पक्षाचा अध्यक्षच जर सभ्यतेच्या मर्यादा सोडून वागत असेल, तर त्या पक्षातील अन्य नेत्यांनाही विरोधकांवर वाटेल तशी टीका करण्यासाठी चेव आल्याशिवाय राहणार नाही. तसेच राजकारणातील मुद्दे संपले की काहीतरी वेगळ्या विषयाकडे गाडी वळवून समाजात तेढ कशी निर्माण होईल, असा प्रयत्न काही राजकारणी जाणूनबुजून करीत असल्याचे दिसून येत असते. अलीकडील काही दिवसांत अशी अनेक उदाहरणे घडताना दिसत आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी चालू असतानाच, राजकारणी नेत्यांकडील विषय संपले की किंवा एखादा वाद निर्माण व्हावा या हेतूने ही मंडळी किती खालच्या पातळीवर येतात, याचे प्रत्यंतर सध्या येत आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे तर पंतप्रधानांबद्दल गेल्या अनेक दिवसांपासून जी असभ्य भाषा वापरत आहेत, ती मुळीच शोभणारी नाही. लोकशाहीमध्ये भाषणस्वातंत्र्य असले तरी देशाच्या पंतप्रधानांबद्दल बोलताना किंवा त्यांच्यावर टीका करताना राजकारणी मंडळींनी तारतम्य बाळगायला हवे, अशी माफक अपेक्षा असते. पण त्याचा विचार न करता काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधानांना वाट्टेल ती विशेषणे लावून त्यांच्यावर टीका करीत आहेत. आपल्या पक्षाचा अध्यक्षच जर सभ्यतेच्या मर्यादा सोडून वागत असेल, तर त्या पक्षातील अन्य नेत्यांनाही विरोधकांवर वाटेल तशी टीका करण्यासाठी चेव आल्याशिवाय राहणार नाही. तसेच राजकारणातील मुद्दे संपले की काहीतरी वेगळ्या विषयाकडे गाडी वळवून समाजात तेढ कशी निर्माण होईल, असा प्रयत्न काही राजकारणी जाणूनबुजून करीत असल्याचे दिसून येत असते. अलीकडील काही दिवसांत अशी अनेक उदाहरणे घडताना दिसत आहेत.
राजस्थानमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सी. पी. जोशी यांनी समाजात तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य केले. सी. पी. जोशी हे माजी केंद्रीय मंत्री आहेत. ते आता विधानसभेची निवडणूक लढवित आहेत. निवडणूक प्रचाराच्या वेळी बोलताना, हिंदू धर्माबद्दल केवळ ब्राह्मणच बोलू शकतात. अन्य कोणाला त्याबद्दल बोलण्याचा अधिकार नसल्याचे स्पष्ट करून या वादात त्यांनी उमा भारती आणि पंतप्रधान मोदी यांनाही ओढले. “उमा भारती या लोधी समाजाच्या आहेत आणि पंतप्रधान मोदी हेही अन्य जातीचे असल्याने ते हिंदू धर्माबद्दल बोलतात कसे?”असा प्रश्न जोशी यांनी उपस्थित केला आहे. हिंदू धर्माबद्दल केवळ ब्राह्मण वा पंडितच बोलू शकतात, असे त्यांचे म्हणणे होते. सी. पी. जोशी यांच्या या समाजात तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्याचे केवळ राजस्थानातच नाही तर देशभर तीव्र पडसाद उमटले. त्या वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात आला. सी. पी. जोशी जे बरळले त्याचा निवडणुकीत फटका बसू शकतो, हे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या लक्षात आल्याने त्यांनी सी. पी. जोशी यांच्या वक्तव्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आणि जोशी यांना दिलगिरी व्यक्त करण्यास सांगितले. पण, असे बेजबाबदार विधान करणाऱ्या जोशी यांच्यावर जी कठोर कारवाई करणे अपेक्षित होते, तशी मात्र त्यांनी केली नाही. जोशी यांचे वक्तव्य काँग्रेसच्या आदर्शांच्या विपरीत आहे. पक्षाच्या कोणाही नेत्याने समाजाच्या कोणत्याही वर्गाच्या भावना दुखावतील असे वक्तव्य करू नये, असे सांगण्यास राहुल गांधी विसरले नाहीत. पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या आदेशानंतर, “माझ्या वक्तव्यामुळे समाजातील एखाद्या वर्गास ठेच लागली असेल तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो,” असे सी. पी. जोशी म्हणाले. आता सी. पी. जोशी यांच्या या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस बजावली आहे.
