Total Pageviews

Tuesday, 20 September 2011

NATURAL CALAMITIES ,AFZAL GURU

भूकंपाच्या धक्क्यांनी देश हादरला आहे. या हादर्‍यातही हिंमत व संयम महत्त्वाचा आहे. बाकी सद्भावना व शांतता आहेच!

हादरलेला देश!
गुजरातेत नरेंद्रभाई यांचे उपोषणाचे सद्भावना, शांतता मिशन सुरू असतानाच देशाला भूकंपाचे धक्के बसले आहेत, देशाची जमीन हादरली आहे, हिमालय थरथरला आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, बंगाल आणि सिक्कीम या राज्यांतील भूकंपाची तीव्रता भयंकर आहे. रस्ते खचले, दरडी कोसळल्या, इमारती कोसळल्या व त्यात ५५ जण ठार, तर १०० वर जखमी झाल्याचे वृत्त आहे. ही पडझड सुरू असतानाच महाराष्ट्रातील लातूर, धाराशीव भागातही भूकंपाचे झटके बसले आहेत. एकंदरीत उत्तर आणि ईशान्य हिंदुस्थान भूकंपाच्या धक्क्यांनी जबरदस्त हादरला आहे. बाजूला नेपाळ, बांगला देशसारखी राष्ट्रेही भूकंपाने गलितगात्र झाली आहेत. नेपाळात सर्वाधिक हानी झाली आहे. काठमांडूतील ब्रिटिश दूतावासाची इमारत भूकंपाच्या झटक्याने जमीनदोस्त झाली. धक्क्यांची तीव्रता किती आहे हे त्यावरून समजून येईल. सिक्कीम राज्यातील दळणवळणाची साधने तुटली आहेत. टेलिफोन सेवा, वाहतूक ठप्प झाली आहे. कालच्या भूकंपाने नक्की किती नुकसान झाले याचा तपशील अद्याप समोर आलेला नसला तरी हजारो घरांना तडे गेले आहेत व त्या घरांत राहणे लाखो कुटुंबांसाठी धोक्याचे बनले आहे. हिंदुस्थानच्या अर्ध्या भागातील जनता भीतीच्या सावटाखाली आहे. निसर्गाचा हा भयंकर प्रकोप आहे व या प्रकोपाने देशाला चारही बाजूंनी वेढले आहे. भूकंपाचे हादरे सुरू असतानाच उडीयामध्ये महापुराने हाहाकार उडवला आहे. ते राज्य पाण्याखाली आहे व लाटांच्या तडाख्यामुळे घरे, दारे, माणसे वाहून गेली आहेत. उडीयात आतापर्यंत पाचशेच्या आसपास बळी गेले आहेत. बिहारातही पुराचा तडाखा बसला आहे. बाजूच्या पाकिस्तानात आणि चीनमध्येही पुराची परिस्थिती चिंताजनक असून शेकडो लोक बेघर आणि मृत झाले आहेत. कुठे जमीन दुभंगते आहे, कुठे पुराचे लोट येत आहेत, तर कुठे दहशतवादी हल्ल्यात माणसे निष्कारण मारली जात आहेत. थोडक्यात काय? तर हिंदुस्थान व आसपासच्या देशात सध्या हिंसा आणि मृत्यूचे तांडव सुरू आहे. राजाने मारले व निसर्गाने झोडपले तर दोष कुणाला द्यायचा? हे वाक्य बोलायला बरे आहे. ‘राजा’ ठीकठाक असेल तर अनेकदा निसर्गाशीही सामना करता येतो. भूकंप, सुनामीसारख्या संकटांनी आशिया खंडातील अनेक देशांना जबर फटका बसला आहे. सुनामीचा तडाखा मागे दक्षिण हिंदुस्थानास, अंदमान-निकोबारसारख्या बेटांना बसला व होत्याचे नव्हते झाले. महाराष्ट्रात लातूर-धाराशीव आणि गुजरातेत भूजच्या भूकंपाने जे नुकसान केले ते कधीच भरून येणार नाही. हिंदुस्थानच्या भूगर्भात सध्या चित्रविचित्र हालचाली सुरू आहेत व त्याचेच हादरे वर बसत असतात. या सगळ्यांपासून लोकांचे व सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणारी यंत्रणा आपण खरोखरच उभारली आहे काय? आपत्ती व्यवस्थापन म्हणजे तुमचा तो डिझास्टर मॅनेजमेंट नावाचा एक प्रकार निर्माण केला गेला, पण त्याचा कुठे काही उपयोग झाल्याचे दिसत नाही. मुंबई पुरात बुडाली तेव्हा हे आपत्ती व्यवस्थापनही पुरात बुडाले आणि भूकंपाचे धक्के बसतात तेव्हा या यंत्रणेलाही तडे जातात. जपानमध्ये फुकुशिमा प्रांतात सुनामी, भूकंपाचे धक्के व त्यानंतर फुटलेल्या अणुभट्ट्या ही सर्व संकटे एकाचवेळी आली. दुसरा एखादा देश असता तर या तिहेरी संकटाच्या मार्‍याने हातपाय गाळून बसला असता, पण त्याही परिस्थितीत जपानचे प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन ज्या एका शिस्तीत काम करीत होते त्याचे कौतुक करायला शब्द तोकडे पडतील. इतके मोठे संकट कोसळून व समोर मृत्यूचा जबडा दिसत असूनही हाहाकार माजू दिला नाही. निसर्गाचे प्रकोप व संकटे काही सांगून येत नाहीत. घोटाळे व भ्रष्टाचार ठरवून केले जातात, पण निसर्गाचा प्रकोप अचानक उद्भवतो. अशा वेळेला सरकारी यंत्रणेने कमीत कमी मनुष्यहानी व मालमत्तेचे नुकसान टाळता येईल अशी यंत्रणा राबवायची असते. हिंदुस्थानात अशा यंत्रणेची कमतरता आहे. अफवा, गोंधळ, पळापळ, नेत्यांची उगाच धावपळ व ब्रेकिंग न्यूज यामुळे ‘आपत्ती’ कमी होण्याऐवजी वाढतच असते. भूकंपाच्या धक्क्यांनी देश हादरला आहे. या हादर्‍यातही हिंमत व संयम महत्त्वाचा आहे. बाकी सद्भावना व शांतता आहेच!

