Total Pageviews

Friday, 7 October 2011

ROBERT VADRA ARTICLE DIVYA MARATHI

रॉबर्ट वडेरा हे भारतीय उद्योजक आहेत. मात्र, उद्योजकाऐवजी त्यांना प्रियंका गांधींचे पती आणि सोनिया गांधींचे जावई म्हणूनच जास्त ओळखले जाते. 18 एप्रिल 1969 मध्ये त्यांचा जन्म झाला. राजिंदर व मौरीन वडेरा यांचे ते चिरंजीव. राजिंदर वडेरा मुरादाबादचे रहिवासी होते आणि मौरीन मूळच्या स्कॉटलंड येथील. आपल्या वेगाने वाढणा-या व्यवसायांमुळे रॉबर्ट वडेरांना सध्या काँग्रेसच्या विरोधी पक्षांनी लक्ष्य बनवले आहे. रॉबर्ट वडेरांची वाढती संपत्ती हा चिंतेचा विषय असून त्यावर आम्ही दस्तऐवज जमा करत आहोत, असे विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी म्हटले आहे. रॉबर्ट यांच्या वाढत्या संपत्तीबाबत माहिती काढावी आणि संबंधित दस्तऐवज सर्वांसमोर आणावेत, असे भाजपने अरुण जेटलींना सांगितल्याचे स्वराज म्हणाल्या. त्यानंतर या मुद्द्यावर चर्चा करण्यात येईल.

वडील व भावाचा गूढ मृत्यू - रॉबर्ट वडेरांची आई मौरीन वगळता उर्वरित सर्व कुटुंब गूढरीत्या संपले. सर्वात आधी रॉबर्ट यांची बहीण मिशेल 2001 मध्ये एका कार अपघातात मृत्युमुखी पडली. त्यानंतर 2003 मध्ये त्यांचे बंधू रिचर्ड वडेरा आपल्या दिल्लीतील घरी मृतावस्थेत आढळले होते. 2 एप्रिल 2009 रोजी रॉबर्टच्या वडलांनीही आत्महत्या केली होती. रॉबर्ट यांचे प्रियंकाशी लग्न झाल्यानंतर आपण आपला मुलगा गमावला आहे, असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. राजिंदर व रिचर्ड वडेरा हे गांधी कुटुंबाच्या नावाचा दुरुपयोग करत होते, अशी चर्चा आहे. त्याला त्रासून रॉबर्ट यांनी एक जाहिरातच दिली होती की, आपल्या नावाचा उपयोग करून जर आपले वडील व भाऊ काही लाभ मिळवत असतील, तर त्यास नकार द्यावा. 

लष्करप्रमुखांपेक्षाही रॉबर्ट मोठे! - रॉबर्ट वडेरा देशाचे भूदल, नौदल व हवाई दलाच्या प्रमुखांपेक्षाही मोठे असल्याचे सिद्ध झाले आहे. कारण ज्या लोकांना देशांतर्गत विमानतळावर तपासणीतून जावे लागत नाही, अशा लोकांच्या यादीत रॉबर्ट यांच्या नावाचा समावेश आहे. तसे पाहिले तर ज्या लोकांचा या यादीत समावेश आहे, त्यांना त्यांच्या पदानुसार ही सूट मिळालेली आहे. मात्र, रॉबर्ट वडेरा व तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा हे कोणत्याही अधिकृत पदांवर नसतानाही त्यांची नावे या यादीत आहेत. 28 सप्टेंबर 2005 रोजी रॉबर्ट यांचे नाव या यादीत आले होते. ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सेक्युरिटीने देशभरात एक पत्रक काढले होते. रॉबर्ट वडेरा जेव्हा स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपसह प्रवास करतील तेव्हा त्यांची तपासणी करण्यात येऊ नये, असे या पत्रकात म्हटले होते. देशाच्या भूदल, नौदल व हवाई दलाच्या प्रमुखांनाही तपासणीतून जावे लागते, मग रॉबर्ट वडेरांना ही सूट कशासाठी असा प्रश्न तेव्हा उपस्थित झाला होता. अनेकांनी सरकारच्या या निर्णयावर टीका केली.

