Total Pageviews

Saturday, 10 November 2018

स्मार्टफोनचं व्यसन असलेले अनेक लोक-डॉ. ज्ञानेश्वर अयाचित-PRAHAR


स्मार्टफोनचं व्यसन असलेले अनेक लोक आहेत. फक्त त्यांना ते जाणवलेलं नसतं. विविध शारीरिक आणि मानसिक दुष्परिणाम होऊ लागले की त्याची जाणीव होते. बरेचदा दैनंदिन वर्तनातले आणि नव्या शारीरिक त्रुटींच्या रुपात पुढे येणारे बदल हळूहळू लक्षात येतात. मात्र म्हणूनच या व्यसनाची लक्षणं ओळखणं आणि त्यापासून स्वत:ची सुटका करून घेणं याचे सोपे उपायही माहिती असणं महत्त्वाचं ठरतं.
स्मार्टफोनचे वेड असलेले अनेकजण आसपास दिसतात. मात्र केवळ वेड म्हणून हे हसण्यावारी नेण्यासारखं राहिलेलं नाही, त्याचं कारण म्हणजे कामापुरता स्मार्टफोन वापरणं याची व्याख्या दिवसेंदिवस बदलत चालली आहे. चॅटिंग करणं, व्हॉट्सअ‍ॅपचे मेसेज पाहणं, तासन्तास फोनवरच बातम्या पाहणं, चित्रपट पाहणं, यू टय़ूबवर व्हीडिओ अपलोड-डाऊनलोड करणं, इंटरनेटवर सर्च करणं अशा अनेक कारणांमुळे बहुतांश लोक आयुष्यातला बराचसा वेळ स्मार्टफोनवरच घालवत आहेत. याचे अनेक शारीरिक आणि मानसिक दुष्परिणाम असून बहुतेक सर्व व्यसनांप्रमाणे त्या व्यक्तीला आपण व्यसनी झालेलो नाही असंच वाटत असतं. एकाच ठिकाणी बसून आणि ठरावीक कोनात मान ठेवून सतत मेसेज टाईप केल्यामुळे किंवा वाचल्यामुळे मानेचे आजार जडतात. मणक्याचे व पाठीच्या कण्याचे आजार होतात. सांधे आखडणं, हाता-पायांच्या बोटांना मुंग्या येणं, डोकं बधीर होणं, डोळ्यांवर झापड आल्यासारखं वाटणं, डोकं जड होणं आणि दुखू लागणं, दृष्टी मंदावणं, डोळ्यांमधून पाणी येणं तसंच कानांमध्ये सतत ईअरफोन अडकवून गाणी ऐकणं, व्हीडिओ पाहणं यासारख्या प्रकारांमुळे कमी ऐकू येण्यापासून बहिरेपणा येण्यापर्यंतच्या टप्प्यापर्यंत पोहोचणं, रात्री अपुरी झोप घेऊन मोबाईलवर गेम खेळणं, चित्रपट पाहणं यामुळे डोळ्यांमध्ये मोतीबिंदू आणि काचिबदूसारखे आजार होणं अशा अनेक व्याधींना सामोरं जावं लागतं.
या सगळ्यांचा परिणाम पचनसंस्थेवर आणि मनावर होतो. दीर्घ काळ मोबाईलवर बोलत राहिल्यानं शरीराची हालचाल होत नाही. त्यामुळे अंगदुखी, सांधेदुखीबरोबरच मधुमेहासारख्या दुर्धर व्याधीही जडत असल्याचं ठिकठिकाणी होत असलेल्या संशोधनांमधून समोर येत आहे. याखेरीज हालचाल कमी झाल्यामुळे स्थूलत्व येतं. उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू होतो आणि मानसिक दुष्परिणाम तर याहून भयंकर असतात. चटकन शब्द न सुचणं, काहीही करावंसं न वाटणं, नराश्य येणं, निर्णयक्षमता कमी होणं यासारख्या लक्षणांनंतर मेंदूची कार्यशक्ती क्षीण होण्याच्या त्रासदायक आजाराला तोंड द्यावं लागतं. स्वतंत्र विचारांची शक्ती कमी होणं, चालताना तोल जाणं असे प्रकारही घडू लागतात. परंतु एकदा आहारी गेलेली व्यक्ती हे व्यसन सोडणं कठीण झाल्यामुळे आजारांच्या खोल गत्रेत जाते.
