देशाच्या अब्रूचे धिंडवडे
ऐक्य समूह
Tuesday, September 20, 2011 AT 12:31 AM (IST)
Tags: lolak
अवघ्या सहा महिन्यांपूर्वी मुंबईत विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाने, इंग्लंडच्या दौऱ्यात देशाच्या क्रिकेट खेळाच्या अब्रूंचे धिंडवडे काढले. तब्बल दोन महिने पंचतारांकित हॉटेलात राजेशाही थाटात राहिलेले या संघातले, फक्त पैसे मिळवायला सोकावलेले खेळाडू पराभवाचे डांबर तोंडाला फासून घेत मायदेशी परततील. इंग्लंडच्या दोन महिन्याच्या दौऱ्यात चार कसोटी, पाच एकदिवसीय सामने आणि एक 20-ट्वेंटी अशा दहा सामन्यातला एकही सामना या जोश नसलेल्या खेळाडूंना जिंकता आला नाही. लॉर्डसच्या पहिल्या कसोटी सामन्यातच 150 धावांनी पराभूत झालेल्या कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या संघातले खेळाडू एकापाठोपाठ एक जखमी व्हायला लागले. ते जखमी झाले, हे सारे झूठ आहे. मुळातच इंग्लंडच्या दौऱ्यावर जाण्याइतकी त्यांची शारीरिक आणि मानसिक क्षमताही नव्हती. पण एका सामन्यामागे एका दौऱ्यात पंचवीस तीस लाख रुपये मिळणार असल्याने, धोनीसकट सारेच खेळाडू इंग्लंडच्या दौऱ्यावर गेले. पहिला कसोटी सामना हरल्यावरही या बेशरम खेळाडूंनी पुढच्या कसोटीतही काही जिगरबाजीचा खेळ केला नाही. इंग्लंडच्या समालोचकांनी गाढव, कुत्री, डुक्कर अशा शब्दात त्यांची टिंगलटवाळी केल्यावरही त्यांना काही राग आला नाही. तुम्ही आम्हाला कुत्री म्हणा, गाढव म्हणा, आमचा संबंध फक्त पैशाशीच! शून्य धावा काढल्या काय आणि शंभर धावा काढल्या काय? आमचे मानधन आम्हाला मिळाल्याशी कारण! असा या खेळाडूंचा खाक्या असल्याने, त्यांच्यावर या शिवीगाळीचा काहीही परिणाम झाला नाही. उलट त्यानंतरही गचाळ खेळाचे प्रदर्शन घडवीत त्यांनी भारतीय क्रिकेटची उरली सुरली अब्रूही इंग्लंडच्या मातीत गाडून टाकली.
एकदिवसीय सामन्यांचे विश्वचषकपद जिंकणाऱ्या या भारतीय संघाला इंग्लंडमध्ये पाच पैकी एकही सामना जिंकता आला नाही. धोनीने कधी गोलंदाज्यांवर तर कधी फलंदाज्यांवर तर कधी धावपट्टीवर पराभवाचे खापर फोडले. पण त्याच्या संघातले दहा खेळाडू जखमी-जायबंदी होते. मुळातच इंग्लंडच्या दौऱ्यावर गेलेला हा संघ विजय मिळवायच्या ईर्षेने गेलेलाच नव्हता. आपण जखमी असल्याने, आपली निवड होऊ नये, असे एकाही खेळाडूने निवड समितीला सांगितले नाही आणि फक्त लाखो रुपये मानधन घेऊन संघ-संघातल्या खेळाडूंची निवड करणाऱ्या निवड समितीलाही जखमी-अपात्र खेळाडूंची निवड करताना कशाचीही फिकीर नव्हती. इंग्लंडच्या दौऱ्यावर भारतीय क्रिकेट संघ पाठविणे एवढेच क्रिकेट नियामक मंडळाचे धोरण होते. परिणामी नियामक मंडळाच्या निवड समितीच्या आणि खेळाडूंच्याही अब्रूच्या चिंध्या इंग्लंडमधल्या वृत्तवाहिन्या, क्रीडा समीक्षक आणि वृत्तपत्रांनी केल्या.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार कपिल देव यांनी, भारतीय संघाने पराभवाच्या सुरू केलेल्या पराभवाच्या मालिकेबद्दल तिखट प्रतिक्रिया तेव्हाच व्यक्त केली होती. भारतीय क्रिकेट खेळाडू फक्त पैसा पुरतीच खेळतात. त्यांचा खेळाशीही काही संबंध नाही, त्यांनी टिकास्त्र सोडले होते. लाजिरवाणा पराभव स्वीकारणाऱ्या या संघाबद्दल त्याने पुन्हा एकदा नियामक मंडळासह खेळाडूंवरही तोफा डागल्या. खेळण्यासाठी पात्र नसतानाही बहुतांश जखमी खेळाडूंना इंग्लंडला नियामक मंडळाने पाठवले. खेळाडूंनी किती दिवस खेळावे, याला काही तारतम्य राहिलेले नाही. कोट्यवधी रुपयांची कमाई झाल्यावरही खेळाडूंना लागलेला पैशाचा भस्म्या रोग बरा होत नाही. खेळाडू विश्रांती घेत नाहीत. कधी आयपीएल तर कधी परदेशचे दौरे तर कधी कसोटी सामने, असा त्यांचा वर्षभर खेळायचा उद्योग सुरूच आहे. इंडियन प्रिमियर लीगमधून नियामक मंडळाला हजारो कोटी रुपये मिळत असल्याने, आयपीएल पाठोपाठ दौरे आणि सामन्यांचे सत्र नियामक मंडळ सुरूच ठेवते. परिणामी भारतीय क्रिकेटचे वाटोळे झाले. इंग्लंडमधल्या पराभवाने भारतीय क्रिकेटचा लौकिकही धुळीत मिळाला, असे कपिल देवचे म्हणणे आहे. भारतीय क्रिकेट संघातले बहुतांश खेळाडू माजले, नियामक मंडळालाही आव्हान द्यायला लागले, तेव्हाच त्यांच्या नांग्या ठेचायला हव्या होत्या. पद्मश्रीचा पुरस्कार स्वीकारायला दोन खेळाडू गेले नाहीत, त्यादिवशी ते जाहिरातीच्या चित्रिकरणात गर्क होते. धोनी त्यातला एक! हाच हरामखोर इंग्लंडमधल्या विद्यापीठाची सन्माननीय डी.लिट. घ्यायला मात्र आवर्जून गेला होता. या असल्या हरामखोर खेळाडूंच्याकडून राष्ट्रप्रेमाची अपेक्षा करण्यात काहीही अर्थ नाही.
- वासुदेव कुलकर्णी
No comments:
Post a Comment