Total Pageviews

Thursday, 27 October 2011

SAFE DIWALI

- डॉ. विकास गोगटे
हल्ली दिवाळी साजरी करायची म्हणजे फटाके हे फोडलेच पाहिजे, असा जणू नियमच झाला आहे. हाय डेसिबलचे, अतिशय धोकादायक असणारे फटाके अगदी निष्काळजीपणाने फोडण्याचा खेळ मुलांमध्ये, तरुणांमध्ये रंगतो. कधी कधी त्यांच्या या फटाके फोडण्याच्या अजब प्रकारांमुळे इतर निष्पापांचाच बळी जातो.दिवाळी आणि फटाके हे समीकरण जसे आता दृढ झाले आहे, तसेच फटाके आणि अपघात हेही ठरलेलंच आहे. अशा अपघातांनी कधी कधी किरकोळ जखमांवर आपली सुटका होते, तर काही वेळेस या अपघातांचे दु:खद व्रण कायम आपली सोबत करतात, तर कधी कधी हे फटाके जीव घेण्याइतपत जीवघेणे ठरतात. फटाक्यांमुळे होणार्‍या अपघाताची तीव्रता ही भाजण्याच्या जखमा किती खोलवर झाल्या आहेत, या जखमा शरीराच्या कोणत्या भागावर झाल्या आहेत आणि या जखमांनी शरीराचा किती टक्केभाग व्यापलाय यावर अवलंबून असते.

अशा वेळेस फटाके फोडताना काळजी घेणे किंवा अपघात झालाच तर घाबरून न जाता योग्य प्रथमोपचार त्वरित करणे गरजेचे असते.

काय कराल?

१. सर्वात पहिले फटाके खरेदी करून घरी आणल्यानंतर त्याचे स्टोरेज करताना बंदिस्त खोक्यात करावे.

२. घराच्या बाहेर मोकळ्या जागेत फटाके उडवावेत.

३. फटाके पेटवण्यासाठी मोठी मेणबत्ती, उदबत्ती वापरावी.

४. जमिनीवरील फटाके पेटवताना बाजूला उभे राहून वाकून पेटवावे.

५ फटाके पेटवताना फटाक्यांपासून हातभर अंतर ठेवावे.

६. पणती ठेवताना कोनाड्यात ठेवावी.

७. फटाके फोडताना आपल्याजवळ दोन पाण्याने भरलेल्या बादल्या आणि एक रिकामी धातूची बादली ठेवावी. उडवलेले फटाके या रिकाम्या धातूच्या बादलीत साठवावे.

८. फटाके फोडताना अंगावरील कपडे घट्ट असावे.

९. फटाके फोडतेवेळी लक्ष ठेवण्यासाठी मोठी व्यक्ती आजूबाजूस जरूर असावी.

१0. फटाके उडवताना नेहमी सतर्क राहावे, काळजी घ्यावी, कारण पूर्णपणे निर्धोक, सुरक्षित फटाके अजून बनायचे आहे, तेव्हा सावधान!

११. पण, तरीही फटाके उडवताना अपघात झाल्यास शरीराचा भाजलेला भाग वाहत्या गार पाण्यात किंवा नळाखाली धरावा. ते शक्य नसल्यास जखमेला पाण्यात ओल्या केलेल्या स्वच्छ रूमालात लपेटून ठेवा. रुग्णाला अशा अवस्थेत दहा ते तीस मिनिटांपर्यंत ठेवावे. जेणेकरून त्याच्या वेदना कमी होतात. यालाच ‘जलोपचार’ असेही म्हणतात.

१२. फटाके उडवताना अंगावरील कपडे पेटल्यास त्या व्यक्तीस जमिनीवर आडवे झोपवून त्याच्यावर गार पाणी ओतावे.

१३. जळलेल्या भागावर ब्लँकेट, जाड पडदा किंवा धोब्याकडून आणलेली स्वच्छ चादर गुंडाळावी. कारण ती इस्त्री वगैरे केली असल्यामुळे निर्जंतूक असते.

१४. अपघातग्रस्त व्यक्तीच्या बोटातील अंगठी, हातातील बांगड्या लगेच काढाव्यात. कारण शरीराला सूज आल्यास ते काढणे अवघड आणि वेदनादायी होते.

१५. डोळे भाजलेले असल्यास ताबडतोब गार पाण्याने धुवावेत आणि लगेच डॅाक्टरी सल्ला घ्यावा.

१६. भाजल्यानंतर सतत तोंडाने पाणी देत राहावे.

काय टाळाल?

१. फटाके उडवताना ते घरात, गर्दीच्या जागेवर, लहान गल्लीत किंवा कोंदट जागेत उडवू नये. कारण बंदिस्त जागी फटाके फोडल्यास त्यातील धुराने दमा असलेल्या व्यक्तींना त्रास होतो, घाबरल्यासारखे, गुदमरल्यासारखे होते.

२. फटाके हातात धरून उडवू नये. मजेमजेत फटाके पेटवून दुसर्‍यांच्या अंगावर फेकू नये. बाण वगैरेसारखे फटाके आडव्या स्थितीत नियमबाह्य पद्धतीने फोडू नये.

३. फटाके पेटवताना अगदी समोर वाकून, तोंडावर येईल असे पेटवू नये.

४. पणती गॅलरीत ठेवताना तिच्या आसपास पडदा असता कामा नये.

५. ८५ डेसिबलपेक्षा जास्त क्षमतेचे फटाके फोडू नये. असे फटाके वृद्धांना, लहान मुलांना त्रासदायक ठरतात.

६. ढगाळ किंवा सैल कपडे, कुर्ते घालून फटाके फोडू नये.

७. भाजलेल्या जागेवर शाई, तुळशीची माती, लोणी, बर्फ लावू नये.

८. फटाके उडवताना कपडे पेटल्यास घाबरून पळत सुटू नये.

९. भाजल्या जागी आलेले फोड ज्यात पाणी असते त्याला ‘ब्लिस्टर्स’ असे म्हणतात ते फोडू नयेत. कारण ते नैसर्गिक आच्छादन (ड्रेसिंग) असते. भाजल्याच्या जखमा निर्जंतूक असतात. त्यात संसर्ग नसतो. फोडातील पाणी निर्जंतूक असतं. आपल्या चुकीच्या वागण्याने भाजण्याच्या अपघातातील जखमेत संसर्ग होतो

No comments:

Post a Comment