ओ साहेब जरा बॅग तपासू द्या... आज स्पेशल चेकिंग आहे... असे म्हणत पुढच्या वेळी तुम्हाला एखाद्या पोलिसाने अडवले तर खात्री करून घ्या की तो खरोखरचा पोलीस आहे की खोटा. कारण बनावट पोलिसांना प्रशिक्षण देऊन गोलमाल करणारी शाळाच एका अट्टल गुन्हेगाराने चालवली आहे.
रॉयल एडवर्ड सिक्वेरा असे याचे नाव असून तो वसई येथे राहतो आहे. रॉयलवर खुनाचाही आरोप आहे. त्याच्या अड्डयावर छापा घातला तेव्हा ख-याखु-या पोलिसांनाही विश्वास बसेना अशी डिक्टो पोलिसांची टोळी त्यांच्या हाती लागली. या बनावट पोलिसांचा जरा सुद्धा संशय येऊ नये म्हणून चांगलीच तयारी ठेवण्यात आली होती. या छाप्यात पोलीस गणवेश, ओळखपत्रे, आयपीएस अधिका-यांचा गणवेश, हत्यारे असा ऐवज मिळाला.
रॉयल, विद्यार्थ्याची निवड काळजीपूर्वक करीत असे. ते खरेखरे पोलीस वाटतील असे प्रशिक्षण त्यांना देत असे. पोलीस बोलतात कसे, त्यांची देहबोली कशी असते, त्यांची खाण्याची ठिकाणे कोणती, कोणते शब्द त्यांच्या बोलण्यात वारंवार येतात अशा अनेक बाबी तो विद्यार्थ्याना शिकवत असे. मुख्य म्हणजे त्यांना मराठी भाषा नीट शिकवली जात असे.
एखाद्या विद्यार्थ्याने एखाद्या दिवशी दाढी केलेली नसेल तर तो त्याला दम देत असे, कारण दाढी न करता पोलीस कधीही कामावर येत नाहीत असे तो त्यांना सांगे.
एकदा विद्यार्थी तयार झाला की, त्याला, सर्व प्रथम, महिलांना फसवून त्यांच्याकडचे दागिने काढून घेण्याची कामगिरी सोपवली जाई. यात यश मिळाले की, त्याला बढती दिली जाई. यामध्ये खंडणी उकळणे ते प्रसंगी खुन करणे अशा कामांचा समावेश असे. अशाच एका जवाहि-याला लुटायला जात असताना त्यांना अटक करण्यात आली.
मुख्य म्हणजे स्वत: रॉयल अत्यंत कडक पोलीस अधिकारी वाटे. तो कधीही गबाळा राहत नसे. हे प्रकरणे उघडकीस आणणारे ज्येष्ठ पोलीस निरीक्षक, प्रफुल भोसले म्हणाले की, ही शाळा बघून आम्हीही बुचकळयात पडलो.
त्याच्या साथीदारांनाही पोलिसांनी अटक केली असली तरी पोलिसांनी नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे. कोणत्या पोलीसाचा कधीही संशय आला तर त्याचे ओळखपत्र तपासा. मुख्य म्हणजे स्थानिक पोलीस स्टेशनचा फोन क्रमांक मोबाईलमध्ये ठेवा म्हणजे तेथे खातरजमा करता येईल
No comments:
Post a Comment