Total Pageviews

Thursday, 15 September 2011

INTERNATIONAL SHOOTER TEJASWINI SAWANT & HER DADDY

कोणत्याही पातळीवरील, देश-विदेशातील स्पर्धेत मेडल पटकावले की, पहिल्यांदा ‘डॅडीं’चा जल्लोष असायचा. अत्यंत उत्साहीपणे ते माझ्या यशाची बातमी सांगायचे. गेल्या दीड वर्षापासून ‘डॅडीं’चा हा जल्लोष थांबला आहे; पण त्यांनी दिलेली जिद्द, शिस्त आणि संस्कारांच्या शिदोरीवर ‘शूटिंग’मधील विविध स्पर्धांंच्या आव्हानांना सामोरे जात आहे.

कोल्हापुरात १२ सप्टेंबर १९८0 ला माझा जन्म झाला. रवींद्र नारायण सावंत हे माझे ‘डॅडी’ नेव्हीत असल्याने त्यावेळी ते याठिकाणी नव्हते. पण पहिली मुलगी झाल्याने त्यांनी खूप आनंद व्यक्त केल्याचे आई सांगते. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना १९८१ मध्ये ‘डॅडीं’नी नेव्हीमधील नोकरी सोडली आणि खासगी कंपनीमध्ये त्यांनी ‘इंजिनिअर’ म्हणून कामास सुरुवात केली. नेव्ही सोडली असली तरी त्यांनी आपली शिस्त कायम ठेवली होती. माझ्यासमवेत अनुराधा व विजयमाला या इतर दोन बहिणींना घेऊन ते दररोज पहाटे पाच वाजता धावण्यासाठी जात होते. इंग्रजी शिकण्यासह स्वत:चे व्यक्तिमत्त्व विकसित करण्यास ते विशेष महत्त्व देत होते. ‘करिअर’चे क्षेत्र कोणतेही निवडा; पण त्यामध्ये स्वत:ला सक्षमपणे सिद्ध करण्याचा त्यांचा शिरस्ता होता. आयुष्यातील कोणत्याही प्रसंगाला धाडसाने सामोरे जाण्याचे बळ त्यांनी आम्हाला दिले. मी ‘क्लासवन ऑफिसर’ व्हावे अशी त्यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी माझे ‘लॉ’साठी अँडमिशनही पक्के केले होते; पण मला खेळाची आवड होती. त्या दृष्टीने मी ‘लॉ’ सोडून एनसीसी जॉईन केली. आणि त्यातूनच माझे नेमबाजीतील ‘करिअर’ सुरू झाले. नेमबाजीत यशाचे एक-एक टप्पे गाठत असताना माझ्या पाठीशी ते ठामपणे उभे होते. राज्य शासनाच्या सेवेत मी ‘क्लासवन ऑफिसर’ व्हावे म्हणून त्यांनी मंत्रालयाच्या खूप पायर्‍या झिजविल्या. मी ‘क्लासवन ऑफिसर’ झाल्यानंतर ते खूप आनंदी होते. नेमबाजी स्पर्धा आणि सरावानिमित्त महिनोंमहिने मी घरापासून दूर असे. काही दिवसांसाठी घरी आल्यानंतर ‘डॅडी’ माझ्याशी नेमबाजीच्या सरावासह राजकीय, सामाजिक घडामोडींबाबत गप्पा मारायचे. इंग्रजी सुधारण्यासह जनरल नॉलेजची पुस्तकेही वाचायला ते आवर्जून सांगायचे.

‘डॅडीं’च्या निधनाची आठवण आली की, आपोआपच डोळे पाणावतात. आजारपणामुळे २३ फेब्रुवारी २0१0 रोजी ‘डॅडीं’चे निधन झाले, त्यावेळी दिल्लीत राष्ट्रकुल चॅम्पियनशिप स्पर्धा सुरू होती. त्यातच ‘डॅडीं’चे निधन झाल्याचा फोन आला. ‘डॅडी’ गेल्याचे समजले. त्यावेळी लगेच जाणे अपेक्षित होते; पण मी स्पर्धेत खेळले नसते तर, भारतीय संघ ‘राष्ट्रकुल’मधून ‘ड्रॉप’ होणार होता. अशा स्थितीत मी देशासाठी खेळण्याचा निर्णय घेतला. कारण ‘डॅडी’ पहिल्यापासून ‘करिअर’मधील ‘अँचिव्हमेंट’ करणार्‍या गोष्टींना प्राधान्य दे, असे सांगत होते. ‘डॅडीं’च्या निधनाचे दु:ख मनात साठवून मी स्पर्धेतील माझा ‘इव्हेंट’ यशस्वीपणे पूर्ण केला आणि २६ फेब्रुवारीला कोल्हापूर गाठून ‘डॅडीं’चे अखेरचे दर्शन घेतले. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये र्जमनीतील ‘म्युनिच’मध्ये जागतिक विजेतेपद पटकावल्यानंतर माझी कोल्हापूरकरांनी हत्तीवरून काढलेली मिरवणूक, मानाचा मिळालेला ‘अर्जुन’ पुरस्कार अथवा कोणत्याही स्पर्धेत यश मिळविल्यानंतर मी आनंदाने घरी आले की, ‘डॅडी’ नसल्याचे प्रकर्षाने जाणवते. माझ्या यशाच्या जल्लोषात ते नसल्याची जाणीव खूपच अस्वस्थ करते. त्यामुळे प्रत्येक यश मी ‘डॅडीं’च्या चरणी अर्पण करते. पितृपक्षातच नव्हे तर, क्षणोक्षणी मला ‘डॅडीं’ची आठवण येते. त्यांच्या मागे आता ‘डॅडीं’ची भूमिका माझी आई निभावत आहे.

No comments:

Post a Comment