वर्ध्यातील पुलगाव
दारुगोळा भांडारात झालेल्या स्फोटाने काही मुद्दे नव्याने उपस्थित झाले आहेत. या
स्फोटाची सखोल चौकशी करून अशा प्रकारचे अपघात कसे टाळता येतील याचा अभ्यास करणे
आवश्यक आहे. तसेच या घटनेनंतर आता देशातील सर्वच दारूगोळा कारखाने, दारूगोळा
भांडारे तसेच सीमेवर जिथे दारूगोळा साठवला जातो तिथे या अभ्यासातील उपाययोजना लागू
करणे गरजेचे आहे. तरच अशा घटनांची पुनरावृत्ती टळेल.
---------------------------------------------
वर्ध्यातील पुलगाव
केंद्रीय दारूगोळा भांडारामध्ये निकामी २३ एम एमचा खराब दारुगोळा नष्ट कऱण्याच्या
फायरिंग रेंजमध्ये झालेल्या अपघातात सहा जणांचा नाहक बळी गेला. त्यातील पाच जण
गावकरी होते. दारूगोळा घेऊन जाणार्या एका मजुराच्या हातातून भरलेला खोका खाली
पडल्याने स्फोट झाला आणि ही जीवितहानी झाली. यासंदर्भात अनेक उलटसुलट आणि चुकीची
माहिती प्रसारित झाली. यामध्ये सदर अपघाताला भारतीय लष्कर जबाबदार होते असे म्हटले
होते. लष्कराने खराब दारूगोळा नष्ट करण्यासाठी खासगी कंत्राटदार आणि अप्रशिक्षित
मजुरांकडून करून घेतले असल्यामुळे हा अपघात झाला, असेही यामध्ये म्हटले होते.
थोडक्यात, युद्ध तरबेज लष्करच या दुर्घटनेला जबाबदार
असल्याचे म्हटले गेले. मात्र ही सर्व माहिती साफ चुकीची आहे.
या अपघाताशी
भारतीय सैन्याचा काहीही संबंध नाही. खराब दारूगोळा नष्ट कऱण्याचे काम हे जबलपूर
येथील खमरिया आ़युध निर्माण कारखान्याचे() अधिकारी करत होते. दारूगोळा बनवणार्या
कारखान्याकडे दारूगोळा नष्ट करण्यासाठी रेंज किंवा रिकामी जागा असते. मात्र एका
ठराविक मर्यादेबाहेर दारूगोळा नष्ट करावा लागतो तेव्हा मोठ्या आणि अत्याधुनिक
रेंजची गरज असते. अशी रेंज फक्त पुलगाव केंद्रीय दारुगोळा भांडारातच उपलब्ध आहे.
म्हणूनच खमरिया आयुध निर्माण कारखान्यातील खराब 23 मिलीमीटर बॉम्ब निकामी करण्याचे
कार्य पुलगावच्या रेंजमध्ये केले जात होते.
दुसरे, दारूगोळा
निर्माण कारखाना हा लष्कराच्या अंतर्गत येत नाही; ते संरक्षण
उत्पादन मंत्रालयाअंतर्गत येते. त्याचा सैन्याशी थेट संबंध काहीही नाही.
जबलपूरच्या आयुध निर्माण कारखान्याने त्यांचे काही अधिकारी आणले होते हे खरे आहे;
पण गाडीतून दारूगोळा उतरवण्याचे आणि फायरिंग रेंजपर्यंत नेण्याचे
काम मात्र मजूरच करतात. हीच पद्धत गेल्या अनेक वर्षांपासून आहे. इथे मजुरांद्वारे
दारुगोळा गाडीत भरणे, उतरवणे आणि निकामी करण्यासाठी रेंजवर
नेणे अशी कामे केली जातात. मात्र दारूगोळा प्रत्यक्ष निकामी(डिमोलीशन करण्याचे)
करण्याचे काम प्रशिक्षित कर्मचारी किंवा अधिकार्यांकडूनच केले जाते. अनेक
वर्षांपूर्वी भारतीय सैन्यात ‘पायोनिर कोअर’ नावाचा एक विभाग होता. या विभागामार्फत दारूगोळा गाडीत भरणे आणि खाली करणे
ही कामे करण्यात येत असत. सैन्यकपातीमध्ये पायोनिअर कंपन्या सैन्यातून कमी करण्यात
आल्या. कारण ते काम मर्यादित काळात म्हणजे लढाईच्या प्रसंगीच असायचे. कारगीलच्या
लढाईत सुद्धा सैन्याला उच्च शिखरावर दारूगोळा नेण्यासाठी पायोनियर कंपन्या उपलब्ध
नव्हत्या. त्यावेळी तात्पुरत्या पोर्टर कंपन्यांचा(काश्मिर मधले दारुगोळा नेणारे
मजुर) आधार घेण्यात आला. काश्मिरी युवकांचा वापर दारुगोळा पोहोचवण्याचे काम
करण्यासाठी झाला होता.
