कवी श्री सागर बांदल यांची ग्लोबल मराठी डॉट कॉम वरील अस्वस्थ करणारी ही अप्रतीम कविता. . ही कविता एवढी परिणामकारक का झाली असावी? हा शोध घेण्याचा इथे प्रयत्न करतो आहे. गेली २० वर्षे तरी ही मायभूमी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाने रक्तबंबाळ होते आहे. नेते तो दहशतवाद कठोरपणे निपटुन काढण्याऐवजी ’असे हल्ले होणारच” अशी स्वतःच गलितगात्र झाल्यासारखी भाषा करताहेत. मायभूमीच्या लेकरांना त्यामुळे आपल्या कपाळी षंढ असल्याचा डाग लागेल अशी खंत वाटते आहे. अलिकडेच दिल्ली हायकोर्टाबाहेर झालेल्या हल्ल्याने व्यथित होऊन कवीने हीच खंत या कवितेत व्यक्त केलेली दिसते.
कवितेच्या मुखडयातच कवीने ही व्यथा मायभूमीसमोर स्पष्ट्पणे मांडली आहे.
षंढ सारी लेकरे गं मायभूमी माफ़ कर
विसर तो इतिहास सारा जाळुनीया राख कर
एवढेच नाही तर मायभूमीला तिचे दुःख कमी व्हावे यासाठी जुना दैदिप्यमान इतिहासही तू विसरून जा असे कवी अतीव दुःखाने पण आग्रहाने सांगतो आहे. हा सारा दैदिप्यमान इतिहास, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ’इतिहासातील सहा सोनेरी पाने’ हा ग्रंथ, भारतीयांचे मनोबल उच्च स्तरावर राहावे यासाठी लिहून, अजरामर करून ठेवला आहे याची आठवण येणे अपरिहार्य आहे.
वेड होते त्या शिवाला मोगलाशी भांडला
वेड 'तात्या'ला तुझे जो सागरी झेपावला
यायचे ते ना पुन्हा, तू वाट बघणे बास कर..
षंढ सारी लेकरे गं मायभूमी माफ़ कर
हे मायभूमी, स्वराज्यासाठी मोंगलांशी लढलेल्या शिवरायांसारख्या आणि मायभूमीला स्वतंत्र करण्याचा ध्यास घेऊन, जिवाची पर्वा न करता, समुद्रात झेप घेणाऱ्या ’तात्या’सारख्या (म्हणजे सावरकरांसारख्या) सुपुत्रांची तू वाट पाहाणे सोडून दे कारण तसे सुपुत्र पुन्हा निपजणार नाहीत; कारण तुझी सारी लेकरे षंढ झाली आहेत.
टांगण्या वेशीवरी तव लक्तरे सारे पुढे
चिंधड्या तव अस्मितेच्या फ़ाडती मुंग्या -किडे
ना कुणी तुज रक्षण्याला, तू अपेक्षा लाख कर!!
षंढ सारी लेकरे गं मायभूमी माफ़ कर
तुझ्या बदनामीची कोणीच फ़िकीर करीत नाही. तुझा स्वाभिमान पायदळी तुडविण्यात सगळे पुढे असतात. सर्वात जास्त भ्रष्टाचाऱ्यांचा देश, असे जगाने म्हटले तरी तुझ्या लेकरांना या मायभूमीची बदनामी होते आहे असे वाटतच नाही. या मायभूमीचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या राहुलजींनी ’मला भारतीय असल्याची लाज वाटते’ असे म्हटले होते. पण अशा या देशाचे पंतप्रधान होण्याची इच्छा बाळगण्याची मात्र त्यांना लाज वाटत नाही. या जगात आईला वंदन करायला बंदी करणारा असा कोणताही धर्म नसणार! धार्मिक कारण सांगून ’वंदेमातरम’ म्हणायला म्हणजे साक्षात आईला वंदन करायला नकार देणारी लेकरे व मतांकरिता याचे समर्थन करणारी लेकरेही तुझीच ! तू कितिही अपेक्षा कर पण ही असली लेकरे तुझे काय रक्षण करणार?
कोण मेले, काय झाले, ना इथे पडले कुणा
मी नि माझे घर सुखी बाकी कुणी काही म्हणा
भाडखाऊ लोकशाही, 'भारतीया तूच मर!"
षंढ सारी लेकरे गं मायभूमी माफ़ कर
दहशतवादी हल्ल्यांमध्ये होरपळलेल्यांच्या दुःखाकडे लक्ष देण्याची इथे कोणाला ओढ नाही. मी आणि माझे घर सुखात आहे ना, मग बाकिच्यांचे कांही का होईना अशा वृत्तीची ही तुझी लेकरे. भ्रष्टाचारावर पोसलेलि ही लोकशाहीही शेवटी सांगते, की हे भारतीया तूच मरायला तयार रहा. माते माफ कर पण ही तुझी लेकरेही त्याच लायकीचे झाली आहेत.
दोष कोणा काय देऊ, भगवते, तू सांग ना
धाडसी नेतृत्व नाही, हा तुझा ठरला गुन्हा
चाड ना येथे कुणाला, हेच आता मान्य कर
षंढ सारी लेकरे गं मायभूमी माफ़ कर
हे देवते, तू मला सांग , दोष तरी कुणाला देऊ? तुझा गुन्हा हाच की तुझ्या लेकरात धाडसी नेताच निपजला नाही. याचीही कुणाला खंत वाटत नाही आहे हे सत्य तू आता तरी मान्य कर.
घालुनी मग शेपट्या, करतील ते नीषेधही
वाटुनी नोटा जरा देतील त्यावर लेपही
घोषणा अन भाषणांची, मोज लांबी हात भर!
षंढ सारी लेकरे गं मायभूमी माफ़ कर
असे असले तरी ही लेकरे दोन्ही पायात शेपट्या घालून का होईना हल्ल्याचा जोरदार निषेध करतील.
मेलेल्यांच्या नातेवाईकांना आणि जखमींना रकमांच्या घोषणा करून मल्मपट्टी करतील. लंब्याचौड्या घोषणा
आणि सांत्वनपर भाषणांची मात्र बरसात होईल. पण एवढेच! शेवटी एवढेच सांगतो की , हे माते,
षंढ सारी लेकरे गं मायभूमी माफ़ कर.
अशी ही तुमच्या आमच्या भावना व्यक्त करणारी कविता दिल्याबद्दल कवी श्री सागर बांदल यांना
मनापासून धन्यवाद!
No comments:
Post a Comment