‘तळमळ’ अफझलची... देशाची!
संसदेच्या आवारात ठेवलेला कारबॉम्ब फुटला कसा नाही या काळजीने अफझल गुरूला सध्या ग्रासले आहे. तिहार कारागृहाच्या एका अधीक्षकाकडे त्याने ही चिंता व्यक्त केली आणि त्याने ती आता शब्दबद्ध केली आहे. तिहारचाच अधीक्षक हे सांगत असल्याने ते खरेच मानायला हवे. १३ डिसेंबर २००१ रोजी ‘लष्कर - ए - तोयबा’च्या पाच अतिरेक्यांनी संसदेवर हल्ला करून देशाच्या सार्वभौमत्वावरच घाला घातला होता. सुरक्षेसाठी तिथे तैनात असलेले पाच पोलीस आणि एक सुरक्षा जवान यांनी हौतात्म्य पत्करून या सर्व अतिरेक्यांना ठार केले म्हणून पुढील अनर्थ टळला. या हल्ल्यामागील ‘मेंदू’ असलेला अफझल गुरू सध्या तिहार तुरुंगात शिक्षा भोगत आहे. त्याला फाशी होऊन आता आठ-नऊ वर्षे झाली. राष्ट्राध्यक्षांनीही त्याचा दया अर्ज अलीकडेच फेटाळून लावला आहे. म्हणजे शिक्षेची अंमलबजावणीच फक्त बाकी असल्याने या महाशयांचा तिहारमधील प्रत्येक दिवस तळमळत जायला हवा. मात्र त्याऐवजी त्याला चिंता आहे ती संसद आवारातील कारबॉम्ब कसा फुटला नाही याची. अर्थात अफझल स्वत:च्या जीवाची काळजी करील तरी कशाला? त्याची फाशी टळावी यासाठी काळजी करणारे जम्मू-कश्मीरच्या विधानसभेत बसलेले आहेत. पुन्हा केंद्रातील सरकारनेही एवढी वर्षे फाशी लांबवून त्याची काळजीच घेतली आहे. अफझलला फाशी दिली तर मुस्लिम मतांचे काय होईल, याची केंद्रातील कॉंग्रेस सत्ताधार्‍यांना काळजी. जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि तेथील अफझलप्रेमी लोकप्रतिनिधींना अफझलच्या जीवाची काळजी. खुद्द अफझलला मात्र संसदेतील कारबॉम्ब कसा फुटला नाही याची चिंता. तो फुटला नाही म्हणून पुढचा प्लॅन वाया गेला, ‘आझाद कश्मीर’बाबत ठरविलेली रणनीती फुकट गेली याचा घोर. फाशीच्या दोराची वाट पाहणारा दुसरा कैदी काळजीने हैराण झाला असता. अफझल गुरू मात्र कारबॉम्ब फुटून संसद उद्ध्वस्त का झाली नाही या काळजीत आहे. या देशातील सामान्य जनता मात्र सत्ताधार्‍यांनी अफझल-कसाबसारखे विषारी साप अजून ठेचले कसे नाहीत या काळजीत आहे. अर्थात अफझलच्या ‘काळजीवाहूं’ना जनतेच्या चिंतेची फिकीर कुठे आहे?

No comments:

Post a Comment