ताज्या घटनेनंतर
एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे अशा प्रकारे दारूगोळा निकामी करताना
होणारी जीवितहानी टाळण्यासाठी काय उपाय योजता येतील. सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे
ते म्हणजे दारूगोळा धोकादायक कधी ठरतो आणि ते कसे निकामी करता येईल हे पहावे
लागेल. प्रत्येक दारूगोळ्याचे एक आयुष्यमान असते. त्या काळात जर तो दारूगोळा
वापरला गेला नाही किंवा मुदत संपून गेल्यानंतर तो निकामी करावा लागतो. एखाद्या
दारूगोळ्याची चाचणी करताना अपघात झाला तर त्या बॅचमधील सर्व दारूगोळा बाहेर काढून
त्याचे पुनर्परिक्षण केले जाते आणि पूर्ण बॅच धोकादायक वाटली तर पूर्ण बॅच एकदमच
नष्ट केली जाते. अशा प्रकारे धोकादायक दारूगोळा ज्या युनिटमध्ये असेल तिथुन
कारखान्यात किंवा दारूगोळा भांडारात परत आणला जातो. अनेक महिने तो तसाच ठेवला
जातो. संरक्षण मंत्रालयाच्या परवानगी नंतर त्याची विल्हेवाट लावली जाते. म्हणूनच
धोकादायक दारूगोळा कमीत कमी वेळ भांडारामध्ये किंवा कारखान्यात ठेवला पाहिजे.
अन्यथा अपघाताची शक्यता अधिक वाढते. लौकर परवानगी देण्याचे काम संरक्षण
मंत्रालयाचे आहे.
दोन वर्षापुर्वी
पुलगावच्या कारखान्यात अशाच धोकादायक दारूगोळ्यामुळे अपघात झाला होता. हा दारूगोळा
वर्षभर भांडारात पडून होता आणि तिथे शॉर्टसर्किट होऊन मोठा अपघात झाला. म्हणूनच
धोकादायक दारूगोळा निकामी करण्याचा निर्णय संरक्षण मंत्रालयाने वेळ न घालवता लवकर घेतला पाहिजे. जेणेकरून धोका
कमी होऊ शकतो. दारूगोळा भांडारातून गाडीत भरून रेंजवर घेऊन जाताना तो वाटेत
पडल्यामुळेही काही वेळा पडल्याने अपघात होऊ शकतात. हे लक्षात घेता शक्य असल्यास
यंत्रमानवाचा वापर करणे गरजेचे आहे. काही देशांत या कामासाठी रोबोटचा वापर केला
जातो. मजुरांची गरज टाळता येणार नाही तिथे संभाव्य स्फोटांपासून संरक्षण
होण्यासाठी आवश्यक प्रोटेक्टिव सूट देणे गरजेचे आहे. त्यामुळे अपघात झाला तरी
जीवितहानी टाळण्यास मदत होईल.
प्रगत देशांमध्ये
दारूगोळा नष्ट करताना तो जमिनीच्या खोलवर आत गाडून केला जातो. म्ह्णुन खड्डे खोल
खणले पाहिजे. जिथे दारूगोळा नष्ट केला जातो तिथे एक रूग्णवाहिका ठेवणे सक्तीचे
असते पण पुलगावच्या अपघातस्थळी रूग्णवाहिका नसावी. त्यामुळे जखमी मजुरांना
रूग्णालयात पोहोचवण्यासही उशिर झाला असावा. त्यामुळे रेंजजवळ डॉक्टर, प्रथमोपचार,
रूग्णवाहिका असणे गरजेचे आहे.
एकंदरीत पाहता, ह्या
निष्काळजीपणाची जबाबदारी खमरियाच्या दारूगोळा भांडाराची आहे. त्यामुळे ज्या गावकर्यांचे प्राण गेले त्यांना
भरपाई देण्याची जबाबदारी दारूगोळा भांडार आणि पर्यायाने संरक्षण मंत्रालयावर आहे.
दारूगोळा
भांडाराच्या आसपास अनेक धोकादायक गोष्टी घडताना दिसतात. उदाहरणार्थ,. महाराष्ट्रातील
देहूरोड जवळच्या दारूगोळा भांडार कारखान्यात कितीतरी स्फोटक पदार्थ साठवून ठेवले
आहेत.या परिसरात एक ते दीड किलोमीटर परिसरात कोणतेही बांधकाम करायला परवानगी नाही.
कारण अपघात झाल्यास आजूबाजूच्या परिसरातल्या घरांना, लोकांना
धोका पोहोचू शकतो. सुरक्षा परिसर हा स्फोटकांच्या क्षमतेवर ठरवला जातो. या परिसरात
बांधकाम होऊ शकत नाही. पण राजकीय दबाव किंवा बांधकाम क्षेत्राचा दबाव यांमुळे
सुरक्षा परिसरातही बांधकाम झाल्याचे पहायला मिळते. हे अत्यंत चुकीचे आणि धोकादायक
आहे. भविष्यात एखाद्या मोठ्या धोका निर्माण होउ शकतो. त्यामुळे पुलगाव मधील
स्फोटाची सखोल चौकशी करून अशा प्रकारचे अपघात कसे टाळता येतील याचा अभ्यास करणे
आवश्यक आहे. त्यानंतर देशातील सर्वच दारूगोळा कारखाने, दारूगोळा
भांडारे तसेच सीमेवर जिथे दारूगोळा साठवला जातो तिथे या अभ्यासातील उपाययोजना लागू
करणे गरजेचे आहे. हाच पुलगावच्या अपघाताचा धडा आहे.
No comments:
Post a Comment