भारत हा माझा देश आहे, अशी प्रतिज्ञा या देशातील प्रत्येकाने त्याच्या शालेय जीवनात घेतली आहे. ही प्रतिज्ञा अत्त्युच्च ध्येयनिष्ठेसाठी आणि राष्ट्रीय कर्तव्याप्रती प्रत्येकाला कटिबद्ध करत असली तरी वैयक्तिक जीवनात फार कमी मंडळी या प्रतिज्ञेनुसार जीवनात आचरण करत आहेत. हा देश जर माझा असेल, सारे देशवासीय माझे बांधव असतील तर देशात भ्रष्टाचाराने अकराळ विकराळ स्वरूप का धारण केले, या प्रश्नाचे उत्तर निराशजनक तितकेच संतापदायक मिळते. दक्षिण आफ्रिकेतील काही मागास राष्ट्रे हे बनाना कंट्री झाले आहेत. म्हणजेच, तिथे इतका भ्रष्टाचार माजला की सामूहिक सहजीवनच उद्ध्वस्त होऊन बसले. दुर्दैवाने राष्ट्रपिता महात्मा गांधी, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा हा देशही या देशांच्या पंगतीत जाऊन बसला आहे. देशात भ्रष्टाचाराचा भस्मासूर कधी नव्हे एवढा या दशकात फोफावला. गेल्या दहा वर्षांपासून देशात कॉंग्रेसच्या नेतृत्वातील संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारची सत्ता आहे. हा देश घडविण्यात कॉंग्रेसचा सिंहाचा वाटा आहे. बलाढ्य इंग्रजी सत्ता उलथवून टाकण्यासाठी गांधी विचारांच्या क्रांतीने देश पेटविला होता. हा गांधी विचारच कॉंग्रेसचा पाया राहत आला आहे. परंतु, क्रांती स्वतःचेच पिले खाते, असे म्हटले जाते; त्याचा अनुभव आजकाल येत आहे. ज्या कॉंग्रेसने देश घडविला तीच कॉंग्रेस सर्वाधिक भ्रष्टाचारी नेत्यांची जननी ठरली असून, क्रांती स्वतःची पिले खाते हे सिद्ध होत आहे. गेल्या दहा वर्षांतील भ्रष्टाचाराची पर्यायाने भ्रष्टाचारातून गोळा झालेल्या काळ्या पैशाची आकडेवारी वाचण्यात आली. ती अत्यंत धक्कादायक अशी आहे. देशभरात विविध घोटाळ्यांनी आणि भ्रष्टाचाराने किती रुपयांचे राष्ट्रीय नुकसान झाले असेल, याची ही आकडेवारी दी इंडिया डेली या दैनिकाच्या शनिवारच्या इंरनेट आवृत्तीत झळकली होती. हा आकडा आहे तब्बल १,५५५ हजार कोटी रुपये. जगात जो काही काळापैशाचा हिशोब जुळवला जात आहे, तो हिशोब १८८६ हजार कोटी रुपयांच्या वर जात नाही. परंतु, एकट्या भारतात केवळ भ्रष्टाचारात अडकलेला पैसा १,५५५ हजार कोटींचा आहे, हे अत्यंत धक्कादायक तितकेच संतापजनक वास्तव आहे. विशेष म्हणजे, हा पैसा अनैतिक मार्गाने देशाच्या बाहेर गेला असल्याचे इंडिया डेलीचे म्हणणे आहे. गेल्या दहा वर्षांपासून देशात सत्तेवर असलेल्या कॉंग्रेसच्या नेतृत्वातील यूपीए सरकारच्या काळातच हा भ्रष्टाचार फोफावला असून, यापूर्वीच्या भ्रष्टाचारापेक्षा तब्बल २६० पटींनी भ्रष्टाचार केवळ या सरकारच्याच काळात वाढला. भारतात कमावलेला काळा पैसा (म्हणजे, अवैध मार्गाने व करचुकवेगिरीकरून जमा केलेला पैसा) हा देशातील भ्रष्टाचार्यांनी अनैतिक मार्गाने देशाबाहेर पाठविला. ही रक्कम तब्बल ३४५ बिल्यीयन डॉलर्स म्हणजेच १,५५५ हजार कोटी रुपये एवढी आहे. तर जगभरातील