Total Pageviews

Friday, 2 September 2011

FOLLOW KOREAN MODEL OF EXPORT

आर्थिक विकासासाठी निर्यातीशिवाय पर्याय नाही. जगात स्पर्धा करू शकतील अशा दर्जाची आणि तुलनेत कमी किमतीची उत्पादनं बनवावी लागतील. त्यासाठी उच्च तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल. त्यासाठी कुशल कामगारही लागतील आणि त्यासाठी मनुष्यबळाचा विकास करावा लागेल, हे ओळखूनच दक्षिण कोरियानं आर्थिक प्रगती केली.

.................

फिनिक्स पक्षी राखेतूनही भरारी घेतो असं म्हणतात. काही देशांबाबतीत ते तंतोतंत खरं ठरलेलं आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या राखेतून रशिया, जपान या देशांनी नवी भरारी घेतली. नंतरच्या काळात एकाच वेळी झालेल्या राजकीय आणि आथिर्क बदलात रशिया हरवून गेला, पण जपानने केलेली आथिर्क उन्नती ही त्या देशाची चिकाटी आणि परिश्रमाचं फळ मानलं जातं. या देशांच्या रांगेत आणखी एका देशाला ठेवता येईल, तो म्हणजे दक्षिण कोरिया. या गरीब आणि अविकसित देशानं स्वत:ला आता विकसित देशांच्या यादीत नेऊन बसवलं आहे!

गेल्या तीन-चार दशकांत सर्वात वेगाने आथिर्क प्रगती करणाऱ्या देशांमध्ये दक्षिण कोरिया अग्रस्थानी राहिलेला दिसतो. त्यामुळंच भारतासारखे अनेक विकसनशील देश दक्षिण कोरियाकडं उत्सुकतेनं पाहत असतात. भारत आणि दक्षिण कोरिया या दोन देशांच्या विकासाची एकमेकांशी खूप मोठी तुलना करणं योग्य ठरणार नाही. पण जाणीवपूर्वक प्रयत्न करून दक्षिण कोरियाने स्वत:ला विकसित देशांमध्ये कसं नेऊन बसवलं हे समजून घेणं मात्र भारतासाठी उद्बोधक ठरू शकेल.

काही बाबतीत भारत आणि दक्षिण कोरियाची तुलना होऊ शकते. दोन्ही देश प्रजासत्ताक आहेत. दोन्ही देशांनी युद्धाचा अनुभव घेतलेला आहे, त्यात प्रचंड नुकसानही सहन करावं लागलेलं आहे. दोन्ही देशांचे शेजारी त्यांच्यासाठी त्रासदायक आहेत. दोन्ही देशांनी आधी सरकारी देखरेखीखाली आथिर्क विकासाकडं वाटताल केली, नंतर मात्र त्यांनी खुली अर्थव्यवस्था स्वीकारली. हे दोन्ही देश गरीब मानले जात होते. दोन्ही देशांची लोकसंख्या प्रचंड होती. (भारताची आजही आहे.) दोन्ही देशांकडं जगानं वेगाने विस्तारणाऱ्या अर्थव्यवस्था म्हणून पाहिलं.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात एकच कोरिया होता, त्यावर जपाननं चढाई केलेली होती, पण महायुद्ध हरल्यावर जपानला कोरिया सोडून जावं लागलं. त्यानंतर काही वर्षांतच पुन्हा युद्ध छेडलं गेलं. दोन स्वतंत्र कोरिया तयार झाले. त्यांच्यातील संघर्ष कायम राहिला. १९६० सालापर्यंत दक्षिण कोरिया अशा बाह्यगोष्टींशी झगडत होता. त्यांच्या देशातही हुकूमशाहीच होती. दोन देश स्वतंत्र झाल्यामुळं वाट्याला आलेला भूप्रदेश कमी झाला, तुलनेत लोकसंख्येचं प्रमाण जास्त राहिलं. ही मोठी लोकसंख्या गरिबीत खितपत पडलेली होती. देश तुलनेत छोटा, त्याच्याकडं असणारी नैसगिर्क साधन-संपत्तीही कमी. आयातीवर जगण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, अशी स्थिती! आयातीवर देश चालवणं शक्य नसतं. आथिर्क संतुलन आणण्यासाठी तेवढी निर्यातही करावी लागते. पण, देशवासीयांचं उत्पन्न वाढेल अशी क्षेत्रं निर्यातीसाठी निवडावी लागणार होती. या सगळ्या अडचणींचा विचार दक्षिण कोरियानं केला आणि ६०च्या दशकापासून औद्योगिक प्रगतीची चाकं धडाक्यात फिरवायला सुरुवात केली.

