Total Pageviews

Saturday, 10 September 2011

TACKLING TERROR BY USA EDITORAL SAMANA

महासत्तेला घोरइस्लामी दहशतवादाने पुन्हा एकदा आपला हिरवा फणा वर काढला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आवारात बॉम्बस्फोट करून अनेक निरपराधांचे रक्त सांडल्यानंतर इस्लामी दहशतवादाने आमच्या सत्ताधार्‍यांच्या नाकावर टिच्चून येत्या मंगळवारी पुन्हा एकदा धमाका करू, अशी धमकी दिली आहे. इकडे हिंदुस्थानात ही स्थिती तर तिकडे अमेरिकेतही वेगळे नाही. ‘९/११’ च्या दहशतवादी हल्ल्याला उद्याच्या रविवारी १० वर्षे पूर्ण होत आहेत. ही ‘दशकपूर्ती’ साजरी करण्यासाठी अल कायदा या अतिरेकी संघटनेने वॉशिंग्टन किंवा न्यूयॉर्क या शहरांत बॉम्ब अथवा स्फोटकांनी भरलेल्या गाड्यांचा धमाका करून महासत्तेचे नाक कापण्याचा चंग बांधला आहे, अशी पक्की खबरच अमेरिकन गुप्तचरांच्या हाती लागली असून या संभाव्य हल्ल्याला तोंड देण्यासाठी बराक ओबामा यांचे सरकार सज्ज झाले आहे. ‘जनतेने जागरूक राहावे, पण काळजी करू नये. कारण जगातील सर्वोत्कृष्ट पोलीस आपल्याकडे आहेत’ असे आश्‍वासक आवाहन अमेरिकेच्या सत्ताधार्‍यांनी जनतेला केले. या आवाहनातच अमेरिकेची धमक दिसून येते. आपल्याकडे नेमकी याउलट स्थिती असते. देशात कुठेही दहशतवादी हल्ला झाला की आमचे लुंगीपुचाट गृहमंत्री ‘आम्ही तर राज्य सरकारला आधीच ऍलर्ट जारी केला होता’, अशी फुसकुली सोडून देतात. पुन्हा हल्ला झाल्यानंतर ‘हाय ऍलर्ट’ जारी केले जातात ते वेगळेच! ११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेवर झालेल्या हल्ल्यात तीन हजार लोक मारले गेले. त्यानंतर गेल्या १० वर्षांत अमेरिकेने आपल्या भूमीवर एकही अतिरेकी हल्ला होऊ दिला नाही. मात्र आता शत्रू अमेरिकेत घुसल्याची खबर मिळाल्याने महासत्तेलाही घोर लागला आहे. संपूर्ण अमेरिकेत अतिरेक्यांना शोधण्यासाठी कसून तपासण्या सुरू आहेत. दाढी-टोपीवाल्यांबरोबरच कुणाचाही मुलाहिजा न बाळगता झडत्या घेतल्या जात आहेत. याला म्हणतात ऍलर्ट! आमचे राज्यकर्ते यापासून काही बोध घेणार आहेत काय?

No comments:

Post a Comment