भोंसला मिलिटरी स्कूलचा आधारवड कोसळला!
सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी संचालित भोंसला मिलिटरी स्कूलचे माजी प्राचार्य, समादेशक व संस्थेचे जनरल सेक्रेटरी स्वातंत्र्यसैनिक व मेजर प्रभाकर बळवंत कुलकर्णी (रिटायर्ड) यांचे वृद्धापकाळाने दि. २८ नोव्हेंबर रोजी सकाळी पहाटे ४ वाजता निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ९१ वर्षे होते. मेजर पी. बी. कुलकर्णी यांचा शाळेतील कामकाजाचा प्रवास शिक्षक, प्राचार्य, समादेशक व संस्थेचे जनरल सेक्रेटरी असा झाला. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी व फील्ड मार्शल सॅम माणिकशॉ यांनी शाळेला भेट दिली असता मेजर पी. बी. कुलकर्णी हे त्यावेळी उपस्थित होते. त्यांनी शाळेचा रजतमहोत्सव, सुवर्णमहोत्सव, हीरक महोत्सव कालखंड बघितला. त्यांच्या निधनामुळे शाळेची, संस्थेची अपरिमित हानी झाली, जी कधीही भरून न येणारी आहे. भोंसला मिलिटरी स्कूलमधील शहीद स्मारकाजवळ मेजर पी. बी. कुलकर्णी यांचे पार्थिव अंतिम दर्शनाकरिता ठेवण्यात आले. त्याचबरोबर संस्थेचे कार्याध्यक्ष पी. जी. कुलकर्णी व इतर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. कुलकर्णी परिवारांवर जी दुःखाची कुऱ्हाड कोसळली, त्या दु:खात भोंसला मिलिटरी स्कूल शालेय समिती अध्यक्ष अनिरुद्ध तेलंग, प्राचार्या चेतना गौड तसेच शिक्षक, मिलिटरी स्टाफ व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी आहेत.
मेजर प्रभाकर कुलकर्णी. भोसलाशी अतूट नातं. भारतीय सैन्यात मेजर पदावर निवृत्त झालेले पण ४० वर्षांहून अधिक भोसला सेवेत असलेले, प्रामाणिक आणि कर्तृत्ववान सेनानी. सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षणक्षेत्रात आपला स्वतःचा असा स्वतंत्र ठसा उमटवलेले. भोसलातील त्यांची सुरुवात १९५६ सालापासूनची. मूळचे राहुरी तालुक्यातील वांबोरी अहमदनगरचे आणि वारसा स्वातंत्र्यसैनिकांच्या घरातला. भोसला मिलिटरी स्कूलचे ते अनेक वर्षे मुख्याध्यापक राहिले, कमांडंट राहिले आणि त्याच बरोबरीने सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी म्हणूनही वीस वर्षांहून अधिक काळ त्यांनी काम केले. जवळपास ५५ वर्ष भोसलाच्या रामभूमीमध्ये त्यांचा प्रत्यक्ष कामाच्या निमित्ताने सातत्याने वावर राहिला आहे.
मे. कुलकर्णी म्हणजे भोसला आणि भोसला म्हणजे मे. कुलकर्णी, हे समीकरण अनेक वर्षांसाठी होतं. सातत्याने कुणाशीही संवाद साधताना सैन्य, युद्ध, भोसला यासारखे विषय त्यांच्या बोलण्यात असायचे. आपण केलेलं काम हे पुढच्या पिढीपर्यंत सुरळीत पोहोचावं, अशी त्यांची मनोधारणा. मेजर कुलकर्णी यांनी त्या काळात हिंदुस्तान पेपरचे शेअर्स विकत घेऊन कागद साठा सवलतीत मिळवला. एक टन कागदामुळे मोठी सवलत मिळू शकल्यामुळे विद्यार्थ्यांना वह्या स्वस्त मिळाल्या. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत स्वच्छता, जागरूकता, समायोजन, चिकाटी,जिद्द या गुणांचा विकास होण्यासाठी ते सातत्याने काही ना काही कार्यक्रमांची आखणी करत असायचे. याबरोबरीने विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार होण्यासाठी, त्यांच्याशी भावनात्मकरित्या एकरूप होण्यासाठी दैनंदिन प्रगतीत प्रोत्साहन देण्यापासून अडचणीच्या काळात खंबीरपणे त्यांच्यामागे उभे राहणारे कुलकर्णी यांच्याविषयी विद्यार्थ्यांच्या मनात आदरयुक्त भीती असायची.
