Total Pageviews

Wednesday, 12 October 2011

UNCIVILIZED COMMENTS BY POLITICIANS

तो संस्कार कुठे लोपला?..
(लोकशाही ही केवळ एक राज्यपद्धती नाही, तो सभ्यतेचा सामाजिक संस्कारही आहे ही बाब राज्यशास्त्र एकेकाळी आपल्या विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवीत असे. देशाच्या राजकारणाने गाठलेली असभ्य व अमंगळ पातळी पाहत असलेल्या विद्यार्थ्याचा त्या शास्त्राच्या या शिकवणुकीवरील विश्‍वास उडावा अशीच सध्याची अवस्था आहे. ‘अण्णांचे डोके तपासले पाहिजेहे दिग्विजयसिंग या कॉंग्रेसच्या राष्ट्रीय सचिवाने म्हणायचे आणि दिग्विजयसिंगांना वेड्यांच्या इस्पितळात पाठविले पाहिजेअसा सल्ला केजरीवालांनी द्यायचा हे यातले काही नमुने. विरोधी पक्षांनी अण्णा हजारे यांना राष्ट्रपतीपदाची लाच देऊ केली आहे हा दिग्विजयजींचा ताजा शोध आणि कपिल सिब्बल व चिदंबरम यांची खरी जागा तुरूंगात आहे हे अण्णांचे सांगणे यांचीही पातळी त्याच नमुन्याची आहे. या सार्‍यावर नवी कडी नितीन गडकरी या भाजपाच्या ताज्या पुढार्‍याने पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना यात्रेवर जाण्याचा दिलेला सल्ला ही आहे. मनमोहन सिंग आणि लालकृष्ण अडवाणी हे देशाचे सर्वाधिक ज्येष्ठ, अनुभवी व कार्यक्षम नेते आहेत. दिवसाचे १८ तास ते देशाच्या सेवेत घालवीत असलेले जगाने पाहिले आहे. त्यातही अडवाणींनी त्यांच्या चौथ्या रथयात्रेची तयारी करून सार्‍या राजकारणाला अचंबित केले आहे. अडवाणींची यात्रा हा आपल्याला मिळालेला वॉकओव्हर आहे असा समज करून घेणार्‍या पुढार्‍यांनी पंतप्रधानांनाही यात्रेवर जायला सांगण्याचे केलेले औद्धत्य त्याचमुळे अगोचर ठरावे असे आहे. आपले वय, अनुभव, ज्येष्ठता आणि एकूणच राजकीय वकूब विसरणारी माणसे अशी बोलताना व वागताना दिसली की तो त्यांच्या चाहत्यांएवढाच सार्‍यांना हताश करणारा प्रकार होतो.
काही वर्षांपूर्वी अटलबिहारी वाजपेयींना, तुम्ही ब्रह्मचारी असतानाही तुम्हाला जावई कसा, असा अत्यंत उपर्मदकारक प्रश्न संसदेत विचारण्याचा हुच्चपणा एका मंत्र्याने केला तेव्हा त्या प्रश्नाने एकटे वाजपेयीच नाही तर सारा देश घायाळ झाला होता. कॉंग्रेसच्या प्रवक्त्याने त्या विषयीची दिलगिरी व्यक्त करण्याचे सौजन्य तेव्हा उशीरा का होईना दाखविले होते. आपले राजकारण या अभद्र व पोरकट पातळीवर कधी आले याचा शोध घेणे अवघड नाही. राजीव गांधींविरुद्ध विश्‍वनाथ प्रताप सिंगांनी बोफोर्सची तोफ डागली तेव्हाचा त्यांचा प्रचार अतिशय धारदार व टोकाचा होता. मात्र त्यात विश्‍वनाथजींकडून राजीव गांधींचा व्यक्तीगत उपर्मद घडल्याचे कधी दिसले नाही. आणीबाणीत इंदिरा गांधींनी विरोधी पक्षाच्या लाखभर लोकांना तुरूंगात डांबले. तेव्हाही त्या नेत्यांनी इंदिरा गांधींविषयी अपशब्द काढल्याचे वा त्यांचा उपर्मद करणारा सल्ला दिल्याचे दिसले नाही.
संसदेतली भाषणे एकेकाळी रंगत. आजच्यासारखे नुसतेच आरोपपत्र ठेवणे व त्यावर शिरा ताणून बोलणे तेव्हाही होते. पण त्या सार्‍याला सौजन्याची किनार होती. विरोधकांचे कौतुक होते, सरकारचे अभिनंदन करण्याचे खिलाडूपण होते. वाजपेयींचे परराष्ट्र व्यवहारावरचे भाषण ऐकून -हा तरूण एक दिवस देशाचा पंतप्रधान होईल- हे भाकित जाहीररित्या करण्याएवढे मोठेपण नेहरूंत होते आणि इंदिरा गांधींनी बांगला विजय मिळवला तेव्हा त्यांना दुर्गा म्हणून गौरविण्याएवढे मोकळेपण वाजपेयींतही होते.. आपल्या राजकारणात सौजन्याला दुबळेपण समजण्याचा आणि खिलाडूपणाला संशयाचा रंग देण्याचा अतिरेक कधी सुरू झाला? अधिकाधिक टोकाचे व उपर्मदकारक शेरे मारायचे, सिद्ध करावे लागत नसलेले आरोप लादायचे, पुढच्या माणसाचे वय आणि ज्येष्ठता विसरून आपले शैशव नको तसे प्रगट करायचे याही प्रकाराची सुरूवात येथे कधी झाली?

