Total Pageviews

Tuesday, 20 September 2011

POLITICAL FAMILIES RULE CONGRESS

राजकीय वारसा नसलेल्या युवकांना राजकारणात येण्याचे आवाहन राहुल गांधी यांनी केले असले, तरी युवक काँग्रेसच्या निवडणुका या काँग्रेसजनांच्या पुढील वारसदारांतच झाल्या. नव्याने निवडून आलेल्यांना किमान स्वतंत्रपणे काम करण्याची तरी संधी मिळावी.

...........

गेल्या वर्षी साधारणत: याच सुमारास काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी पुण्यात आले होते. पिंपरी-चिंचवडमधील एका कार्र्यक्रमात त्यांनी एक हजार कॉलेज युवकांशी संवाद साधला होता. युवकांनो, राजकारणात या, अशी हाक त्यांनी दिली होती. राजकारणात येण्यासाठी राजकीय वारसा असण्याची किंवा फार पैसा असण्याची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. भविष्यात युवक काँग्रेसचे राजकारण वेगळ्या दिशेने जाईल, अशी आशा त्यांच्या वक्तव्यावरून वाटली होती. मात्र, युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची पुण्यात नुकत्यात झालेल्या निवडणुकीने ही आशा धुळीस मिटविली आहे. पुण्यातील लोकसभा मतदारसंघातून युवक काँग्रेसवर निवडून आलेले बहुतेक प्रतिनिधींचे वडिल किंवा जवळचे नातेवाईक सक्रिय राजकारणात आहेत. किंबहुना निवडणूक युवक कॉग्रेसची असली, तरी या मोठ्या मंडळींनी आपली सगळी प्रतिष्ठा पणाला लावून ती लढविली. त्यामध्ये पुढची पिढी ही निवडून जरूर आली असली तरी या निमित्ताने आपली ताकद आजमविण्याचा प्रयत्न झाला असेच म्हणावे लागेल.

स्थानिक पदाधिकाऱ्यांपासून प्रदेश पदाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांची निवड मतदानानेच व्हायला हवी, असा नियम राहुल गांधींनी केला होता. सभासद नोंदणीपासून प्रत्यक्ष निवडणूकीपर्यंत सगळ्याची एक प्रक्रिया ठरवून देण्यात आली होती. महाराष्ट्रामध्ये ज्येष्ठ मंत्री पतंगराव कदम यांचे सुपुत्र विश्वजित कदम आणि सत्यजित तांबे यांच्यात चुरस झाली. तशीच चुरस प्रत्येक मतदारसंघामधून झाली. पुण्यात आमदार विनायक निम्हण यांचे सुपुत्र चंदशेखर उर्फ सनी आणि आमदार रमेश बागवे यांचे चिरंजीव अविनाश बागवे यांच्यात प्रमुख लढत झाली. नगरसेवक दीपक मानकर यांचा मुलगा हर्षवर्धन हाही रिंगणात होता. त्या व्यतिरिक्त आणखी दहा जणांनी अर्ज भरले होते. ११२२ मतदारांपैकी किमान वीस मते मिळवतील असे पहिले दहा जण कार्यकारिणीवर निवडून जाणार होते. पुण्यात १३ पैकी सातच जणांना वीस मतांचा कोटा पूर्ण करता आला.

पुण्यातील निवडणूक सुरुवातील खूपच थंड होती. मात्र, हळुहळू या युवकांच्या पालकांनी त्यामध्ये लक्ष घालण्यास सुरूवात केली आणि त्याला रंग चढू लागला. तथाकथित युवक नेत्यांचे आदेश निघू लागले. ही निवडणूक म्हणजे शहरातील काँग्रेसचे राजकारण भविष्यात कोणत्या दिशेने जाणार हे ठरविणार असल्याचे सांगितले गेल्यावर वातावरण अधिकच तापले. विनायक निम्हण हे नारायण राणे यांचे कट्टर समर्थक तर रमेश बागवे आणि दीपक मानकर हे सुरेश कलमाडी यांचे समर्थक. साहजिकच शहरातील काँग्रेसचे कार्यकतेर् कलमाडींची साथ सोडून नवीन नेतृत्वाला हात देणार का, अशी चर्चा सुरू झाली. आदल्या दिवशी या निवडणुकीतील नाट्य शिगेला पोहोचले. अखेर सनी निम्हण विजयी झाले. अविनाश बागवे व हर्षवर्धन मानकर अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

वास्तविक काँग्रेसला पुण्यात ताज्या दमाच्या नेतृत्वाची गरज आहे. एके काळी युवक काँग्रेसमधून मुख्य काँग्रेस पक्षाला चांगले कार्यकतेर् मिळत होते; पण प्रत्येक गावातील सत्तेची सूत्रे असलेल्या नेत्याने आपल्या मजीर्तील कार्यर्कत्याला युवक काँग्रेसचा अध्यक्ष नियुक्त करण्यास सुरुवात केली आणि ही प्रथा खंडित झाली. युवक काँग्रेसचा अध्यक्ष हा संबंधित नेत्याचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून वागू लागला, प्रसंगी त्याची पायताणे उचलण्यासाठी वागू लागला. या निवडणूक मार्गाने येणाऱ्यांना किमान हा प्रकार करावा लागणार नाही अशी अपेक्षा आहे. मात्र, त्यांनी आपल्या वडलांच्या राजकारणाचा भागही बनता कामा नये. अन्यथा मुख्य काँग्रेसप्रमाणेच युवक काँग्रेसमध्येही गट पडतील आणि पक्षामध्ये व्यापकता येण्याऐवजी संकुचितपणाच येईल. राहुल गांधी यांना सामान्य युवकांनी राजकारणात यावे, असे कितीही वाटत असले, तरी ते शक्य नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. वडिल राजकारणात आहेत, म्हणून मुलांना संधीच मिळू नये का, निवडणूक जिंकल्यानंतरही घराणेशाहीच्या आरोपाखाली या नवीन पिढीला दाबून टाकणार का, असे प्रश्न उपस्थित केले जाणारच आहेत. त्यांची उत्तरे प्रत्येकानेच शोधावीत; पण एकूण युवकांना त्यांचे किमान स्वातंत्र्य मिळाले आणि

त्यांना त्यांचे कार्यक्रम राबविता यावेत, अशी अपेक्षा केली तर ती चूक कशी ठरेल

No comments:

Post a Comment