समुदकिनाऱ्याचा वापर करत जहाज बांधणी आणि सागरी वाहतुकीवर भर देण्यात आला. रासायनिक उत्पादन आणि त्यांची निर्यात वाढवली. त्याच बरोबरीनं इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निमिर्ती हाती घेण्यात आली. दक्षिण कोरियातील इलेक्ट्रॉनिक उत्पादनांनी जागतिक बाजारपेठेत स्पर्धा करून माकेर्ट काबिज करून टाकलं. ऑटोमोबाइल उद्योगानेही त्याचाच कित्ता गिरवला. हायटेक इंडस्ट्री विकसित झाली. आजघडीला जगात कुठल्याही देशाच्या बाजारपेठेत एलजी, सॅमसंग यासारख्या दक्षिण कोरियन कंपन्यांची इलेक्ट्रॉनिक उत्पादनं उपलब्ध आहेत. कार बनवणाऱ्या ह्युंदाईसारख्या कंपन्या जगभरातील मोठ्या ब्रँडपैकी एक आहेत.

ही सगळी औद्योगिक भरारी मारण्यासाठी दक्षिण कोरियाकडं मनुष्यबळ उपलब्ध होतं, ते मुबलक असल्यानं उत्पादनाचा खर्च तुलनेत कमी होता, त्याचा खूप मोठा फायदा दक्षिण कोरियानं करून घेतला. पण हे मनुष्यबळ कुशल असणं गरजेचं आहे, हेही जाणलं आणि शिक्षण क्षेत्राचा विकास केला. व्यावसायिक शिक्षणाची गरजही ओळखली. शिक्षणासाठी माहिती-तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे, हेही जाणलं. त्याचाही विस्तार केला. नऊ वषेर् शिक्षण सक्तीचं करण्यात आलं. आजघडीला शाळांमधील उपस्थिती ९५ टक्के आहे. देशातील साक्षरतेचं प्रमाण सुमारे ९८ टक्क्यांवर पोहोचलं आहे. जन्माला येताच मृत्यू होणाऱ्या अर्भकांचं प्रमाण १०००: ४.२५ इतकं कमी करण्यात यश आलं आहे.

देशाचा आथिर्क विकास करायचा तर निर्यातीशिवाय पर्याय नाही. त्यासाठी जगात स्पर्धा करू शकतील अशा दर्जाची आणि तुलनेत कमी किमतीची उत्पादनं बनवावी लागतील. त्यासाठी उच्च तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल. त्यासाठी कुशल कामगारही लागतील आणि त्यासाठी मनुष्यबळ विकासाशिवाय दुसरा मार्ग नाही, हे ओळखूनच दक्षिण कोरियानं आपला विकास घडवला आहे. तीन-चार दशकांपूवीर् भारतापेक्षाही कमी दरडोई उत्पन्न असणाऱ्या या देशाचं दरडोई उत्पन्न सद्यस्थितीला अन्य वीस श्रीमंत देशांइतकं आहे. आजघडीला भारताचं दरडोई उत्पन्न आहे सुमारे १,५०० डॉलर, तर दक्षिण कोरियाचं २०,००० डॉलर! अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेशी जोडल्या गेलेल्या जपान आणि चीनसारख्या देशांप्रमाणे दक्षिण कोरियाही अमेरिकेचा 'आथिर्क सहकारी' देश बनलेला आहे.

या देशापुढंही प्रश्न आहेत. काही वर्षांत दक्षिण कोरियाच्या अर्थव्यवस्थेचा वेग कमी होण्याची शक्यता आहे. लोकसंख्यावाढीचा वेग सुमारे १.५ टक्क्यांपर्यंत आला असल्यानं सध्या कमाल क्षमतेनं काम करणारी २०-४५ वयोगटातील तरुण लोकसंख्या कमी होत जाईल. त्याचा परिणाम उत्पादन क्षमतेवर होऊ शकेल. अशावेळी आथिर्क विकासाची नवी दिशा दक्षिण कोरियाला पकडावी लागेल.

सध्या भारतही जगातील सर्वात तरुण देशांपैकी एक आहे. त्याच्याही आथिर्क प्रगतीचा वेग दक्षिण कोरियाप्रमाणंच आठ टक्क्यांच्या आसपास राहिलेला आहे. पण भारतासमोरचा प्रश्न अधिक गंभीर आहे. दक्षिण कोरियाच्या शेतीवर फक्त ४ टक्के लोक अवलंबून आहेत, भारतात निम्मा देश! मूलभूत विकासाचे अनेक प्रश्न सुटलेले नाहीत. मनुष्यबळ विकासाचा अभाव ही सर्वात मोठी त्रुटी भारताच्या आथिर्क विकासात राहिलेली आहे. कुशल मनुष्यबळाची कमतरता हा भारताच्या विकासातील मोठा अडथळा आहे. आजही शाळा सोडण्याचं प्रमाण मोठं आहे. मुलींच्या शिक्षणाची समस्या आहे. प्राथमिक शिक्षणाची परवड झालेली आहे. लोकसंख्यावाढीचा वेग स्थिर व्हायला आणखी काही वर्षं लागतील. हे अडचणींचं गाठोडं घेऊन सध्या भारत धावतोय, पण या गाठोड्याची गाठ सोडवावी लागेल आणि त्यातल्या अनेक गोष्टींची व्यवस्था लावावी लागेल. तरच भारताला धावणं कायम ठेवता येईल

No comments:

Post a Comment