Total Pageviews

Wednesday, 14 September 2011

FAKE POLICE


पोलीस डायरी
लाल, पिवळ्या दिव्यांची खुली विक्री
तोतया पोलीस व सीबीआय अधिकार्‍यांना कसे रोखणार?
ठाणे जिल्ह्यातील वसई तालुक्यात राहणारा रॉयल एडवर्ड सिक्वेरा ऊर्फ रॉय हा एसएससी नापास! परंतु प्राथमिक शिक्षण इंग्रजी शाळेत पार पडल्याने तो उत्तम इंग्रजी बोलतो. सहा फूट उंची व शरीरयष्टी मजबूत असल्याने तो प्रथमदर्शनी पोलीसच वाटतो. याचाच फायदा रॉयने घेतला. शिक्षण कमी असल्याने त्याला कमी पगाराच्या नोकर्‍या मिळायच्या, त्यात त्याचे काही भागायचे नाही. त्यामुळे त्याने पोलीस असल्याचे भासवून गरीब-श्रीमंतांना लुटण्यास सुरुवात केली. काळबादेवी येथे एक आंगडिया कंपनीचा नोकर आपल्या मालकाचे पैसे एका बॅगेतून घेऊन जात असतानाच रॉयने त्याच्या खांद्यावर हात टाकला, ‘‘बॅग में क्या है? खोल के दिखाव,’’ असे बोलल्यावर तो नोकर बावरला आणि म्हणाला, ‘‘मालिक के पैसे है. एक पार्टी को देना है।’’ त्यावर रॉय म्हणाला, ‘‘मी क्राइम ब्रँचचा अधिकारी आहे. मला पैसे कुठे घेऊन जातोस, कसले पैसे आहेत याचा नीट खुलासा कर. नाहीतर तुला मला पोलीस ठाण्यात घेऊन जावे लागेल.’’ असे बोलल्यावर तो नोकर अधिक घाबरला. त्याने मालकाशी मोबाईलवरून संपर्क साधला, परंतु संपर्क काही झाला नाही. तेव्हा रॉयने त्याच्या हातातील बॅग हिसकावून त्याला पैशांची पावती घेऊन कुलाबा पोलीस ठाण्यात ये, असे सांगितले. त्याप्रमाणे दमदाटीनंतर नोकर निघून गेला. रॉयला घबाडच मिळाले. त्याने आपल्या घरी जाऊन बॅग उघडली असता त्याला हर्षवायूच झाला. त्यात ३० लाख रुपये रोकड आढळून आली. हे सारे पैसे त्याने व त्याच्या अन्य दोन साथीदारांनी वाटून घेतले आणि ऐश केली. दारू पिऊन बारमध्ये उडविले. ३० लाख रुपये पोलीस असल्याचे सांगून जप्त करण्यात आल्यानंतरही त्या पैशांची मालकाने कुठेही पोलीस ठाण्यात चौकशी अथवा तक्रार केली नाही. त्यामुळे रॉयचे धाडस वाढले. पोलीस असल्याचे भासवून त्याला पहिल्याच प्रयत्नात ३० लाख रुपये मिळाले होते. ३० लाखांच्या लॉटरीनंतर त्याने पोलिसांचा खाकी ड्रेस भाड्याने विकत घेतला. तो अंगावर चढवला. त्याचा फोटो काढला. पोलीस अधिकारी असल्याचे बनावट ओळखपत्रही तयार केले. या बनावट आयकार्डवर नंतर मात्र त्याने हवालाचा व्यवहार करणार्‍या व्यापार्‍यांना पोलीस असल्याचे भासवून असंख्य वेळा लुटले. लॉज व हॉटेलमध्ये जाणारी प्रेमीयुगुले व लफडेबाजांनाही सोडले नाही. त्यांनाही ‘केस’ करावी लागेल असे सांगून फावल्या वेळात लुटले आहे. अशा गुन्ह्यांचीही कुठे पोलीस दफ्तरी नोंद नाही असे लक्षात आल्यावरच रॉयने लॉजमध्ये जाणार्‍यांना लुटण्यास सुरुवात केली होती. फावल्या वेळात रॉय फरफोड्याही करायचा. रस्त्यात गाड्या अडवून पोलीस असल्याचे सांगायचा आणि गाडीचालक, मालक व प्रवाशांना हायवेवर लुटायचा. अशा या पन्नासहून अधिक केसेस असलेल्या खतरनाक तोतया पोलिसाला अटक करण्यात मुंबई गुन्हे शाखेच्या जबरी चोरी व दरोडाविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रफुल्ल भोसले व त्यांच्या सहकार्‍यांना गेल्या आठवड्यात यश आले आहे, परंतु रॉयसारखे तोतये पोलीस आज पदोपदी असून त्यांना हेरून गजाआड करणे आवश्यक आहे. पोलीस आहे म्हटल्यावर प्रत्येक माणसाची पाचावर धारण बसते. त्याचाच फायदा रॉयसारख्या गुन्हेगारांनी घेतला आहे.
