Total Pageviews

Tuesday, 6 September 2011

GOVT ON OFFENSIVE AGAINST CORRUPT OPPOSITION LEADERS

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी यांचा मुलगा जगनमोहन याने सध्या काँग्रेसशी काडीमोड घेतलेला आहे. जगनमोहन याचे वडील गेल्या वर्षी हेलिकॉप्टर अपघातात मरण पावले. त्यांच्यानंतर मुख्यमंत्रीपद वारसा हक्काने आपल्यालाच मिळायला हवे असा त्याचा दावा होता आणि काँग्रेसच्या संस्कृतीशी तो सुसंगतच होता. पण काँग्रेसने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि पहिल्यांदा रोसय्या आणि नंतर किरण कुमार रेड्डी यांच्याकडे आंध्र प्रदेशची धुरा सोपवली. त्यानंतर वडिलांच्या कृपेने अब्जाधीश झालेल्या जगनमोहन याने अपेक्षेप्रमाणे बंड केले आणि काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यानंतरही प्रचंड मताधिक्याने निवडून येत आपली ताकद दाखवली. राजकीयदृष्टय़ा गैरसोयीच्या ठरलेल्या जगनमोहन याची आर्थिक ताकद मग काँग्रेसच्या लक्षात आली असावी. कारण त्याच्यानंतर जगनमोहन याच्यावर केंद्रीय गुप्तचर खात्याच्या धाडी पडल्या आणि त्याने बेकायदेशीररीत्या किती माया केली, ते काँग्रेस नेते सांगू लागले. त्याच्यावर पडलेल्या धाडींनंतर सीबीआयची नजर कर्नाटक आणि आंध्रातील कुखाणसम्राट रेड्डी बंधू यांच्यावर पडावी, हा अर्थातच योगायोग नाही. यातील दुसरी लक्षणीय बाब अशी की, हैदराबादेत जगनमोहन रेड्डी याच्या मागे सोडण्यात आलेल्या सीबीआयच्या पथकालाच खाणसम्राट रेड्डी बंधूंच्या मागावर सोडण्यात आले आहे. या रेड्डी बंधूंनी कर्नाटकाच्या बेलारी प्रांतात किती उच्छाद मांडलेला आहे त्याच्या सुरस आणि चमत्कारिक कथा राजकीय वर्तुळात किमान दोन ते तीन वर्षे चघळल्या जात आहेत. पण सीबीआयच्या कानावर त्या आताच जाव्यात हा खास केंद्रीय योगायोग म्हणायला हवा. हे रेड्डी बंधू इतके दिवस आंध्रचे आणि तेथील काँग्रेसचे सर्वेसर्वा राजशेखर रेड्डी यांच्या कळपात होते. राजशेखर रेड्डी जोपर्यंत हयात होते तोपर्यंत केंद्राला त्यांचा हडेलहप्पी कारभार कधीही खुपला नाही. ते गेले आणि त्यांच्या मुलाने काँग्रेसशी काडीमोड घेतल्यावर रेड्डी बंधूंची खाणीतील पापे वर यायला लागली. वास्तविक हे रेड्डी बंधू बहुपक्षीय आहेत. एका बाजूला त्यांनी आंध्रात काँग्रेसला सांभाळले होते तर दुसरीकडे कर्नाटकात भाजपची मर्जी राखण्याची ‘दक्ष’ता त्यांनी घेतली होती. यांचा माज इतका होता की, खुद्द मुख्यमंत्री येडियुरप्पा त्यांच्यापुढे हतबल होते. जेव्हा येडियुरप्पा यांनी या दोन रेड्डी बंधूंना मंत्रिमंडळातून काढले तेव्हा या खाणसम्राटांनी येडियुरप्पा यांच्याच मुख्यमंत्रीपदास सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला. शेवटी आपले मुख्यमंत्रीपद सांभाळण्यासाठी येडियुरप्पा यांना त्यांच्या खास मर्जीतील शोभा करंदलाजे यांना मंत्रिमंडळातून काढावे लागले. त्या वेळी कॅमेऱ्यांसमोर चारचौघांत रडत या भाजपच्या कर्नाटकसिंहाने रेड्डी बंधूंनी आपली काय अवस्था केली, ते सांगितले होते. तरीही त्या वेळी भाजपच्या कोणाही केंद्रीय नेत्यास आपल्या मुख्यमंत्र्याची बाजू घ्यावी असे वाटले नाही. कारण अर्थातच रेड्डी बंधूंचे आर्थिक साम्राज्य. त्याचा तपशील आता उघड व्हायला सुरुवात झाली आहे. त्यांच्या घरातच म्हणे ३० किलो सोने आणि काही कोटींची रोकड सापडली. यातली काही भाजपचे सरकार सांभाळण्याच्या कामासाठी कामी आली असणार किंवा भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांच्या बेलारीतील कुलदैवत दर्शनासाठी वापरली गेली असणार. या स्वराजबाईंचे कुलदैवत रेड्डी बंधूंच्या साम्राज्यात आहे आणि त्यामुळे स्वराज यांचे आशीर्वाद कायमच रेड्डी बंधूंच्या मागे आहेत, असे बोलले जाते. आता सीबीआयने कारवाई केल्यानंतर आपला या रेड्डी बंधूंशी काहीच कसा संबंध नाही, हे सांगण्यात भाजप नेत्यांची अहमहमिका सुरू झाली आहे. ती केविलवाणी आहे. कारण इतके मोठे साम्राज्य राजकीय वरदहस्ताखेरीज उभे राहू शकत नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे रेड्डी बंधूंच्या पापात