आत्महत्येला प्रवृत्त करणा-या ब्ल्यू व्हेलसारख्या गेम्समुळे लहान मुलांपासून तरुणांपर्यंतच्या वयोगटातील लोकांनी जीव गमावल्याच्या घटना अलीकडच्याच आहेत. मुलांना गुन्हेगारीला प्रवृत्त करण्यासाठी स्मार्टफोनचा वापर करणा-या टोळ्यांनाही पकडलं गेलं आहे. याखेरीज ईल चित्रफिती टाकणं, त्यासाठी धमकावणं आणि ब्लॅकमेिलग करणं यासारखे प्रकारही वाढत चालले आहेत. खासगीपणा चव्हाटय़ावर आणणारं हे साधन हाताळताना अत्यंत सावधपणा बाळगला पाहिजे हे अनेकांच्या लक्षात येत नाही आणि त्यातूनच मानसिक चिंता आणि विवंचनांमधून आत्महत्या आणि खुनासारखे प्रकार वाढत चालल्याचं अनेक संशोधनांतून समोर आलं आहे. एका संशोधनानुसार, भारतीय लोक अ‍ॅप्सवर रोज सरासरी तीन तास घालवतात. २०१५ ते २०१७ या कालावधीत अ‍ॅप डाऊनलोड करण्याची संख्या तिपटीनं वाढली आहे. अलिगढ मुस्लीम युनिव्हर्सटिीच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनानुसार, भारतातल्या विद्यापीठांमधले विद्यार्थी दिवसातून किमान १५० वेळा आपला फोन तपासून पाहतात. चिंताग्रस्तता किंवा आपण ग्रुपवर मागे पडू या भीतीपोटी हे केलं जातं.
सध्या स्मार्टफोनचं आणि गॅजेट्सचं व्यसन सोडवण्यासाठी अनेकजण उपचार घेत आहेत, असं मानसोपचारतज्ज्ञ सांगतात. यात सहसा १६ ते २० वयोगटांतील रुग्णांची संख्या सर्वाधिक असते. सतत ऑनलाईन राहण्याची जबरदस्त इच्छा हे या व्यसनाचं लक्षण असतं. सोबत मोबाईल नसेल तर अस्वस्थपणा आणि निराशा जाणवणं हे दुसरं महत्त्वाचं लक्षण असतं. कामं बाजूला ठेवून मोबाईलचा वापर करणं, इतरांच्या बोलण्याकडे लक्ष नसणं, व्यक्तींशी बोलण्यात रुची नसणं, सतत नोटिफिकेशन तपासत राहणं आणि नवीन नोटिफिकेशन आलं नसेल तर निराश होणं, आपल्या फोनची रिंग होत असल्याचा किंवा तो व्हायब्रेट होत असल्याचा भास होणं, मोबाईल दूर ठेवला तर चिडचिड होणं ही आणखी काही लक्षणं आहेत.
आता यातून मार्ग कसा काढावा आणि या व्यसनातून सुटका कशी करून घ्यावी हे महत्त्वाचं आहे. यातील पहिली पायरी म्हणजे इतर व्यसनांप्रमाणेच व्यसनी व्यक्तीनं आपल्याला व्यसन लागलं आहे आणि त्यामुळे आपलं लक्ष कामावर केंद्रित होत नाही किंवा चुका होत आहेत हे प्रथम मान्य करावं लागतं. त्यातून बाहेर पडण्याची तिची इच्छा असावी लागते. अशा वेळी करायची पहिली गोष्ट म्हणजे अंथरुणात मोबाईल घेऊन झोपणं थांबवलं पाहिजेच; शिवाय झोपण्याआधी किमान ३० ते ४० मिनिटं मोबाईल तसंच इतर गॅजेट्सपासून दूर राहण्याची सवय लावून घेतली पाहिजे. दीड तासाहून अधिक काळ वापरल्यास फोन सक्तीनं बाजूला ठेवावा. त्यानंतर दहा वेळा डोळ्यांची उघडझाप करावी. डोकं पाच वेळा डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे वळवावं. मनगटाची हालचाल घडय़ाळाच्या काटय़ाच्या दिशेनं आणि नंतर विरुद्ध दिशेनं करावी. यामुळे शारीरिक अकार्यक्षमता कमी होते.