कामात सुसूत्रता यावी म्हणून साप्ताहिक विचारविनिमय सभा घेऊन संस्थेमध्ये राबवत असलेल्या कार्यक्रमांच्या साखळी उलगडत जाणे हे त्यांच्या कामाचे आगळेवेगळे वैशिष्ट्य होते. त्यांच्या आग्रहाखातर अपवादात्मक निर्णय म्हणून प्रत्येक तुकडीसाठी दोन पदवीधर शिक्षक महाराष्ट्र शासनाने मंजूर केले. शाळेसाठी अनुदान मिळवण्यासाठी त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेली धडपड ही उल्लेखनीय आहे.शाळेसाठी कमांडंट, चीफ ट्रेनिंग ऑफिसर, असिस्टंट ट्रेनिंग ऑफिसर, रायटिंग मास्टर, मेस मॅनेजर डिफेन्समधून निवृत्त झालेल्या संबंधित अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र प्रशिक्षित ग्रंथपाल ही पदेसुद्धा शासकीय वेतनासाठी त्यांनी मान्यता प्राप्त करून घेतली. एनडीए प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी इयत्ता आठवीपासून विद्यार्थ्यांना इंग्रजी व गणित विषयांमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी दोन विशेष शिक्षकांची परवानगी विशेष बाब म्हणून शासनाकडून मंजूर करून घेतली.
मध्य प्रदेश, दिल्ली, राजस्थान, कोलकाता, गुजरात, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू व महाराष्ट्र इत्यादी राज्यांमध्ये विविध वर्गांचे गट करून सहलीला पाठविण्याचा त्यांनी उपक्रम सुरू केला. त्यामुळे शाळेत इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे तीन चतुर्थांश भारतभ्रमण होत असे. पूर्णपणे शिक्षकांनी आखलेल्या अंमलबजावणी केलेल्या सहली आजही रामदंडीच्या चांगल्याच स्मरणात आहेत.खेळामध्ये विद्यार्थ्यांचा विकास व्हावा यासाठी भोंसला मिलिटरी स्कूलमध्ये ‘स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया’ या प्रशिक्षण केंद्राची सुरुवात करणाऱ्यांमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. आज सुरू असलेली शिक्षकांची सहकारी पतपेढी ही सुरू करण्याची कल्पनाही प्रभाकर कुलकर्णी यांचीच. मंडळाच्या कार्यकारिणीवर शिक्षक सभासदांची संख्या वाढविण्यावर भर दिला गेला. त्यामुळे मंडळामध्ये शिक्षकांची बाजू मांडताना योग्य असा विचारविनिमय होण्यासाठी मदत व्हायची. शाळेत विद्यार्थी रामदंडीसाठी सूचना पेटी असायची आणि त्या सूचनांचा उणिवा किंवा तक्रारी दूर करण्यासाठी चांगला उपयोग होत असे.
रायडिंग स्कूल, फायरिंग रेंज, अश्वशाळा यातील सर्व बारीकसारीक गोष्टी याचा विचार करून त्या व्यवस्थित कशा होतील यासाठी मे. प्रभाकर कुलकर्णी सतत प्रयत्नशील असायचे. एकेकाळी ‘शोले’ चित्रपटासाठी या शाळेतून घोडे पुरवण्यात आले होते. आजही नाशिकच्या पोलीस परेड मैदानावर परेडमध्ये भोसलाचे अश्वपथक गेली अनेक वर्ष नाशिककरांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यांचा महत्त्वाचा गुण म्हणजे वक्तशीरपणा. कुठल्याही कार्यक्रमाच्या अगोदर बरोबर पंधरा मिनिटे हजर होणारे मेजर सर्वांच्याच लक्षात आहेत. भोंसलाच्या रामभूमीमध्ये कोदंडधारी रामाचे मंदिर असावे, ही कल्पना संस्थेतील शिक्षक पालक यांनी १९८२ साली मांडली. या मंदिराच्या भूमिपूजनासाठी कामकोटीचे शंकराचार्य यावेत, यासाठीचा आग्रह त्यांनी आणि दादासाहेब रत्नपारखी यांनी धरला. मे. प्रभाकर कुलकर्णी यांनी संस्थेची जबाबदारी सांभाळत असताना अनेक मान्यवरांनी संस्थेला भेट दिली आहे. त्यात लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, शरद पवार, जॉर्ज फर्नांडिस अशी राजकीय क्षेत्रातील नावे घेता येतील. सैन्यातील अनेक मान्यवरांनी संस्थेला भेट दिली आहे. भोंसलाच्या रामभूमीमध्ये अनेक मान्यवरांचा वावर राहिला आहे. संघाच्या मुशीत घडलेल्या एका सैन्य अधिकाऱ्याची, शिक्षकाची समर्पण भावना ही खऱ्या अर्थाने सगळ्यांना प्रेरणा देणारी आहे. त्यांना विनम्र श्रद्धांजली!
-
No comments:
Post a Comment