जोशी यांच्या वक्तव्यावरून काँग्रेसच्या जातीयवादी राजकारणाचेच दर्शन होते. मात्र, लोकांमध्ये फूट पाडण्याची काँग्रेस पक्षाची ही भेदनीती यशस्वी होणार नाही, असे भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी म्हटले आहे. या संदर्भातील राहुल गांधी यांचे वक्तव्य म्हणजे ‘निव्वळ नाटकबाजी’ असल्याचेही ते म्हणतात, तर काँग्रेस ‘फोडा आणि राज्य करा’ या राजनीतीचा अवलंब करीत आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केली आहे. काँग्रेस पक्षात सी. पी. जोशी यांच्यासारखे अन्य नेतेही आहेत. त्यांनी जी मुक्ताफळे उधळली तीही या निमित्ताने लोकांपुढे आली आहेत. काँग्रेसचे नेते असलेले अभिनेते राज बब्बर हेही असेच काहीबाही बडबडले. निवडणूक प्रचारादरम्यान मध्य प्रदेशातील इंदूर येथे बोलताना, काहीही संबंध नसताना बब्बर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ९८ वर्षे वयाच्या आईचा उल्लेख केला. “डॉलरच्या तुलनेत रुपयाची जी घसरण होत चालली आहे, ती पाहता लवकरच रुपया मोदी यांच्या आईच्या वयाइतका घसरेल,” असे ते म्हणाले. राज बब्बर यांनी असे भाष्य करण्याची खरे म्हणजे काहीही गरज नव्हती. पण, अभिनेत्याला कोणी तरी लिहून दिलेले म्हणण्याची सवय असते. त्यामुळे राज बब्बर यांचा हा ‘बोलविता धनी’ कोण असावा, याचा शोध घेण्यास वाचकांना वेळ लागणार नाही! राज बब्बर यांच्या या वक्तव्यावर पंतप्रधान मोदी यांनी जोरदार टीका केली. “राजकारणातील साधा ‘र’ ही जिला माहीत नाही, अशा माझ्या आईला राजकीय वादात ओढल्याबद्दल पंतप्रधानांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. बोलण्यासारखे काहीच मुद्दे नसले की एखाद्याच्या आईबाबत आक्षेपार्ह विधाने केली जातात,” अशा शब्दांत पंतप्रधानांनी राज बब्बर यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
काँग्रेसचे असेच एक बरळणारे नेते म्हणजे माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार. राज बब्बर यांच्याप्रमाणेच असेच आक्षेपार्ह विधान या महाशयांनी केले. राहुल गांधी यांचे वडील राजीव गांधी, त्यांची आई इंदिरा गांधी, इंदिरा गांधी यांचे वडील जवाहरलाल नेहरू, नेहरू यांचे वडील मोतीलाल नेहरू अशी सर्व वंशावळ सादर करून, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडिलांचे नाव तरी कोणाला माहिती आहे का?,” असा प्रश्न त्यांनी केला. राजस्थानमध्ये काँग्रेस पक्षाच्या सभेत बोलताना मुत्तेमवार म्हणाले की, “आपण (मोदी) पंतप्रधान होईपर्यंत आपणास कोण ओळखत होते? एवढेच नाही तर आतादेखील कोणालाही आपल्या वडिलांचे नाव माहिती नाही. पण प्रत्येकाला राहुल गांधी यांच्या वडिलांचे नाव माहिती आहे.” सतत नेहरू घराण्याची हुजरेगिरी करणाऱ्यांच्या लक्षात अन्य कोणाची नावे कशाला राहतील? सदासर्वदा नेहरू घराण्याची तळी उचलणाऱ्या विलास मुत्तेमवार यांच्याकडून अन्य अपेक्षाही करता येणार नाही. पंतप्रधान नरेंद्र दामोदरदास मोदी हे ज्या मुशीत घडले तेथे, देश हेच आमचे घराणे, देश हीच माता आणि देश हाच पिता, असे संस्कार त्यांच्या हृदयावर ठसविले गेले आहेत. स्वत:च्या घरादाराचा विचार न करता समाजासाठी ज्या व्यक्तीने सर्वस्व झोकून दिले, त्या व्यक्तीची अशी अवहेलना करता तुम्ही विलास मुत्तेमवार? सदैव नेहरू घराण्याचा जप करणाऱ्या मुत्तेमवार यांच्यासारख्या नतद्रष्ट व्यक्तीला देशकार्यासाठी स्वत:च्या घरादारावर पाणी सोडून कार्य करणाऱ्या आणि कार्य केलेल्या शेकडो कार्यकर्त्यांचा त्याग थोडाच दिसणार आहे? पण जनता शहाणी झाली आहे. घराणेशाहीमुळे देशाची किती वाट लागली, याचा अनुभव जनतेने घेतलेला आहे. राष्ट्र हेच घराणे मानून त्यासाठी सर्वस्वाचा होम करणाऱ्यांचे कार्य जनता आता अनुभवत आहेत. हीच जनता सी. पी. जोशी, राज बब्बर, विलास मुत्तेमवार यांच्यासारख्या नेत्यांना आणि त्यांच्या बोलवित्या धन्यास त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही!
No comments:
Post a Comment