काँग्रेस आणि भाजप या दोघांचाही तितकाच वाटा आहे. या रेड्डी बंधूंना ज्या काळात कर्नाटकात एकाही खाणीसाठी परवानगी नव्हती त्या काळात त्यांच्या कंपन्यांनी जे खनिज निर्यात केले ते सगळे कर्नाटकातील खाणींतून निघाल्याचे स्पष्ट झाले आहे. यातून त्यांनी किमान १८०० कोटी रुपयांचा घोटाळा केला. हे फक्त एका घोटाळ्याचे झाले. त्यांच्या उद्योगाचा अन्य तपशील अजून गुलदस्त्यातच आहे. या रेड्डी बंधूंनी आपल्यासमोर काही कॉपरेरट घराण्यांचा आदर्श ठेवलेला दिसतो. ज्या पद्धतीने त्यांनी अनेक बेनामी कंपन्या स्थापन केल्या आणि त्यांच्यामार्फत आपले व्यवहार सुरू ठेवले ती खास कॉपरेरेट पद्धत आहे. असे केल्याने पैशाचा प्रवास शोधणे जिकिरीचे होऊन बसते. रेड्डी बंधूंच्या काही कंपन्या नोंदल्या गेलेल्या आहेत, पण ज्या नावांनी त्या नोंदल्या गेल्या त्या नावांच्या व्यक्तीच अस्तित्वात नाहीत. या नावनोंदणीत त्यांनी साक्षात परमेश्वरालाही सोडलेले नाही. त्यांच्या एका कंपनीचे नाव आहे o्रीभक्त मरकडेश्वर मिनरल्स आणि त्याचा प्रमुख आहे थेट o्रीकाशी विश्वनाथ. कर्नाटकाचे माजी लोकायुक्त संतोष हेगडे यांनी अत्यंत चिकाटीने या सगळ्या कंपन्यांचा आणि त्यांच्या आर्थिक उलाढालींचा माग काढला आणि या असल्या कंपन्यांच्या मागे रेड्डी बंधूच कसे आहेत, ते सिद्ध केले. दक्षिणेतील आणि त्यातही आंध्र प्रदेशातील जवळपास सर्व बंदरांतून रेड्डी बंधूंचा खनिज साठा निर्यात होत होता. चीनमधल्या गेल्या ऑलिम्पिकच्या काळात जगात लोहखनिजाची मागणी मोठय़ा प्रमाणावर वाढली होती. त्या वेळी रेड्डी बंधूंची चांदी झाली. या सगळ्याकडे इतके दिवस सगळ्यांनीच कानाडोळा केला आणि रेड्डी बंधूंना आपले उद्योग करू दिले. त्यांच्यावरील कारवाई सुरुवात झाली तीच मुळी राजकीय गरजेतून. त्यांच्या विरोधातील पहिली तक्रार नोंदवली ती आंध्रचे माजी मुख्यमंत्री के. रोसय्या यांनी. राजशेखर रेड्डी यांच्या निधनानंतर रोसय्या यांच्याकडे मुख्यमंत्रीपद आले होते आणि रेड्डी यांचा मुलगा जगनमोहन हा त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरला होता. तेव्हा त्याच्या कारवायांना चाप लावण्यासाठी रोसय्या यांनी रेड्डी बंधूंच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि नंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले. म्हणजे थोरले मुख्यमंत्री रेड्डी हयात असते तर कदाचित या धाकल्या रेड्डींची पापे लपलीही असती. यात देशाचे दुर्दैव हे की, लोहखनिजासारख्या मूल्यवान राष्ट्रीय संपत्तीचा इतका दुरुपयोग विनासायास केला जाऊ शकतो आणि तो रोखायचा की नाही हे राजकीय समीकरणावर ठरते. वास्तविक या प्रकरणात रेड्डी हे निमित्त आहेत. खरा दोष जातो आपल्या धोरण आणि नियमांना. विद्यमान पद्धतीप्रमाणे खाण उत्खननाचे कंत्राट स्वामित्व धनाच्या बोलीवर दिले जाते. म्हणजे कबूल केलेले स्वामित्व धन कंत्राटदाराने दिल्यावर उरलेल्या खनिजाच्या उत्पन्नावर सरकारचा काहीही अधिकार राहत नाही. यात दुहेरी तोटा होतो. कारण स्वामित्व धन मुदलात कमीच ठरवले जाते आणि त्यासाठी राजकीय लागेबांधे महत्त्वाचे ठरतात. या उलट कोणत्याही खाणीचे कंत्राट लिलावी पद्धतीने दिल्यास जास्तीत जास्त रक्कम मोजणाऱ्यास ते मिळू शकते आणि सरकारचाही त्यात वाढीव महसुलामुळे फायदा होतो. माजी दूरसंचारमंत्री ए .राजा यांच्या काळात झालेले 2जी स्पेक्ट्रम प्रकरण आणि रेड्डी बंधूंचे हे खाण उद्योग यात साम्य आहे ते यामुळे. 2जी स्पेक्ट्रम राजा यांनी स्वामित्वधनावर हवे तसे विकले आणि मधल्या मध्ये हजारो कोटींचा घोटाळा केला. ती चूक सरकारने 3जी स्पेक्ट्रमच्या वेळी सुधारली आणि त्या वेळी लिलाव पुकारून तब्बल दीड लाख कोटी रुपयांचा महसूल कमावला. पण खाणींच्या बाबतीत अजूनही सरकार चूक सुधारण्याच्या मनस्थितीत आहे, असे दिसत नाही. खाण, दूरसंचार लहरी आदी क्षेत्रे ही देशाची संपत्ती मानून त्यांच्यासाठी एक निश्चित असे धोरण आखले जात नाही, तोपर्यंत हे असेच होत राहणार. आज जगनमोहन आणि जनार्दन त्यात सापडले. उद्या आणखी कोणी सापडतील.

No comments:

Post a Comment