Total Pageviews

Tuesday, 6 September 2011

WHO FUNDED AMARSINGH

मांत्रिकांनी बाटलीबंद केलेली भुते कोणाच्या चुकीमुळे, अपघाताने वा घातपातामुळे पुन्हा बाटली बाहेर येऊन उच्छाद मांडू लागल्याच्या सुरस आणि चमत्कारिक कथा सर्वांनीच लहानपणी वाचल्या. त्याचेच प्रत्यंतर सध्या दिल्लीत येत आहे. २२ जुलै २00८ रोजी बाटलीबंद झालेली ‘कॅश-फॉर-व्होट’च्या कथित भ्रष्टाचाराची भुते अचानक बाहेर येऊन संपूर्ण राजकीय व्यवस्थेलाच भयभीत करू लागली आहेत. या प्रकरणात दोन माजी खासदारांसह कायम वादग्रस्त राहिलेले खासदार अमरसिंह यांना अटक झालेली असली, तरी त्यामुळे या रहस्यनाट्यातील गूढ पुरते उलगडलेले नाही. खरे तर अधिकच गहन झाले आहे. कारण अमरसिंह आणि कंपनीचे ‘शिकविते धनी’ कोण? या मुख्य प्रश्नाचे उत्तर आता पोलिसांना शोधायचे आहे. हे काम दिल्लीचे पोलीस किती धैर्याने, कौशल्याने व प्रामाणिकपणे करतात, यावर अवलंबून आहे. कशाची व कोणाचीही तमा न बाळगता सरकारी यंत्रणा सत्यशोधन करतील, यावर जनतेचा विश्‍वास नसला, तरी तशी प्रार्थना मात्र आहे.

भारत-अमेरिका अणु सहकार्य कराराचा वाद भारतात चिघळलेला असताना त्याच मुद्यावर डाव्या पक्षांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याने मनमोहनसिंग यांचे युपीए सरकार अल्पमतात गेले, अशी समजूत झाली होती. परंतु मुलायमसिंह आणि अमरसिंह यांच्या समाजवादी पक्षाने ऐनवेळी आपली ताकद सरकारच्या बाजूने उभी केली आणि सरकार बचावेल, ही शक्यता बळावली, मात्र तरीही परिस्थिती खात्रीची नव्हती. याच पार्श्‍वभूमीवर २२ जुलै २00८ रोजी सरकारविरु द्धच्या अविश्‍वास प्रस्तावावर लोकसभेत चर्चा चालू असताना भारतीय जनता पक्षाच्या तीन खासदारांनी नाट्यमयरीत्या सभापतींच्या समोरच्या टेबलवर नोटांची पुडकी टाकली आणि आपल्याला ‘विकत’ घेण्याचा प्रयत्न झाल्याचा सनसनाटी आरोप केला. पुढे मतदान झाले आणि विरोधी पक्षांचे काही खासदार अचानक अनुपस्थित राहिले वा त्यांनी विरोधी मतदान केल्याचे उघड झाले. त्यामुळे सरकार बचावले. मात्र संसद व खासदार आणि राजकीय पक्ष यांच्याविषयी जनतेच्या मनात निर्माण झालेले संभ्रमाचे वातावरण काही निवळले नाही. पुढे तीन वर्षे हे प्रकरण तसेच बासनात राहिले व विस्मृतीच्या पडद्याआडही गेले. पण बाटलीबंद झालेले हे भूत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे पुन्हा जनतेच्या नजरेत आले. या प्रकरणात आता अमरसिंह, त्यांचे पूर्वीचे स्वीय सहायक संजीव सक्सेना, राजकारणातील सत्तेचे एक दलाल सोहेल हिंदुस्थानी व नोटाची पुडकी फेकणारे दोन खासदार यांना अटक झाल्यामुळे हे प्रकरण नक्की कोणी घडवून आणले याचा शोध लागू शकेल, असे वाटू लागले आहे.

२२ जुलै २00८ रोजी हे लज्जास्पद प्रकरण घडल्यानंतर तेव्हाचे लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चटर्जी यांनी किशोरचंद्र देव यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय संसदीय समिती नेमली. या समितीने डिसेंबर २00८ मध्ये आपला अहवाल सादर केला. मात्र समितीने कोणावरही निश्‍चित आरोप ठेवला नाही. कारण म्हणे, त्यांना तसे पुरावे सापडले नाहीत. मात्र या प्रकरणाचा पोलिसांकरवी तपास करावा, अशी शिफारस करून समितीने आपले अंग काढून घेतले. आता बॉल पोलिसांच्या, म्हणजेच पर्यायाने केंद्रीय गृहखात्याच्या कोर्टात गेला. तेव्हाचे केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील व त्यांचे उत्तराधिकारी पी. चिदंबरम यांनी या प्रकरणात जातीने लक्ष देणे गरजेचे होते. पण तसे झाले नाही. तीन वर्षे लोटली, तरी सत्य बाहेर येईना, म्हणून सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे झाडले, तेव्हा दिल्लीचे पोलीस जागे झाले व कामाला लागले.

