https://www.youtube.com/watch?v=tqSGiPFl3Rs&t=182s
- डॉ. शैलेंद्र देवळाणकर
पाकिस्तानसाठी बॉम्बहल्ले किंवा दहशतवादी हल्ले ही काही नवी गोष्ट
राहिलेली नाही. बहुतेकदा पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले होतात त्यात अनेकांचे बळी
जातात. पाकिस्तानात अल-कायदा, इस्लामिक स्टेट
आदी संघटना दहशतवादी हल्ले आणि गोळीबार सातत्याने करतच असतात. मात्र, गेल्या आठवड्यात पाकिस्तानात झालेला दहशतवादी हल्ला मात्र या
सर्वांपेक्षा वेगळा होता. यातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजेच पहिल्यांदाच या
दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक दहशतवादी संघटनेने घेतलेली नसून, ती बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) ने घेतली आहे. त्याचबरोबर
पाकिस्तानमधील चीनच्या दूतावासावर पहिल्यांदाच हल्ला करण्याचा प्रयत्न झाला.
त्यांनी चीनला का लक्ष्य केले हे मुद्दे विचारात घेणे आवश्यक आहे.
बलूच हा पाकिस्तानातील वांशिक अल्पसंख्याक गट आहे. अफगाणिस्तान, इराण आणि पाकिस्तान या तीन देशांमध्ये या बलूच लोकांचे वास्तव्य
आहे. पाकिस्तानातील बलुचिस्तान या पश्चिमेकडील भागात या बलुची लोकांचे वास्तव्य
आहे. त्यांच्या सीमारेषा इराण आणि अफगाणिस्तानशी जोडलेल्या आहेत. हा संपूर्ण भाग
नैसर्गिक साधनसंपत्तीची विपुलता असणारा आहे. तिथे नैसर्गिक वायूंचे मोठे साठे
आहेत. हा सर्व भाग पाकिस्तानच्या वर्चस्वाखाली आहे. पाकिस्तानच्या आर्थिक विकासात
खूप मोठा असमतोल आहे. पंजाबी पाकिस्तानचा विकास जास्त झाला आहे, तर बलुचिस्तान हा प्रदेश विकासापासून कोसो दूर आहे. त्यामुळे
बलुचिस्तानच्या लोकांमध्ये असंतोषाची भावना आहे. ही असंतोषाची भावना 1980 च्या दशकापासूनच आहे. मात्र, पाकिस्तान लष्करी वर्चस्वाखाली या बलुची लोकांचा आवाज दाबून
टाकण्याचा प्रयत्न करीत आला आहे. 2005 मध्ये एक मोठा उठाव झाला होता. तेव्हा पाकिस्तानकडून एक मोठी
लष्करी कारवाई करण्यात आली होती. या लष्करी कारवाईत प्रचंड नरसंहार झाला होता.
2015 सालापर्यंत या बलुची लोकांचा संघर्ष पाकिस्तानी लष्कराबरोबर होता; पण 2015 मध्ये चीनने पाकिस्तानसोबतच्या
एका अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा केली. या प्रकल्पाचे नाव आहे ‘चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर’ (सीपेक). या योजनेंतर्गत चीनच्या पश्चिमेकडील शिन शियांग या
प्रांताला बलुचिस्तानातील ग्वादार बंदर जोडायचे आहे. शिन शियांग ते ग्वादार
बंदरापर्यंत रेल्वे मार्ग, रस्ते मार्ग विकसित करायचा आहे.
याचे कारण ग्वादार बंदराच्या माध्यमातून चीनला संपूर्ण पश्चिम आशिया त्याचप्रमाणे
आखाती प्रदेश तसेच मध्य आशियात प्रवेश मिळणार आहे. चीनला प्रामुख्याने या भागावर
वर्चस्व गाजवायचे आहेच. त्यामुळेच चीनने बलुचिस्तानात आर्थिक परिक्षेत्राच्या
अंतर्गत साधनसंपत्तीचा विकास करायला सुरुवात केली आहे. बलुचिस्तानात खूप मोठे
बांधकाम सुरू आहे. यासाठी तिथल्या स्थानिक लोकांना जबरदस्तीने बाहेर जायला लावले
आहे. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचा या विकासाला पर्यायाने परिक्षेत्राला विरोध आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार, या विकासकामांमुळे केवळ
पाकिस्तानचा फायदा होणार असून, बलुची लोकांना
याचा काहीही उपयोग नाही. या भागात रस्तेमार्ग, रेल्वेमार्ग झाल्यानंतर इतर प्रांतातील लोक येतील आणि स्थानिकांचा
रोजगार कमी होईल, अशी बलुची लोकांची भीती आहे.
मुळातच इथले बलुची लोक मागास असल्याने या बाहेरील लोकांचा सामना करू शकणार नाहीत.
किंबहुना बलुची लोकांना बाहेर पाठवले जाईल. त्यामुळे चीन-पाकिस्तान आर्थिक परिक्षेत्र
विकास हा प्रकल्प बलुचिस्तानसाठी विघातक असून, हा विकास प्रकल्प आम्ही होऊ देणार नाही, अशी बुलिचींची भूमिका आहे. त्यामुळे ते सतत चीनच्या सैन्यावर हल्ले
करीत आहेत. नुकताच झालेला चिनी दूतावासावरील हल्ला हा दुसरा हल्ला आहे.
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये बलुचिस्तानची राजधानी क्वेटामध्ये चिनी अभियंत्यांना घेऊन
जाणार्या एका बसवर हल्ला करण्यात आला होता. त्यावेळीही बलुचिस्तान लिबरेशन
आर्मीने या विकासकामांना आमचा विरोध असल्याचा इशारा दिला होता. आता त्यांनी थेट
चिनी दूतावासावर हल्ला करून आपला विरोध तीव्र झाल्याचा संदेश दिला आहे.
दुसरीकडे चीनच्या धोरणांनाही जगभरातून विरोध होतो आहे. चीन ज्या
पद्धतीने भरमसाट कर्जे देऊन राष्ट्रांचे सार्वभौमत्त्व गहाण टाकून घेत आहे, त्याविषयी आता हळूहळू जगभरातून नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
श्रीलंका, मलेशिया, इंडोनेशिया, मालदिव या राष्ट्रांमधून हा विरोध
आता स्पष्टपणाने पुढे येऊ लागला आहे. पाकिस्तानमध्ये त्याचे स्वरुप हिंसक आहे.
त्यामुळे बलुचींनी केलेला हल्ला हा पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशांसाठी एक
गर्भित इशाराच म्हणावा लागेल
No comments:
Post a Comment