Total Pageviews

Wednesday 12 October 2011

BAD GOVERNANCE ARTICLE SAMANA

रिक्षाचालकांना प्रवाशांचे मित्र बनवा. पण शरद रावांना हे नको आहे. त्यांना युनियनच्या नावाखाली मुजोरांची टोळी चालवायची आहे.
शरद ‘राव’ गारद
शरद राव यांना मुख्यमंत्री पृथ्वीराज यांनी गारद केले. रिक्षावाल्यांची मनमानी मोडून काढून त्यांच्या अरेरावीस चाप लावला याबद्दल आम्ही मुख्यमंत्र्यांचे खास खास अभिनंदन करीत आहोत. यापुढे रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर बसणार व प्रवाशांची लुटमार थांबणार. शरद राव यांचा विरोध मोडून मुख्यमंत्र्यांनी ही कणखर भूमिका घेतली त्याबद्दल मुंबई उपनगरातील लाखो प्रवासी त्यांना धन्यवाद दिल्याशिवाय राहणार नाहीत. गेल्या काही दिवसांपासून मुंबई उपनगरातील रिक्षावाल्यांनी प्रवाशांना वेठीस धरण्याचे प्रकार वाढीस लागले होते व त्यांच्या या बेशिस्त वर्तनास शरद रावांची फूस होती. त्यांच्या युनियनबाजीत जनतेची अवस्था बिकट झाली होती. रिक्षाचालकांच्या काही न्याय्य मागण्या असतील तर त्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा हे आम्हाला मान्य आहे, पण मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून लोकांना त्रास देणे, अरेरावी करणे हे बरोबर नाही. मुंबई तसेच उपनगरात रिक्षावाला म्हणजे लोकांच्या तिरस्काराचा विषय बनला आहे. भाडे नाकारणे, महिलांंशी उद्धट वर्तन करणे, अनेकदा प्रवाशांवर हल्ले करणे, जास्त भाडे आकारणे असे अनेक प्रकार होत असतात. त्यामुळे मीटर न लावता मनमानी करणारा कोण? तर रिक्षावाला ही त्याची ओळख आहे. खरे म्हणजे या रिक्षावाल्यांच्या संघटना आणि त्यांच्या नेत्यांनी आपल्या समर्थकांना थोडे शिस्तीचे धडे दिले असते तर रिक्षाचालकांनाही नक्कीच प्रतिष्ठा मिळाली असती व आता जी वादवादी आणि तोडफोड झाली ते सर्व टाळता आले असते. रिक्षाचालकांत व टॅक्सीचालकांत भूमिपुत्र किती व बाहेरचे घुसखोर किती? त्यांच्याकडे कायदेशीर कागदपत्रे, परवाने, ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे खरोखरच आहेत काय याचा खुलासा शरद राव वगैरे मंडळींना करता येणे कठीण आहे. म्हणून राज्याचे परिवहन आयुक्त जे कोणी असतील त्यांनी या गौडबंगालावर प्रकाश टाकला तर बरे होईल. इकडे प्रश्‍न फक्त भूमिपुत्र आणि परप्रांतीयांच्या भेदाभेदीचा नाही. मुंबईतील लाखो अमराठी लोकही रोज रिक्षाने प्रवास करतात व त्यांनाही रिक्षाचालकांच्या अरेरावीचा फटका बसतो. मनमानी करताना रिक्षावाला हा मराठी व तो परप्रांतीय असा भेद करीत नाही. म्हणून भाडे जवळचे असेल नाहीतर लांबचे, ते नाकारण्याचा अधिकार त्याला नाही व अशा रिक्षाचालकांना कायद्याचा धाक वाटत नसेल तर मग त्यांना ‘ठोकशाही’ मार्गानेच वठणीवर आणावे लागेल. रिक्षाचालकांच्या संघटना बर्‍याच आहेत व त्यात शिवसेना मोठ्या वर्गाचे नेतृत्व करते. पण शिवसेनेच्या नेतृत्वाखालील रिक्षाचालकांनी कधी अशी मुजोरीची भाषा व महिलांशी असभ्य वर्तन केल्याच्या तक्रारी नाहीत. मग शरद रावांच्या झेंड्याखालील रिक्षावाल्यांनी असे बकाल वर्तन का करावे? जसे नेतृत्व तसे समर्थक. नेताच बेशिस्त असेल तर समर्थकांनी तरी शिस्तीचे धडे का गिरवावेत? म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी रिक्षा युनियनच्या बैठकीत घेतलेले निर्णय योग्य आहेत. सध्याचे रिक्षाचालक जे आहेत ते कोण? कुठून उपटले? याचा सगळा घोळ आहे. आता रिक्षाचालकांना १५ वर्षे