या प्रकरणातील एक उपनाट्य म्हणजे या सार्‍या ‘व्यवहारा’चे ‘स्टिंग ऑपरेशन’ एका चॅनेलने केले. ते सारे काही त्याच संध्याकाळी दाखवले जाईल, अशी मोठी जाहिरात करण्यात आली होती. प्रत्यक्षात तसे झाले नाही. नक्की माशी कुठे शिंकली, याचाही शोध घ्यावा लागेल. या स्टिंग ऑपरेशनमुळेच सोहेल हिंदुस्थानी, संजीव सक्सेना, समाजवादी पक्षाचे खासदार रेवती समण सिंह यांची नावे पुढे आली. त्यांचे चेहरे टीव्हीच्या कॅमेर्‍यात बंदिस्त झाले होते. सक्सेना व हिंदुस्थानी यांच्या जाब-जबाबानंतर अमरसिंह आणि तेव्हाचे भाजपचे पडद्याआडचे ‘चाणक्य’ सुधींद्र कुलकर्णी यांचेही बुरखे फाटतील, अशी परिस्थिती निर्माण झाली. अमरसिंह यांच्या अनेक खटपटी-लटपटी जगाला ठाऊक आहेत. सरकार वाचवण्यासाठी खासदार ‘विकत’ घेण्याची सुपारी अमरसिंहांना कोणी दिली याचा शोध लागला, तर या रहस्यनाट्याचा खरा सूत्रधार कोण, ते जगासमोर येईल. मात्र त्यासाठी तपास पूर्ण होण्याची वाट पहावी लागेल.

वृत्तवाहिनीने या प्रकरणाचे गुपचूप चित्रीकरण केले. त्यामुळे मोठे पुरावे पोलिसांच्या हाती लागू शकतील. सत्यशोधन करण्यासाठी पत्रकारांना अशा हिकमती कराव्याच लागतात. तशा जर या वाहिनीने केल्या असतील, तर त्यात वाहिनीला वा पत्रकारांना दोष देण्याचे कारण नाही. ऐन वेळी त्यांचे तोंड बंद करण्यासाठी कोणी दबाव आणला, हे मात्र शोधावे लागेल. त्यासाठी वाहिनीच्या धुरिणांनी पोलिसांना सहकार्य करून त्यांच्याकडे सत्यकथन करायला हवे. चित्रीकरणात दिसणारी कार अमरसिंह यांच्या घराच्या आसपास वावरताना दिसते. शिवाय संजीव सक्सेना हे त्यांचेच सहकारी आहेत. त्यामुळे त्यांचा प्रत्यक्ष सहभाग या प्रकरणात आहे, असे सध्या तरी मानायला जागा आहे. या प्रकरणातील तीन भाजप खासदारांपैकी केवळ एकच अशोक अरगल सध्या संसदेचे सदस्य आहेत. फगनसिंह कुलस्ते व महावीर भगोडा यांनाही अटक झालेली असली, तरी त्यांचा सहभाग ‘तांत्रिक’ स्वरु पाचा असल्याचे दिसते. कारण ते जर ‘गुन्हेगार’ असते, तर त्यांनी लोकसभेतच नोटा आणल्या नसत्या. सुधींद्र कुलकर्णी यांचा सहभाग प्रत्यक्ष गुन्ह्यात होता की, त्यांनी स्टिंग ऑपरेशन घडवून आणून ‘व्हिसल ब्लोअर’चे काम केले, तेही पोलीस व न्यायालयाला तपासावे लागेल.

इतके मात्र खरे की, २१ जुलै २00८ च्या रात्नी जे काही घडल्याचे कॅमेर्‍यात टिपले गेले, त्याहीपेक्षा खूप मोठा भ्रष्टाचार या अविश्‍वासाच्या ठरावाच्या वेळी घडला. कारण आणखी डझनभर मते फुटली होती. त्यांच्या चोचीत मोत्याचे दाणे कोणी कोंबले, तेही स्पष्ट हावे लागेल. संत तुकाराम एका अभंगात म्हणतात, ‘फोडिले भांडार, धन्याचा हा माल; मी तो हमाल भार वाही.’ या अभंगाला या अभद्र प्रकरणाचा संदर्भ लावला, तर हा ‘माल’ कोणत्या धन्याचा होता व तो वाहणारा ‘हमाल’ बनण्यास अमरसिंह का तयार झाले, ते आता शोधावेच लागेल.

-डॉ. भारतकुमार राऊत

(लेखक ‘लोकमत’ मीडिया समूहाचे संपादकीय संचालक व शिवसेनेचे राज्यसभा सदस्य आहेत

No comments:

Post a Comment