मुंबई गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त हिमांशू रॉय, देवेन भारती, निसार तांबोळी यांच्या पथकाने पोलीस असल्याचे भासवून लूटमार करणार्‍या रॉय व त्याच्या साथीदारांना गजाआड केले असतानाच सीबीआयनेही सीबीआय असल्याचे भासवून कर चुकविणार्‍या बड्या व्यापार्‍यांना लुटणार्‍या राजेश रंजन व अश्‍विनीकुमार शर्मा या तोतया सीबीआय अधिकार्‍यांना नुकतीच अटक केली आणि त्यांच्या कार्यपद्धतीचा पर्दाफाश केला. राजेश हा मूळचा बिहारचा असून त्याने मार्केटिंगमध्ये एमबीए केले आहे. पटना इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो वांद्रे येथील अरविंद मिलमध्ये सेल्स अधिकारी म्हणून काम करीत होता. अश्‍विनीकुमार मात्र केवळ दहावी पास आहे. अश्‍विनकुमार, राजेश व त्यांचा एक अन्य साथीदार अनिरुद्ध अग्रवाल अशा तिघांनी सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून अनेक बड्या व्यापार्‍यांना, राकेश रोशनसारख्या सिनेकलावंतांना करोडो रुपयांना गंडा घालून स्वत:ची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता बनविली. मुंबई, दिल्ली, हरयाणा, गुजरात आदी ठिकाणी फ्लॅट, प्लॉट खरेदी केले. अश्‍विनीकुमारच्या पानिपत येथील बँकेच्या लॉकरमध्येच सीबीआयला २५ किलो सोने, ३ कोटी रुपयांची रोकड सापडली. चोरावर मोर बनायचा, हपापाचा माल गपापा करण्याचा हा तोतयेगिरीचा धंदा सध्या सर्वत्र जोरात सुरू आहे. सीबीआय अधिकारी म्हणवून घेणारे हे त्रिकूट आपल्या गाडीवर लाल, पिवळा दिवाही लावून फिरायचे, तर रॉयने खाकी गणवेष व ओळखपत्र बनविले होते. आपल्याकडे कर बुडविणारे, गैरधंदे करणारे व काडीचीही जागृतता नसणारे लोक अधिक आहेत. असे लोक साध्या वेषात पोलीस असल्याचे सांगणार्‍यांवर घाबरून पटकन विश्‍वास ठेवतात आणि फसतात. याला खरे पोलीस तरी काय करणार? ‘पुढे दंगल सुरू आहे, खून झाला आहे, आपल्या अंगावरील दागिने काढून पिशवीत ठेवा’ असे सांगितल्यावर महिला विश्‍वास कसा ठेवतात? याला जबाबदार आपलेच लोक आहेत. दागिन्यांचे भाव गगनाला भिडले असताना त्याचे गळ्यात घालून जाहीर प्रदर्शन करणे म्हणजे दरोडेखोरांना आमंत्रण देण्यासारखेच आहे. दहा वर्षांपूर्वी अतिरेक्यांनी लाल दिव्याच्या सरकारी गाडीचा वापर करून दिल्लीत संसदेवर हल्ला केला. ते लाल, पिवळे दिवे आज कुठेही उपलब्ध होतात. पोलिसांचे खाकी गणवेषही कुठेही शिवून मिळतात. हे आता कुठेतरी थांबले पाहिजे. लाल, पिवळे दिवे विकण्यास व पोलिसांचे खाकी गणवेष शिवून देण्यावर कुठेतरी बंधने आली पाहिजेत. नाहीतर संसदेसारखा हल्ला पुन्हा कुठेही होऊ शकतो हे राज्यकर्त्यांनी लक्षात घ्यावे.

No comments:

Post a Comment