Total Pageviews

Saturday 17 September 2011

OMARS DIVORCE WITH HIS WIFE

ओमर-पायलचा घटस्फोट
ऐक्य समूह
Saturday, September 17, 2011 AT 01:46 AM (IST)
ओमर अब्दुल्ला
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारुख अब्दुल्ला यांचे ओमर हे चिरंजीव! त्यांचे आजोबा शेख अब्दुल्ला हेही काश्मीरचे मुख्यमंत्री होते. एकाच घराण्यातल्या तिघांनी या राज्याचे मुख्यमंत्रिपद मिळवल्याने, देशात नवा विक्रम प्रस्थापित झाला. ओमर यांचे वडील डॉ. फारुख यांचे शिक्षण इंग्लंडमध्येच झाले. तेथील वास्तव्यात मोली या परिचारिकेशी त्यांनी प्रेमविवाह केला. ओमर यांनीही आपल्या वडिलांचा प्रेम प्रकरणाचा हा वारसा पुढे चालवला आणि मेजर जनरल रामनाथ यांची कन्या पायल नाथ हिच्याशी त्यांचा 1994 मध्ये प्रेमविवाह झाला. मुख्यमंत्रिपदावर असताना डॉ. फारुख अब्दुल्ला हे हिंदी चित्रपटसृष्टीतल्या नट्यांच्या संपर्कात असत. शबाना आझमीला त्यांनी श्रीनगरमध्ये मोटरसायकलवरून फिरवल्याची चर्चा खूप झाली होती. आता सोळा वर्षाच्या वैवाहिक जीवनानंतर ओमर यांनी आपली पत्नी पायलशी घटस्फोट घेतल्याने ते या नव्या वादामुळे प्रकाशझोतात आले आहेत.
आपण आणि पायल यांच्यातील मतभेद वाढत गेल्यामुळे दोघांनीही परस्परांच्या सहमतीने घटस्फोटाचा निर्णय घेतल्याचे त्यांनी जाहीरपणे सांगितले पण राजधानी दिल्लीतल्या उपग्रह वाहिनीत काम करणाऱ्या युवतीशी त्यांचे नवे प्रेमप्रकरण सुरू असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमातून प्रसारित झाले होते. ओमर यांनी मात्र अशा प्रेम प्रकरणाचा इन्कार करून आपण दुसरा विवाह करणार नसल्याचा खुलासा केला आहे.
10 मार्च 1970 मध्ये इंग्लंडमध्ये ओमर यांचा जन्म झाला. तेथेच त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण झाले. मुंबईच्या सिडनहॅम महाविद्यालयातून बी. कॉम.ची पदवी घेतल्यावर इंग्लंडमधून त्यांनी एमबीएची पदवी मिळवली. शिक्षण पूर्ण झाल्यावर ते भारतात परतले आणि 1999 मध्ये पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री झाले. या पदाचा त्यांनी राजीनामा दिला होता. 2002 मध्ये काश्मीर विधानसभेच्या निवडणुकीत गंदरबाल मतदारसंघात त्यांचा पराभव झाला. पण त्याच वर्षी ते काश्मीरमधल्या नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे अध्यक्ष झाले.
कॉंग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स आघाडीने काश्मीर विधानसभेत बहुमत मिळवल्यावर 2009 मध्ये ओमर अब्दुल्ला या राज्याचे अकरावे मुख्यमंत्री झाले. सर्वात तरुण वयात त्यांनी मुख्यमंत्रिपद मिळवले.
सक्रिय राजकारणात उतरल्यावर काश्मीरमधल्या फुटिरतावादी दहशतवाद्यांनी त्यांच्यावर चार वेळा प्राणघातक हल्लेही चढवले होते. त्यातून ते बचावले असले तरी, त्यांच्या जीविताला धोका कायम आहे. ओमर यांनी काश्मिरी युवतीशीच विवाह करावा, अशी काश्मिरी जनतेची भावना असल्याची चर्चा त्यांनी पायलशी केलेल्या विवाहाच्यावेळी राज्यभर झाली होती. आता त्या विवाहाचा अध्याय उभयतांच्या घटस्फोटामुळे संपला आहे.

No comments:

Post a Comment