्या प्रमाणात भरडले जात आहेत. संघटित गुंडांना जेल म्हणजे आश्रयस्थान झाले आहे. तेथूनच ते गुन्हेगारी सूत्रे हलवितात. परंतु चुकून आपल्या हातून अपराध घडलेल्यांना जेलमध्ये छळले जाते हे कुठेतरी थांबले पाहिजे. जेलमध्ये सुधारणा होणे गरजेचे आहे. २जी स्पेक्ट्रम राष्ट्रकुल स्पर्धेतील घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय मंत्री, खासदार आदी महत्त्वाच्या व्यक्ती जेलमध्ये आहेत. त्यांची तेथे बडदास्त ठेवली जाते. आता अमर सिंह, अशोक अर्गल, फग्गन कुलस्ते, महावीर भगोडा यावोट फॉर कॅश’ स्कॅममध्ये अडकलेल्या आजी-माजी खासदारांची विशेष काळजी घेतली जाईल. परंतु जेलमध्ये संघटित नसलेल्या सामान्य आरोपींचे काही खरे नसते ही वस्तुस्थिती माणुसकीस काळिमा फासणारी आहे.- प्रभाकर पवार

No comments:

Post a Comment