आमचा उमेदवार दुसर्‍या महायुद्धात देशासाठी लढत असताना तुमचा उमेदवार कुठे होताअसा प्रश्न १९६0 च्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमॉक्रेटिक पक्षाच्या एका प्रचारकाने रिपब्लिकन पक्षाला विचारला. तेव्हा त्याविषयीचा जाहीर खेद व्यक्त करायला डेमॉक्रेटिक पक्षाचे उमेदवार जॉन केनेडीच पुढे आले आणि त्यांनी थेट निक्सन या आपल्या प्रतिस्पध्र्याची त्यासाठी क्षमाही मागितली. असे प्रसंग राजकारणाचा डौल राखतात आणि लोकशाहीची अभिरुची व प्रतिमाही संपन्न करतात. वाजपेयींच्या अत्यवस्थ अवस्थेत डॉ. मनमोहन सिंग व सोनिया गांधी यांनी इस्पितळात जाऊन त्यांची चौकशी करणे किंवा अडवाणींनी आपले आत्मचरित्र सोनिया गांधींना त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट देणे हे प्रकार आपल्याकडेही झाले नाहीत असे नाही. पण आताशा ते सारेच विस्मृत म्हणावे एवढे काळाच्या पडद्याआड गेले वा विरळ झाले आहेत.
१९७५ च्या आणीबाणीनंतरची एक आठवण तर आजही अनेकांची मने पालवणारी आहे. आणीबाणीतला तुरूंगवास अनुभवल्यानंतर, त्या काळात आपली स्वादुपिंडे निकामी झाल्याचे लक्षात आल्यानंतर व १९७७ च्या निवडणुकीत इंदिरा गांधींचा पराभव करून त्यांच्या वाट्याला विजनवास आल्यानंतर जयप्रकाशजी त्यांना भेटायला गेले होते. त्या भेटीत ते इंदिरा गांधींना म्हणाले, ‘मैं इंदिरा गांधी से नही, मेरी इंदूसे मिलने आया हूं’ .. असे जयप्रकाश प्रत्येक दशकात कुठून जन्माला येणार?
जयप्रकाशांवर कॉंग्रेसचे प्रवक्ते देशद्रोहाचा अतिशय हीन आरोप करीत असतानाही तेव्हाच्या विरोधकांना जो संयम राखता आला तो सध्याच्या राजकारणाला दाखविता न येणे ही राजकारणाचे बालिशपण व लोकशाहीची अधोगती सांगणारी बाब आहे. डॉ. मनमोहन सिंगांकडून सार्‍या जगाला आर्थिक मार्गदर्शनाची गरज आहे असे बराक ओबामांसारखा नेता म्हणत असताना त्यांना यात्रेवर जायला सांगणार्‍यांचे धाडस एखादा देशी पुढारी करीत असेल तर तो आपल्याएवढेच आपल्या पक्षाचेही वजन कमी करीत असतो. एकेकाळी राजकारणात असे बोलणार्‍यांना टोकणारी वजनदार माणसे होती. पं. नेहरूंनी ते केले. वाजपेयींना ते करता आले, शास्त्रीजींनी ते न बोलता कृतीतून केले. आता तसे टोकणे इतिहासजमा झाले आहे. तेवढय़ा वजनाची माणसेही आता राजकारणात उरली नाहीत. राजकारण हे युद्ध आहे आणि युद्धात सारे काही क्षम्य असते असे म्हटले जाते. पण भारतातील युद्धाच्या परंपराही थोरवीच्या आणि ऐन युद्धगर्दीत वडिलधार्‍यांचा आदर करणार्‍या आहेत. ज्यांना त्यांचा विसर पडतो त्यांनी या परंपरेवरही फारसा हक्क सांगू नये. देशाच्या सांसदीय लोकशाहीला साठ वर्षे पूर्ण झाली. एवढय़ा वर्षांत येथील राजकारणाला किमान काही प्रगल्भपण तिने नक्कीच शिकविले असणार. ही शिकवण ज्यांच्या गळी उतरली नाही वा ज्यांना ती समजून घेण्याची इच्छा नाही त्यांच्या वाटचालीवर विशेष लक्ष देणे ही देशाची सांस्कृतिक गरज आहे.

No comments:

Post a Comment