मोबाईलमधून बाहेर पडणा-या निळ्या प्रकाशामुळे सूर्यास्तानंतर मोबाईलचा वापर केला, तर झोपेच्या सवयी आणि कालावधीत बदल होतो. ती झोपेची वेळ असल्याचा संदेश मेंदूला मिळत नाही आणि निद्रानाशाचा विकार जडतो. बहुतेक सर्वच मोबाईल फोनमध्ये ब्ल्यू फिल्टर अ‍ॅप किंवा फीचर असतंच. सूर्यास्त झाला की ही अ‍ॅप सुरू व्हावीत अशा प्रकारे सेट केलेली असतात. त्यांच्या सातत्यपूर्ण वापरामुळे मनाला झोपण्याआधी ते अ‍ॅप सुरू केलंच पाहिजे अशी सवय लागते. यासाठी तज्ज्ञ असा सल्ला देतात की अशी नोटिफिकेशन्स किंवा व्यसनं जडवणारी अ‍ॅप इन्स्टॉल करू नका. केली असतील तर काढून टाका. रात्रीच्या वेळी आपला फोन सायलेंट मोडवर टाका. सगळ्या मेल्स चेक करत बसण्यापेक्षा फक्त अतिमहत्त्वाच्या किंवा गरजेच्या मेल्स चेक करता याव्यात यासाठी मेलचं वर्गीकरण करणारी अ‍ॅप्स आहेत. ती डाऊनलोड करावीत. त्यामुळे ब-याचशा अनावश्यक मेल न वाचताच डिलिट करता येतील. मोबाईलऐवजी एखाद्या स्वारस्यपूर्ण गोष्टीत स्वत:ला गुंतवून घेणं आणि मोबाईल वापराची इच्छा दूर सारणं अत्यंत महत्त्वाचं असतं.
स्वयंशिस्तीला पर्याय नाही
तज्ज्ञांच्या मते स्वयंशिस्त ही स्मार्टफोनच्या वापराशी संबंधित अत्यंत महत्त्वाची बाब आहे. कोणत्याही गोष्टीच्या आहारी जाण्याची मनोवृत्ती कमी करणं आवश्यक असतं. कामाला आणि कुटुंबाला प्राधान्य देणं, फोनवरील संभाषणापेक्षा प्रत्यक्ष संभाषणाला महत्त्व देणं, प्रत्यक्ष समाजात मिसळणं या गोष्टी करणं आपल्या दृष्टीनं हितकारक आहे हे स्वत:लाच पटवून देणं आणि स्मार्टफोनचे दुष्परिणाम काय होतात हे व्यवस्थित समजून घेणं या गोष्टी केल्या तर वेगळे मानसोपचार करावे लागत नाहीत. अर्थातच ते जमत नसेल तर मानसोपचारतज्ज्ञांकडे जाण्यात कमीपणा बिलकूल नाही हेही लक्षात घेतलं पाहिजे. आपण किती वेळ ऑनलाईन घालवला हे सांगणारं अ‍ॅप असतं. ते अवश्य डाऊनलोड करावं. त्यामुळे आपण ५-१० मिनिटंच फोनवर आहे, असं म्हणतो त्यावेळी प्रत्यक्षात ३०-४० मिनिटं झालेली असतात हे आपल्याला मान्य करावंच लागतं. अनेक लोक किमान तीन ते सहा तास ऑनलाईन असतात. याचा अर्थ ते इतर कामांवर अन्याय करतातच पण आरोग्याचा बळी देऊन स्वत:वर कमालीचा अन्याय करतात, असे जगभरच्या संशोधनांमधले निष्कर्ष आहेत

No comments:

Post a Comment