इंटरनेट आणि त्यावरील समाजमाध्यमांमुळे आपण एखाद्या देशाचे नव्हे, तर अवघ्या जगाचे नागरिक झालो आहोत. देशाचा नागरिक म्हणून आपल्यावर जी बंधने असतात, त्यापेक्षा जगाचा नागरिक म्हणून कितीतरी अधिक असतात. म्हणूनच समाजमाध्यमांचाच नव्हे, तर एकंदरीतच इंटरनेटचा वापर करताना खूप जबाबदारीने वागावे लागते. शाळकरी आणि महाविद्यालयीन मुले आजकाल त्यांच्या आईवडिलांशी मन मोकळे करण्याच्या ऐवजी समाजमाध्यमांवर करतात आणि त्यावरील कृत्रिम प्रेम, जिव्हाळा खरा आहे असे मानून त्यात अतीव समाधान मानतात. इंटरनेट हे दुधारी शस्त्र आहे, जितका उपयोग तितकाच धोकाही. हे लक्षात येईपर्यंत काही वेळा खूप उशीर झालेला असतो. म्हणूनच सायबर सुरक्षा या शब्दांना दिवसेंदिवस अधिकाधिक महत्त्व येत आहे. आपले मूल रडत आहे ना, मग त्याला हातात मोबाइल देऊन गप्प करा असे आईबापाला वाटू लागले की, त्या मुलाची इंटरनेटशी पहिल्यांदा ओळख होते. ते मूल जसजसे मोठे होत जाते, तसतसे इंटरनेटचे जग त्याला आपल्याकडे ओढून नेते आणि मग नको त्या गोष्टी घडायला लागतात. आपला मुलगा किंवा मुलगी मोबाइल वर काय बघते, याचा बऱ्याच आईबापांना पत्ता नसतो. त्यांनाही जाग येते ती पोलिसांची थाप दारावर पडल्यावर. म्हणून मुलांवर इतर संस्कार करतानाच ‘इंटरनेट संस्कार’ही करायला हवेत, याची जाणीव पालक, शिक्षक आणि विशेष म्हणजे स्वतः मुलांनाही वाटू लागली आहे. मुले, पालक, शिक्षक आणि पोलिस या सर्वांची मोट बांधून त्यांना सायबर जागृत करण्याचा उपक्रम करणाऱ्या काही संस्था आज चांगले काम करत आहेत. ‘रेस्पॉन्सिबल नेटिझम’ ही ठाण्यातील संस्था त्यातीलच एक आहे.
त्यांनी अलीकडेच ‘सायबर अलर्ट स्कूल’ या नावाने एक प्रकल्प हाती घेतला होता. मुंबईच्या एच वॉर्डमधील २५ शाळांमधील विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक त्यात सहभागी झाले होते. प्रामुख्याने इंटरनेटवरील गैरवर्तनाचे कायदेशीर परिणाम, इंटरनेटच्या अनिर्बंध वापराचे मानसिक परिणाम यांची जाणीव करून देण्याचे काम या प्रकल्पात झाले. त्याच बरोबर इंटरनेट व गॅझेटचा सुरक्षित, सकारात्मक वापर करायला शिकवून सायबर सुरक्षेकडे एक महत्त्वाचे पाऊल टाकले गेले. या प्रकल्पाची व्याप्ती बघितली, तर निष्कर्ष किती महत्त्वाचे आहेत, त्याचा अंदाज येईल. यात इयत्ता सहावी ते दहावीचे वीस हजारपेक्षा अधिक विद्यार्थी, पाच हजार पालक आणि ६५० शिक्षक यात सहभागी झाले होते. आधी मुलांना सायबर सुरक्षेचे किती ज्ञान आहे ते पाहण्यात आले आणि प्रकल्प संपताना त्या ज्ञानात किती वाढ झाली, तेही पाहण्यात आले. त्याचा अहवाल शिक्षणमंत्र्यांना देण्यात येईल आणि मग तो पॅटर्न राज्यभर लागू व्हावा, अशी अपेक्षा आहे. या साऱ्या पाहणीत काय आढळले? पस्तीस टक्के मुलांचा स्क्रीन टाइम (म्हणजे इंटरनेट हाताळण्याची वेळ) एक ते दोन तास आहे. तीस टक्के मुलांचा दोन ते तीन तास आहे, तर पंधरा टक्के मुलांचा चार ते पाच तास आहे. दहा टक्के मुलांचे स्क्रीन टाइम पाच ते सहा तास आहेत, तर दहा टक्के मुलांचा स्क्रीन टाइम सात ते दहा तास आहे. यापैकी ६५ टक्के मुलं मोबाईलमधून इंटरनेटचा वापर करतात. त्याखालोखाल कम्प्युटर, लॅपटॉप व टॅबचा वापर करतात. ३२ टक्के मुलांची प्रथम पसंती युट्युबला आहे. यात १० ते १५ वयोगटातील मुले आहेत. सत्तर टक्के मुले त्यांच्या वयासाठी कायदेशीर नाही, अशा समाजमाध्यमांचा वापर करतात. विशेष म्हणजे, ६५ टक्के मुलांना सायबरविश्वातील धोक्यांबद्दल अजिबात माहिती नाही. ८१ टक्के मुलांना सायबर सुरक्षिततेबद्दल ज्ञान नाही. साठ टक्के मुलांना समाजमाध्यमांवरील प्रायव्हसी सेटिंगबद्दल माहीत नाही. मुळातच सायबरविश्वातील धोके माहीत नसल्याने खूप मुले खूप धोके पत्करताना दिसतात. कारण त्यात धोका आहे, हेच त्यांना कळत नाही.
