Total Pageviews

Friday 23 September 2011

SECURITY WORKERS

कल्याण, शहाड, तळोजा येथील औद्योगिक कारखान्यांमध्येही कामगारांच्या, मालमत्तेच्या सुरक्षिततेबाबत आणि देखभालीबाबत कमालीची बेफिकिरी दिसून येते. तपासणी यंत्रणांचा धाक कमी झाला आहे की, त्यांना ‘मॅनेज’ करणे सोपे झाले आहे, या प्रश्नांची उत्तरेदेखील कामगारांना आणि जनतेला ठाऊक झाली आहेत.
रासायनिक प्रक्रिया करणा-या कारखान्यांमध्ये हलगर्जी दाखविल्यावर केवढी भीषण आपत्ती ओढवू शकते, याचा दारुण अनुभव भोपाळ वायू दुर्घटनेतून देशवासीयांना आला. वायुगळतीमुळे शेकडो नागरिकांचे प्राण गेले तर त्याहून कितीतरी लोक अधू, अपंग झाले. सव्वीस वर्षापूर्वीच्या घटनेची दाहकता भोपाळमधील अनेक घरांना अजून जाणवते. अशा आपत्तीनंतरही रासायनिक कारखाने किती सुरक्षितता अवलंबतात याची पाहणी केली तर बेपर्वाईच बघायला मिळते. डोंबिवली आणि बोईसरजवळील तारापूरच्या कारखान्यात नुकतेच झालेले अपघात त्याचीच साक्ष देतात. डोंबिवली औद्योगिक वसाहतीमध्ये कापडावर रासायनिक रंग प्रक्रिया करणा-या विनायक टेक्स्टाइल प्रोसेसिंग कारखान्यात बॉयलरचा स्फोट होऊन कारखान्याला आग लागली आणि चार कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. अग्निशामक दलाची मदत पोहोचण्यापूर्वीच गावकरी धावून गेल्याने पन्नासवर कामगार वाचले अन्यथा अनर्थ घडला असता. तारापूरच्या सिक्वेन्ट सायंटिफिक कंपनीत झालेल्या वायुगळतीची घटना विस्मरणात जाण्याआधीच डोंबिवलीत ही दुर्घटना घडली. दोन्ही घटनांना तेथील वरिष्ठांची बेफिकिरी आणि हलगर्जी कारणीभूत असल्याचे प्रारंभिक तपासात दिसून आले आहे. जुनाट सुरक्षा यंत्रणा, अग्निशमन सामग्रीची उणीव, बेपर्वा सुरक्षाधिकारी ही तर आपल्याकडील बहुतेक कारखानदारीची व्यवच्छेदक लक्षणे झाली आहेत. बोईसर औद्योगिक वसाहतीत पाचशेवर रासायनिक कारखाने अस्तित्वात आहेत. त्यातले बहुतांश उद्योग सुरक्षिततेच्या बाबतीत धोकादायक याच वर्गात मोडतात. सर्वच औद्योगिक कारखान्यांतील सुरक्षा यंत्रणांची दर तीन महिन्यांनी तपासणी करण्याचे बंधन आहे, परंतु त्याचे पालन होत नाही. सिक्वेन्ट कारखान्यातील सुरक्षेचीसुद्धा गेल्या वर्षभरात तपासणी झाली नव्हती, असे कामगार राज्यमंत्री राजेंद्र गावित यांनी येथे भेट दिल्यावर उघडकीस आले. त्याला जबाबदार असणाऱ्या प्रत्येकावर कारवाई करण्याचे आदेश दिले, पण बैल गेला आणि झोपा केला यातली ही गोष्ट झाली. वैयक्तिक स्वास्थ्य असो की सामाजिक, आपण प्रतिबंधात्मक उपायांबाबत एवढे बेफिकीर असतो की मोठा आघात झाल्यावरच त्याचे महत्त्व पटू लागते. डोंबिवली, बोईसर परिसरातच ही स्थिती आहे, असे नाही. कल्याण, शहाड, तळोजा येथील औद्योगिक कारखान्यांमध्येही कामगारांच्या, मालमत्तेच्या सुरक्षिततेबाबत आणि देखभालीबाबत कमालीची बेफिकिरी दिसून येते. तपासणी यंत्रणांचा धाक कमी झाला आहे की, त्यांना मॅनेजकरणे सोपे झाले आहे, या प्रश्नांची उत्तरेदेखील कामगारांना आणि जनतेला ठाऊक झाली आहेत

No comments:

Post a Comment