Total Pageviews

Sunday, 2 October 2011

HARRASING OF COMMON PUBLIC BY NASHIK POLICE


वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून केवळ प्रयत्न करण्यावर धन्यता मानणारे नाशिक पोलिस आणि गुन्हेगारीच्या भरडक्यात सापडलेले नाशिककर , असा हा खेळ आजही थांबलेला नाही . त्यातच आता शहरातील चौक आणि महत्त्वाच्या कोपऱ्यांवर दबा धरून बसलेल्या वाहतूक पोलिसांकडून चाललेल्या सरकारी लूटमारीची नवी डोकेदुखी वाढू लागलीय .

शहरातील बिकट बनलेली वाहतूक समस्या आणि महापालिकेच्या नावाने बोटं मोडत या समस्येचं ' भांडवल ' करण्यात गुंतलेली वाहतूक पोलिसांची यंत्रणा नाशिकमधल्या आबालवृद्धांना चांगलीच ठाऊक झालीय . सिग्नलकडे कानाडोळा करून शिस्त लावण्यापेक्षा कुणी कसा नियम मोडेल आणि त्याला कसं ' लक्ष्य ' करता येईल , यातच या ' चौकीदारांना ' अधिक रस असतो . नाशिकमधील ' टार्गेट ' कमी पडतं की काय म्हणून परराज्यातल्या वाहनधारकांनाही हे चौकीदार सोडत नाहीत . वाहतूक पोलिसांकडून चाललेल्या आर्थिक शोषणाचा प्रश्न हा काही आजचा नाही . गेल्या पाच वर्षांपासून भू - छत्रांसारखा हा प्रश्न उभा ठाकतो आणि त्यावर वरिष्ठांकडून हलक्या हाताने पांघरूण घातलं जातं . बरं ही काही फक्त नाशिकमधली चर्चाही नाही . गेल्या आठवड्यात वाहतूक पोलिसांच्या वसुलीला कंटाळून रास्ता रोकोचं हत्यार उपसत पोलिसांचीच जी ' नाकेबंदी ' झाली , त्यातून आर्थिक लूट होत असल्यावर आपसूकच शिक्कामोर्तब झालं . खुद्द पोलिस आयुक्त विनोद लोखंडे यांनीही परवा त्याची कबुली दिली . अर्थात कारवाई होऊनही सरकारी लूट थांबेल याची काही शाश्वती नाही . नाशिककरांचं दुर्दैवं एवढंच की एवढं होऊनही पोलिस आयुक्त मात्र नाशिकमध्ये सारं काही आलबेल असल्याचंच सांगताहेत .

नाशिकदर्शनासोबतच त्र्यंबकेश्वर , शिर्डी शनिशिंगणापूरला जाणाऱ्या भाविकांचं प्रमाण मोठं असल्याने , वाहतूक शाखेसाठी ही रहदारी पोषक ठरतेय . यापूर्वी गुजरातमधून येणाऱ्या भाविकांना नाहक त्रास देऊन पोलिस आर्थिक लूट करत असल्याचं प्रकरण थेट मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत गेलं होतं . त्यावर मोदींनी नाशिक पोलिसांना पत्र लिहून ही ' कर्तव्यदक्षता ' थांबवण्यास सांगितलं होतं . मात्र त्यांचंही ऐकतील ते नाशिक पोलिस कसले .
गेल्या आठवड्यात तर वाटमारीचं एक प्रकरण थेट वाहतूक पोलिसांच्या अंगाशी आलं होतं . दोन हजाराची मागणी करत हैदराबादेतील भाविकांची अडवणूक झाली आणि संतापलेल्या भाविकांनी रास्तारोको केला . हे प्रकरण अंगाशी येत असल्याचं पाहून काही पोलिसांनी त्याठिकाणाहून अक्षरश : पळ काढला . आंध्र प्रदेशच्या ' आयजीं ' पर्यंत हे प्रकरण गेलं आणि पोलिस आयुक्तालयात धावपळ झाली .

शहरातली टोळीबाजी , सोनसाखळी चोर , वाहनचोरी आणि घरफोडीने नाशिककर आधीच हैराण झाले असताना वाहतूक पोलिसांची वाटमारी चांगलीच तापदायक बनली आहे . गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यात अपयशी ठरलेल्या पोलिस आयुक्तांनी स्वत : च्या अखत्यारितल्या यंत्रणेच्या साफसफाईकडे लक्ष दिलं तरी उर्वरित ध्येय आपोआप साध्य होईल , हे वेगळं सांगायला नको

No comments:

Post a Comment