चार महिने मुलांबरोबर काम केल्यावर सायबर सुरक्षितता, त्याचे फायदे आणि सायबरविश्वातील धोके याबद्दल मुलांच्या ज्ञानात ६५ टक्केपेक्षा जास्त वाढ झालेली दिसून आली. अशा प्रकारच्या उपक्रमांची आज फार गरज आहे. त्या उपक्रमांमध्ये मुलांशी सतत संवाद करणे, त्यांना चांगले आणि वाईट यांची जाणीव करून देणे खूप आवश्यक आहे. खुद्द मुलांनीच सांगितले की, अभ्यासक्रमात सायबर सुरक्षिततेबद्दला माहिती असायला हवी. यात पालकाची भूमिका खूप महत्त्वाची आहे. मूल अगदी लहान असताना त्याला गप्प बसविण्यासाठी हातात मोबाइल किंवा आयपॅड देणारे पालक जबाबदार श्रेणीत कसे मोजले जातील? आपणच चूक करायची आणि मग मुले वाहवत गेली, असे म्हणायचे हा कोणता न्याय? इंटरनेटचा सकारात्मक वापर करता येतो आणि त्यातून ज्ञान मिळू शकते, हे जेव्हा मुलांना कळेल तेव्हा इंटरनेटचा गैरवापर थांबेल. अन्यथा आजकाल काही मुले एवढी मोबाइल अथवा अन्य गॅजेटना चिकटलेली असतात आणि खऱ्या विश्वाऐवजी आभासी जगालाच खरे मानू लागतात आणि मग गोंधळ होतो. मुलाने अभ्यास करावा म्हणून आईने त्याच्या हातातला मोबाइल काढून घेतला आणि त्या रागातून मुलाने आत्महत्या केली किंवा तत्सम टोकाचे पाऊल उचलले, या बातम्या तुम्ही वाचल्या असतील. किंवा सायबर सुरक्षेविषयी काहीही माहिती नसताना इंटरनेटचा वापर केल्यामुळे मोठे आर्थिक अथवा अन्य प्रकारचे नुकसान झाल्याच्या घटनाही अनेक वाचनात आल्या असतील. समाजमाध्यमांवर एखाद्याचे बोगस खाते उघडून त्याची वा तिची बदनामी करणे हे तर सर्रास होऊ लागले आहे. ही सगळी कृत्ये मुलेच करतात असे मला म्हणायचे नाही. मोठी माणसेही करतात, परंतु त्यांचा बळी ठरण्याची वेळ मात्र किशोरवयीन मुलांवर येऊ शकते.
‘रेस्पॉन्सिबल नेटिझम’ ही संस्था सायबर सुरक्षेविषयी जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेत असली, तरी टाळी एका हाताने वाजत नाही हे लक्षात घेतले पाहिजे. सरकार व पोलिस यंत्रणेचा भक्कम पाठिंबा या चळवळीला मिळायला हवा. तरच याचे दृश्य परिणाम समाजात दिसायला लागतील. कारण ‘रेस्पॉन्सिबल नेटिझम’ ही संस्था नफा मिळविण्यासाठी अथवा आर्थिक व्यवहार करून गलेलठ्ठ होण्यासाठी काढलेली संस्था नाही. प्रसंगी स्वतःच्या खिशातील पैसे टाकून सायबर सुरक्षेचे कार्य करणारी संस्था आहे. ही संस्था व असेच काम करणाऱ्या इतर संस्था यांच्यावर सरकारचा आणि सुरक्षा यंत्रणेचा वरदहस्त असला, तर खूप चांगले काम होऊ शकेल. मुंबईतील एसएनडीटी महाविद्यालयाच्या डॉ. अनुराधा सोवनी या नेटिझमच्या प्रकल्पाचे काम पाहण्यात अग्रणी होत्या. सोनाली पाटणकर, उन्मेष जोशी आणि त्यांचे असंख्य मित्र हे या संस्थेचे आधारस्तंभ आहेत. या मंडळींबरोबर काही वेळा ‘महाराष्ट्र टाइम्स’ही कार्यक्रमात सहभागी झाला आहे. त्यामुळे त्यांचे कार्य किती महत्त्वाचे आहे याची माहिती आहे.
सरकारने सायबर सुरक्षा हा विषय शालेय पुस्तकात समाविष्ट केला पाहिजे आणि मुलांना योग्य मार्गदर्शन केले पाहिजे, अशी वेळ येऊन ठेपली आहे. निर्णय सरकारच्या हातात आहे. तो कधी होतो त्याची वाट पाहायची!
No comments:
Post a Comment