माया मेमसाब
ऐक्य समूह
Friday, September 09, 2011 AT 12:17 AM (IST)
Tags: lolak
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांना आपल्या विरोधात कुणीही काहीही अगदी विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सुध्दा ब्र शब्द काढलेले चालत नाहीत. त्यांच्या कारभारावर, हुकूमशाही राजवटीवर कुणी टीका केल्यास त्या भडकतात. संतापाने थयथयाट करतात आणि आपल्यावर टीका करणारे नेते "दलित विरोधी' असल्याचा प्रति हल्लाही चढवतात. त्यांच्या मुलूखमैदान तोफेच्या तडाख्यातून समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंग यादव, अमरसिंह, माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह, राहुल गांधी, सोनिया गांधी असे बडे नेतेही सुटलेले नाहीत. "मी सांगेन ते धोरण आणि बांधीन ते तोरण' असा त्यांच्या कारभाराचा खाक्या आहे. राज्य सरकारच्या तिजोरीतून हजारो कोटी रुपये खर्च करून त्यांनी बांधलेली लखनौ नोएडा शहरातील स्मारके-उद्यानांची प्रकरणे गाजली. न्यायालयातही ही प्रकरणे पोहोचली. पण त्या डगमगल्या नाहीत. या उद्यानात त्यांनी आपले आणि बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशीराम यांचे पुतळे सरकारी खर्चाने बसवून घेतले. या स्मारकांच्या सुरक्षिततेसाठी वार्षिक शंभर कोटी रुपये त्यांच्या सरकारने मंजूरही करून टाकले.
मायावती बोले आणि दल हले, अशी त्यांच्या सरकारची-सहकाऱ्यांची स्थिती आहे. त्यांना पक्षात-सरकारमध्ये कुणीही विरोध करायचे धाडस दाखवत नाही. लखनौच्या त्यांच्या अलिशान बंगल्याची डागडुजीही वीस कोटी रुपयांच्या सरकारी निधीतून झाली. दरवर्षी त्यांच्या सुरक्षिततेसाठी सरकार 46 कोटी रुपयांचा खर्च करते. पण तरीही त्यांना कुणी जाब विचारलेेले आवडत नाही. विरोधी पक्षांनी टीका करून उपयोगही होत नाही. विकीलिक्सचे संपादक ज्युलियन असेंजे यांनी गेल्याच आठवड्यात वेबसाईटवर प्रसिध्द केलेल्या, अमेरिकन दूतावासाच्या पत्रातला मजकूर मायावतींना प्रचंड झोंबला. आपल्या आवडीच्या सॅंडल्स आणायसाठी त्यांनी खास विमान मुंबईला पाठवले होते. आपल्याला विषबाधा होईल, असा सततचा संशय त्यांना असल्यामुळेच, त्यांच्या मुदकाम खान्यात 9 स्वयंपाकी आहेत आणि अन्नाची चव घेणारी 7 माणसे आहेत, असे अमेरिकन दूतावासाने 2007 मध्ये आपल्या प्रशासनाला कळवल्याचे हे पत्र आहे. ब्राह्मण आणि दलित असे सामाजिक, राजकीय अभिसरण निर्माण करून मायावतींनी गेल्यावेळी विधानसभेच्या निवडणुका जिंकल्या. सतीशचंद्र मिश्रा हे त्यांचे अत्यंत विश्वासातले तेव्हापासूनचे सहकारी. पण त्यांनीही मायावती हुकूमशहा असल्याचे म्हटल्याचे, दूतावासाच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
असांजे यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे बहेन मायावती चांगल्याच भडकल्या. असांजे याला वेड लागले आहे, त्याला वेड्यांच्या दवाखान्यात उपचारासाठी पाठवायला हवे, युरोपात वेड्यांचा दवाखाना नसल्यास त्याला लखनौला पाठवावे, आपण त्याच्यावर उपचार करू, असे मायावतींनी सुनावले. असांजे हे काही मायावतींच्या असल्या दमबाजीच्या आणि धमक्यांना घाबरणारे पत्रकार नाहीत. त्यांनी जगातल्या अमेरिकन दूतावासाने पाठवलेली कागदपत्रे फोडून, अमेरिकन दूतावासालाही घाम फोडला. साऱ्या जगावर दादागिरी करणाऱ्या या महासत्तेने त्यांच्यासमोर हात टेकले. तेव्हा मायावतींच्या या असल्या धमक्यांना भीक घालतील तर ते असांजे कसले? आपण मायावतींच्या त्या सॅंडल विमानाचा गौप्यस्फोट केला, तो अमेरिकेच्या कागदपत्राच्या आधारे. मायावतींनी अमेरिकन प्रशासनाला जाब विचारावा, सॅंँडलच्या त्या गौप्यस्फोटाने मायावतींच्या भावना दुखावल्या असतील तर, आपण खेद व्यक्त करतो. त्यांनी लंडनला विमान पाठवल्यास तेथून सॅंडल घेवून लखनौला येतो, त्यांनी विमान पाठवावेच, अशा शब्दात त्यांच्या हल्ल्याचा समाचार घेतला. असांजे हे काही मायावती म्हणतात म्हणून वेडे होत नाहीत. त्यांनी गेल्या दोन वर्षात अमेरिकेसह काही अन्य देशांची लाखो गुप्त कागदपत्रे फोडल्यामुळे भल्याभल्यांना वेड लागायची वेळ मात्र आली. सध्या जगाच्या राजकारणात वेड्यांना खूपच भाव आलेला दिसतो. भारतात आणि इंग्लंड, अमेरिकेतही प्रतिस्पर्ध्यांना वेडे ठरवायची नवीच राजकीय मोहीम सुरु झाली आहे. लिबियाच्या हुकूमशहा गडाफीलाही पाश्चात्त्य राष्ट्रांनी केव्हाच वेडे ठरवले होते. पण त्याने सत्ता सोडायला नकार देत, बंडखोरांशी युध्दाचा पवित्रा घेतला आणि सहा महिने हा वेडा काही अद्यापही युध्द थांबवायला तयार नाही. यापूर्वीही हिटलर, मुसोलिनी, टोजो, या हुकूमशहांना इतिहासकारांनी, जागतिक नेत्यांनी वेडे ठरवले होतेच. पण त्यांच्या वेडाची मोठी किंमत जगालाही मोजावी लागली असती. असांजे वेडा आहे की नाही, हे माहिती नाही. तो वेडा नसावा, पण कॉंग्रेस पक्षात मात्र दिग्गविजय सिंह यांच्यासह वाचाळवीर वेड्यांनी भारतीय राज-कारणात जनतेची फुकटची करमणूक सुरु
ठेवली, एवढे मात्र खरे!
- वासुदेव कुलकर्णी
No comments:
Post a Comment