काळा पैसा हा ४१९ डॉलर्स बिल्यीयन म्हणजेच १,८८६ हजार कोटी रुपये एवढा होतो. देशातील पैसा अशाप्रकारे बाहेर गेल्याने त्याचा देशाच्या एकूण सकल उत्पादनावर मोठा घातक परिणाम झाला असून, अतोनात राष्ट्रीय हानी झाली आहे. हा पैसा देशात राहिला असता, तर तो राष्ट्रीय विकासात कामी आला असता, तसेच विविध सोयीसुविधांसाठी वापरून देशवासीयांचे जीवन सुखकर करता आले असते. पुणे येथील इंडिया फोरेन्सिक या खासगी कंपनीनेदेखील देशातील भ्रष्टाचाराचा अभ्यास केला. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी)च्या धर्तीवर या कंपनीने केलेल्या अभ्यासाची आकडेवारीदेखील अत्यंत धक्कादायक अशी आहे. २००० ते २००९ या नऊ वर्षांच्या काळात भ्रष्टाचाराची ७० हजार ७७३ प्रकरणे देशभरात दाखल झाली होती. या सर्व प्रकरणांत देशाचे तब्बल २२ हजार ५२८ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. अर्थात, हे गुन्हे भ्रष्टाचार, घोटाळे, गैरव्यवहार आणि अपहार अशा प्रकारचे होते. इंटरनॅशनल मॉनेटरी फंडच्या अंदाजानुसार जगाच्या एकूण सकल उत्पादनाच्या दोन ते पाच टक्के एवढा काळा पैसा भारतात आहे तर दुसरी अत्यंत धक्कादायक बाब अशी आहे, की गेल्या दशकात देशाची लोकसंख्या १.०१६ बिल्यीयन (१०१ कोटी) वरून १.१५५ बिल्यीयन (११५ कोटी) एवढी झाली आहे. तर देशातील भ्रष्टाचार १,५५५ हजार कोटी रुपये एवढा झाला. म्हणजेच, दहा वर्षांपूर्वी प्रत्येक व्यक्तीच्या खिशातून भ्रष्टाचारापोटी ८३६ रुपयांची रक्कम लुटल्या गेली असताना, आता ही लूट २ हजार २१८ रुपये प्रतिवर्ष एवढी होऊन बसली आहे. देशातील भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी थोर गांधीवादी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे आता शांततापूर्ण मार्गाने आंदोलन छेडते झाले आहेत. त्यांच्या आंदोलनात सहभागी होणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य का आहे, याचे उत्तर येथेच मिळते. मला काय त्याचे हा विचार केला तर भ्रष्टाचाराचा भस्मासूर आता केवळ उंबरठ्यावरच नाही तर तो प्रत्येकाच्या डोक्यावर येऊन बसला आहे. सध्या तरी प्रतीवर्ष २२१८ रुपये एवढा पैसा प्रत्येकाच्या खिशातून भ्रष्टाचार्यांच्या खिशात गेला. आपण असेच गाफिल राहिलो तर ही रक्कम वाढत जाऊन उद्या सर्वांचेच खिसे खाली होतील. भारत माझा देश आहे, ही प्रतिज्ञा नव्हे तर शपथ आहे. ही शपथ घेऊनच या देशासाठी भ्रष्टाचाराविरुद्ध पेटलेली क्रांतीची मशाल आता पेटती ठेवावी लागेल. कॉंग्रेस सरकार हे भ्रष्टाचाराला खतपाणीच घालत नाही तर भ्रष्टाचार्यांना पाठिंबा देणारेदेखील आहेत. याचाच अर्थ भारतीय जनता पक्ष किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)चे घटक पक्षही फार चांगले आहेत, असे म्हणता येणार नाही. कुणीही धुतल्या तांदळासारखे नसल्याने प्रत्येकानेच जागृत होणे ही काळाची गरज आहे
No comments:
Post a Comment