वास्तव्याचा दाखला बंधनकारक केला. ज्याला तुम्ही ‘डोमिसाईल’ म्हणता ते अत्यावश्यक केले. ‘शिवसेने’ची ही मागणीच होती व ती मान्य झाली. याचा फायदा मुंबईतील भूमिपुत्रांना होणार आहे. ‘‘मराठी तरुणांना रिक्षा चालवायला लाज वाटते. कारण ओळखीची मुलगी रिक्षा चालवताना बघेल अशी त्याला भीती वाटते. मराठी माणसांना मेहनत करायला नको’’ अशी मुक्ताफळे शरद राव यांनी उधळली होती व ती धक्कादायक आहेत. मराठी तरुणांना काम करायला, रिक्षा चालवायला लाज वाटते असे बोलणे म्हणजे मराठी श्रमिकांचा अपमान आहे. मराठी तरुणांचा अपमान आहे. मराठी तरुणांच्या घामातून व रक्तातून मुंबई मिळाली व राखली. गिरणी कामगार बिहारी होता काय? आणि मुंबईतील डबेवाला आणि हमाल, पट्टेवाला, लाल डगलावाला पूरभैया आहे काय? तो मराठीच आहे. मुंबईच्या रस्त्यावर वडापावची गाडी लावून गुजराण करणारा हा तरुण मराठीच आहे व त्या गाड्यांना विरोध करून कारवाई करण्याची मागणी करणारी युनियन तुमचीच आहे. मुंबईतील कोळीवाड्यातल्या श्रमिकांचे कष्ट व जिद्द तर थक्क करणारी आहे. अंगमेहनतीची कामे करून घरसंसार चालवणार्‍या मराठी तरुणांचा असा अपमान करणार्‍या शरद रावांनी कोणते कष्ट आणि मेहनत घेऊन श्रीमंती निर्माण केली ते सांगावे. तुमचे काम एकच, ते म्हणजे पावसाळा आला की, गटारातून बेडकासारखे बाहेर पडायचे व ‘संपा’चे डराव डराव करून पालिकेच्या सफाई कामगारांना रस्त्यावर बसवायचे. पण यावेळी शिवसेनेने तुमची ही मनमानीसुद्धा मोडून काढली. पालिका कर्मचार्‍यांच्या घसघशीत वेतनवाढीचा करार करून तुमच्या संपगिरीची हवाच काढली. आता रिक्षाच्या इलेक्ट्रॉनिक मीटर प्रकरणातही तुम्ही उघडे पडलात. रिक्षावाल्यांच्या सर्व युनियन एका बाजूला व शरद राव दुसर्‍या बाजूला. इलेक्ट्रॉनिक्स मीटर बसायलाच पाहिजे अशी शिस्तबद्ध मागणी मान्य होत असताना शरद राव मात्र त्यास विरोध करतात ते कोणासाठी? रिक्षाचालकांना मुजोर व लुटारू बनवू नका. त्यांनाही चांगले व्यावसायिक, प्रवाशांचे मित्र बनवा. प्रतिष्ठा द्या. शरद रावांना हे सर्व नको. कारण त्यांना युनियनच्या नावाखाली मुजोरांची टोळी चालवायची आहे.
झोपलेले नाशिकनाशिक शहरात गेल्या काही वर्षांपासून गुंडशाही आणि झुंडशाही वाढली आहे. दुचाकी गाड्या जाळण्याचे सत्र सुरू झाले ते अद्यापि संपले नाही. काल भल्या पहाटे समाजकंटकांनी आणखी दोन दुचाकी जाळून पोलिसांना आव्हान दिले. नाशिक म्हणजे महाराष्ट्राची सांस्कृतिक नगरी. या प्रतिमेस कलंक लावणार्‍या घटना शहरात घडत आहेत व शहराचे पालक म्हणून मिरवणार्‍यांना त्याचे काही वाटत नाही. राजकारण, सत्ताकारण यापुढे कुणाला काही सुचत नाही. लोकप्रतिनिधी सत्ताबाजीत, तर पोलीस व प्रशासन हप्तेबाजीत गुंग झाल्याने लोकांच्या घरांसमोर ही जाळपोळ सुरू आहे. नाशिक शहरात गुंडांच्या टोळ्या हैदोस घालीत आहेत व त्यांना राजकीय आश्रय असल्याशिवाय त्यांचे धाडस होणार नाही. गुंडांनी दुचाकी जाळण्याचा जो सपाटा लावला आहे तो नष्ट करणे कठीण नाही. पण पोलिसांची इच्छा आहे काय? नाशिककरांचा छळ मांडणारे व वेठीस धरणारे लोक प्रतिष्ठितांचा बुरखा घालून खुलेआम फिरत आहेत व आता तीच नाशिकची ओळख होऊ पाहात आहे. नाशिकच्या वसंत कानेटकरांनी ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ लिहिलं. रायगड जागा झाला, पण नाशिक मात्र झोपलेलेच आहे. दुचाकीच्या पेटलेल्या भडक्याचे चटके बसूनही ते जागे होत नसेल तर काय करायचे?

No comments:

Post a Comment