वडेरा दाम्पत्य हिमाचलमध्ये साकारतेय ‘ड्रीम होम’ - प्रियंका गांधी व त्यांचे पती रॉबर्ट वडेरा यांचे स्वप्नातील घर सिमल्यापासून 15 कि.मी. अंतरावर असलेल्या छराबडा परिसरात आकार घेत आहे. काँक्रिट, संगमरवर आणि मौल्यवान लाकडापासून तयार होत असलेल्या या दुमजली निवासस्थानाजवळ बरीच नयनरम्य स्थळे आहेत. परिसरात चेरी व सफरचंदाची झाडे आहेत. वडेरा कुटुंबाने 2007 मध्ये येथे घरासाठी चार गुंठे जमीन 47 लाख रुपयांत विकत घेतली होती. हे घर समुद्रसपाटीपासून 8 हजार फूट उंचीवर आहे. या घराजवळच राष्ट्रपतींचे रिसॉर्ट आणि ओबेरॉय समूहाचे लक्झरी हॉटेल ‘वाइल्ड फ्लॉवर हॉल’ आहे. 

रिअल इस्टेटमध्ये गुपचूप प्रवेश - संपुआ अध्यक्षा सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वडेरा यांनी स्वत:ला राजकारणापासून दूर ठेवले. आपली ओळख उद्योजक म्हणून राहील याची त्यांनी काळजी घेतली. देशातील सर्वात मोठ्या रिअ‍ॅलिटी फर्म डीएलएफमध्ये भागीदारी करून रॉबर्ट वडेरांनी रिअल इस्टेट बिझनेसमध्ये गुपचूप प्रवेश केला आहे. दागिने व हँडिक्राफ्टची निर्यात करणा-या आर्टेक्स कंपनीकडे आपले लक्ष असल्याचे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. वेगवान दुचाकी वाहनांची आवड असलेल्या वडेरांनी 2008 मध्ये हरियाणा व राजस्थानात भूखंड खरेदी करून व्यावसायिक विस्तारास सुरुवात केली होती. दिल्लीतील एका हॉटेलमध्ये त्यांची 50 टक्के भागीदारी आहे आणि ते एअरक्राफ्ट चार्टरिंग बिझनेसमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या अनेक कंपन्यांना डीएलएफ ग्रुप ऑफ कंपनीजकडून कर्ज मिळालेले आहे. त्यातील बरेच कर्ज अनसेक्युअर्ड आहे.

बॅलन्स शिटवरून कर्ज गायब! - वडेरा व त्यांची आई मौरीन यांच्या मालकीची स्कायलाइट हॉस्पिटॅलिटी प्रा. लि. कंपनी डीएलएफ हॉटेल होल्डिंग्स आणि दुस-या कंपन्यांसोबत एका पार्टनरशिप फर्ममध्ये भागीदार आहे. त्यांच्याकडे हिल्टन गार्डन इनचा मालकी हक्क आहे. मार्च 2009 पर्यंत डीएलएफ लिमिटेडने स्कायलाइट हॉस्पिटॅलिटी कंपनीस 25 कोटी रुपयांचे अनसेक्युअर्ड कर्ज दिले. मार्च 2010 पर्यंत ते 10 कोटी रुपये होते. तथापि, अकाउंट स्टेटमेंट पाहिले असता हे स्पष्ट होत नाही की, उर्वरित कर्ज फेडले अथवा ते बॅलन्स शिटवरून काढण्यात आले. स्कायलाइट हॉस्पिटॅलिटीने वडेरांच्या अन्य कंपन्या ब्ल्यू ब्रिज ट्रेडिंग कंपनी, नॉर्थ इंडिया आयटी पार्क्स प्रा. लि., रिअल अर्थ इस्टेट प्रा. लि. आणि स्कायलाइट रिअ‍ॅलिटी प्रा. लि. या कंपन्यांना कर्ज दिले. ब्ल्यू ब्रिज ट्रेडिंग कंपनी 2007 मध्ये प्रियंका गांधी व रॉबर्ट वडेरा यांनी भागीदारीत सुरू   केली. ही कंपनी एअरक्राफ्ट चार्टरिंगशी निगडित आहे. जुलै 2008 मध्ये प्रियंका गांधी या कंपनीच्या संचालक झाल्या. डीएलएफने मार्च 2010 मध्ये रिअल अर्थ इस्टेट्स प्रा.लि.ला 5 कोटी रुपयांचे थेट कर्ज दिले. संयुक्त उपक्रम असलेल्या साकेत कोर्टयार्ड हॉस्पिटॅलिटीला 3.58 कोटी रुपयांचे अनसेक्युअर्ड कर्ज डीएलएफ हॉटेल होल्डिंग्स लिमिटेडने दिले.

