Total Pageviews

Monday, 12 September 2011

CELEBRATING GANESH CHATURTHI BALANCE REQUIRED

उत्सवाच्या उन्मादातून निर्माण झालेले कोणतेही विघ्न उद्भवले नाही, हे यंदाच्या गणेशोत्सवाचे वैशिष्टय़ मानावे लागेल. न्यायालयाने आदेश देऊनही यंदाच्या उत्सवात ध्वनिप्रदूषणाच्या मर्यादेचे पालन मात्र झाले नाही.
महाराष्ट्राचे आराध्यदैवत मानल्या जाणा-या विघ्नहर्त्यां गणरायाचा उत्सव पारंपरिक उत्साह आणि जल्लोषात पार पडला. पुढच्या वर्षी लवकर या..अशी साद घालीत भक्तांनी गणरायाला निरोप दिला आणि नवरात्रोत्सवाचे ढोलताशे वाजायला सुरुवात झाली. उत्सवाच्या उन्मादातून निर्माण झालेले कोणतेही विघ्न यंदा उद्भवले नाही, हे यंदाचे वैशिष्टय़ मानावे लागेल. मुंबईत 13 जुलैला झालेले बॉम्बस्फोट आणि ऐन गणेशोत्सवाच्या काळातच नवी दिल्लीत उच्च न्यायालयासमोर झालेल्या बॉम्बस्फोटामुळे उत्सवावर दहशतवादाच्या काळ्या सावल्या होत्या. त्यादृष्टीने धोक्याचा गंभीर इशाराही जारी करण्यात आला होता. अशा कोणत्याही भीतीला पाठ न दाखवता तिचा धैर्याने मुकाबला करण्यात आपली बरोबरी कुणी करू शकत नाही. विघ्नहर्त्यां गणरायावरील श्रद्धेमुळेच हे बळ मिळत असावे. म्हणूनच गतवर्षी उत्सवाआधी दोन दिवस मुंबईत दोन दहशतवादी घुसल्याची बातमी सोडून मुंबई पोलिसांनी भक्तांना घाबरवण्याचे प्रयत्न केले होते, त्याला दाद न देता लाखो भाविक दर्शनासाठी बाहेर पडले होते. यंदाही लालबागच्या राजाच्या दर्शनाची रांग गेल्या वर्षीपेक्षा लांब गेली होती.  कशावरच विश्वास राहिलेला नाही, त्यामुळे शेवटचा भरवसा म्हणून लोक देवाच्या चरणी जात आहेत, परिणामी धार्मिक उत्सव मोठे होत चालले असल्याचे मानण्याजोगी परिस्थिती आहे. या एकूण परिस्थितीत लोकांना ताळ्यावर ठेवण्याचे काम प्रसारमाध्यमांनी करण्याची आवश्यकता आहे. परंतु इलेक्ट्रॉनिक आणि मुद्रित अशी सारीच प्रसारमाध्यमे विवेक गमावून बसली आहेत. अण्णा हजारे यांनी केलेले उपोषण असो किंवा लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी लागलेली रांग, सगळे एकाच मापाने मोजले जाते. म्हणूनच तर लालबागच्या राजाचा नवसाला पावणाराअसा अखंडपणे प्रचार करून लोकांना मंडपाकडे अधिकाधिक संख्येने खेचण्याची स्पर्धा लागते. लालबागचा राजा खरोखर नवसाला पावतो, तर मग विसर्जन मिरवणुकीवेळी गॅलरी कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि काही लोक जखमी झाले; त्या लोकांवर लालबागच्या राजाचे दर्शन घेत असताना आपत्ती का कोसळली, हा प्रश्न कुठल्याही वाहिनीने उपस्थित केला नाही. उत्सव ही आनंददायी बाब असते. परंतु कोणत्याही गोष्टीतून मिळणारा आनंद हा सर्वाना मिळणारा असावा. लोकांकडून जमवलेल्या वर्गणीतून रोषणाई, गुलाल, फटाके, बँजो, डीजे अशी उधळपट्टी करून ठराविक लोकांनी केलेला धागडधिंगा म्हणजे आनंद नव्हे. गणेशोत्सवाच्या काळात होणा-या ध्वनिप्रदूषण आणि पाणीप्रदूषणा संदर्भात गेल्या अनेक वर्षापासून चर्चा होत आहे. परंतु लोकांकडून जमवलेल्या वर्गणीच्या पैशातून झगमगाट करणा-यांना त्याची दखल नाही. न्यायालयाने आदेश देऊनही यंदाच्या उत्सवात ध्वनिप्रदूषणाच्या मर्यादेचे पालन झाले नाही. शांतता क्षेत्रात आवाजाची पातळी दिवसा 50 व रात्री 40 डेसिबल असणे आवश्यक असते. प्रत्यक्षात एसएनडीटी विद्यापीठ (जुहू), आशा पारेख रुग्णालय (सांताक्रूझ), सिद्धिविनायक मंदिर, महालक्ष्मी मंदिर, ऑपेरा हाऊस आदी ठिकाणी 98 ते 105 डेसिबल आवाज नोंदवण्यात आला. मुंबईतील कोणत्याही चुकीच्या गोष्टीचे अधिक वाईट प्रमाणात अनुकरण करणा-या ठाण्यातही ध्वनिप्रदूषणाने शंभरी ओलांडली. सातत्याने कानावर पडणा-या आवाजाने कायमचे बहिरेपण येते. चिडचिडेपणा वाढतो. रक्तदाब वाढून हृदयरोगाला आमंत्रण मिळते. हृदयरोग असणारी व्यक्ती दगावूही शकते. मानसिक संतुलन बिघडते. असे अनेक धोके वैद्यकशास्त्रातील तज्ज्ञ वारंवार सांगतात, त्याचा कोणताही परिणाम उत्सव साजरा करणा-यांवर दिसून येत नाही. उत्सवाच्या नावावर राजकीय दुकानदारी चालवणा-यांच्या संरक्षणाखाली बिनबोभाटपणे सारे सुरू असते. ज्यांना आपल्या बंगल्याच्या आवारात कुत्री भुंकल्याचा त्रास सहन होत नाही, असे नेते उत्सवातील धागडधिंग्याचे समर्थन करून त्याला धार्मिक रंग देतात. डोळ्यावर कातडे ओढलेल्या आणि कानात बोळे घातलेल्या अशा लोकांसाठी बुद्धी घेऊन पुढच्या वर्षी लवकर या, एवढीच प्रार्थना करणे आपल्या हाती उरते

No comments:

Post a Comment