मोठ्या प्रमाणावर घेतली जमीन - वडेरांच्या कंपन्यांनी गेल्या काही वर्षांत अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जमिनी विकत घेतल्या आहेत. स्कायलाइट हॉस्पिटॅलिटीने हरियाणातील सोहनमध्ये पाच गुंठे जमीन 7.9 कोटी रुपयांत 2007-08 मध्ये विकत घेतली. 2008-09 मध्ये मानसेरमध्ये 15.3 कोटी रुपये आणि बिकानेरमध्ये 79 लाख रुपये देऊन जमीन घेतली. त्यांची नॉर्थ इंडिया आयटी पार्क्स कंपनी जमीन खरेदीत आघाडीवर आहे. 2009-10 मध्ये कंपनीने 160.62 एकर जमीन (त्यात 82.62 एकर शेतजमीन आहे) बिकानेरमध्ये 1.02 कोटी रुपयांत खरेदी केली. त्यांच्या रिअल अर्थ इस्टेट कंपनीने हयातपूर, बिकानेर, हसनपूर, मेवात आणि नवी दिल्लीतील ग्रेटर कैलाश पार्ट-टूजवळ 2009-10 मध्ये बरीच जमीन घेतली. त्यासाठी कंपनीने 7 कोटी रुपये खर्च केले. स्कायलाइट रिअ‍ॅलिटीने पलवल, हरियाणा, बिकानेर आणि राजस्थानातही जमीन घेतली आहे. त्यासाठी कंपनीने 89 लाख रुपये मोजले. कंपनीची हयातपूर आणि हरियाणात एक कोटी रुपयांची जमीन आहे. कंपनीने गुडगावमधील डीएलएफ मगनोलिया अपार्टमेंट कॉम्पलेक्समध्ये 5.2 कोटी रुपयांत 7 सदनिका विकत घेतल्या आहेत. डीएलएफ इस्टेट प्रा. लि.च्या मालकीच्या कॅपिटल ग्रीन कॉम्पलेक्समध्ये 5 कोटी रुपयांच्या सदनिका घेतल्या आहेत.

14 वर्षांपूर्वी आर्टेक्सने सुरुवात -  आर्टेक्स ही संपूर्णपणे वडेरांच्या मालकीची कंपनी आहे. ही कंपनी हँडिक्राफ्ट व फॅशन अ‍ॅक्सेसरीजचा व्यवसाय करते. या कंपनीची सुरुवात जवळपास 14 वर्षांपूर्वी झाली होती. 2007 मध्ये त्यांनी आपल्या व्यवसायाच्या विस्तारास सुरुवात केली.

रॉबर्ट वडेरांच्या कंपन्या

कंपनीचे नाव
- स्कायलाइट हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लि.

स्थापना - 1 नोव्हेंबर 2007   

पेड-अप शेअर कॅ - 5 लाख रु.    

व्यवसाय - हॉस्पिटॅलिटी रिअल इस्टेट

कंपनीचे नाव - ब्ल्यू ब्रिज ट्रेडिंग प्रायव्हेट लि.

स्थापना - 1 नोव्हेंबर 2007    

पेड-अप शेअर कॅ- 5 लाख रु.    

व्यवसाय - एअरक्राफ्ट चार्टरिंग

कंपनीचे नाव - स्कायलाइट रिअ‍ॅलिटी प्रायव्हेट लि.

स्थापना - 16 नोव्हेंबर 2007   

पेड-अप शेअर कॅ - 5 लाख रु.   

व्यवसाय - रिअल इस्टेट फ्लॅट बुकिंग बिझनेस

कंपनीचे नाव - रिअल अर्थ इस्टेट्स प्रायव्हेट लि.

स्थापना - 18 फेबु्रवारी 2008   

पेड-अप शेअर कॅ - 10 लाख रु.    

व्यवसाय - रिअ‍ॅलिटी. लवकरच बांधकाम क्षेत्रात

कंपनीचे नाव - नॉर्थ इंडिया आयटी पार्क प्रायव्हेट लि.

स्थापना - 19 जून 2008   

पेड-अप शेअर कॅ - 25 लाख रु.   

व्यवसाय - रिअल इस्टेट

No comments:

Post a Comment