श्रीलंकेत अखेरीस तिथल्या आजी-माजी राष्ट्राध्यक्षांनी घटनात्मक पेचप्रसंग उभा करून ठेवला आहे. मैत्रिपाल श्रीसेना यांनी मागील दोन आठवड्यात इतक्या कोलांट्या उड्या मारलेल्या आहेत की, उद्या काय होईल ते आज कोणी सांगू शकणार नाही. दोनच आठवड्यांपूर्वी अध्यक्षांनी अकस्मात पंतप्रधान विक्रमसिंघे यांना पदच्युत करून त्यांच्या जागी माजी राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्षे यांची पंतप्रधान म्हणून नेमणूक केलेली होती. त्यातून एक पेचप्रसंग उभा राहिला होता. संसदेतच पंतप्रधानांवर विश्वास किंवा अविश्वास व्यक्तहोण्याची तरतूद असताना, अशा बडतर्फीची गरज नव्हती. खरे तर विक्रमसिंघे यांनी त्यासाठी संसदेची बैठक बोलावलेली होती; पण बहुधा त्यात त्यांचे बहुमत सिद्ध होण्याची शक्यता असल्याने श्रीसेने यांनी पंतप्रधानांनाच बरखास्त करून टाकले. तर त्यांच्याच गटातले असल्याने सभापतींनी राष्ट्राध्यक्षांचा बेत हाणून पाडण्यासाठी संसदेची बैठक बोलावली आणि नव्या पंतप्रधानांची नेमणूकच अमान्य केली. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष इतके गडबडले की, त्यांनी संसदेचे सभागृहच स्थगित करून टाकले व बैठकीलाच प्रतिरोध निर्माण केला; पण त्याचा उपयोग नव्हता. आज, उद्या जेव्हा संसदेची बैठक झाली असती तेव्हा नव्या पंतप्रधानांना बहुमताची संख्या उभी करावी लागणारच होती; पण तशी कुठलीही शक्यता दिसत नव्हती. मग अखेरचा उपाय म्हणून श्रीसेने यांनी संसदच बरखास्त करून टाकली आहे आणि नव्या मध्यावधी निवडणुकींची घोषणा केलेली आहे. त्यानुसार जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात श्रीलंका संसदेच्या नव्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. मात्र, त्यातही राष्ट्राध्यक्ष श्रीसेने यांच्या मनासारखे काही होण्याची शक्यता दिसत नाही. कारण आता त्यांनी नेमलेल्या नव्या पंतप्रधानांनी आपल्या पक्षाचाच त्याग करून नव्या राजकीय पक्षात प्रवेश घेतला आहे. त्याच नव्या पक्षाकडून आगामी निवडणुकीच्या तयारीला राजपक्षे लागलेले आहेत. वास्तविक, त्यांच्याच वडिलांनी स्वातंत्र्यानंतर ‘श्रीलंका फेडरल पार्टी’ या पक्षाची स्थापना करण्यात पुढाकार घेतलेला होता; पण त्यातच दुफळी माजल्याने राजपक्षे यांचा मागल्या निवडणुकीत अनपेक्षित पराभव झाला. त्यापूर्वी दहा वर्षे त्यांनी अतिशय खंबीरपणे व निष्ठूरपणे देशाचा कारभार हाकला होता. तेव्हाचे त्यांचे निकटवर्तीय असलेले श्रीसेनेच नंतर राजपक्षे यांना आव्हान देत उभे राहिले आणि निवडूनही आलेले होते. खरेतर तो राजपक्षे यांना जितका धक्का होता, तितकाच राजकीय अभ्यासकांनाही धक्का होता. कारण राजपक्षे यशस्वी नेता होते आणि त्यांना अन्य कुठल्या पक्षातून राजकीय आव्हानही उभे राहिलेले नव्हते; पण अखेरीस जवळच्या मित्र सहकार्यानेच त्यांना दगा दिला आणि श्रीलंकेत सत्तांतर होऊन गेले होते. आता चक्रे उलटी फिरू लागली आहेत, असे दिसते.
राजपक्षे यांची कारकीर्द त्यांच्या खंबीर कारभाराने गाजलेली होती. दीर्घकाळ तिथे तामिळी वाघांच्या दहशतवादाने घातलेले थैमान संपवण्याच्या आश्वासनावर राजपक्षे प्रचंड बहुमत घेऊन जिंकले होते. त्यांनी आपले आश्वासनही पूर्ण केले. सत्ता हाती आल्यावर त्यांनी जागतिक मताची पर्वा केली नाही. मानवाधिकार गुंडाळून ठेवले आणि चहूकडून दहशतवादाची कोंडी केली. सर्व मानवाधिकार संपुष्टात आणले आणि ठरलेल्या मुदतीत जे शरण आले नाहीत, त्या प्रत्येकाला दहशतवादी घोषित करून अक्षरश: जाफना भागातील तामिळींचे शिरकाण लष्कराकडून करून घेतले. मानवाधिकाराच्या चौकटीत हे सर्व अमानुष वाटणारे असले, तरी मानवाधिकर जपताना काही लाख लोकांचा हकनाक बळी तामिळी हिंसाचाराने घेतलेला होता. अशा पार्श्वभूमीवर राजपक्षे यांनी तो दहशतवाद निपटून काढला. त्यांना दुसर्या मुदतीतही लोकांनी निवडून दिले होते. तिसर्यांदाही तेच निवडून येतील, अशी विश्लेषकांची अपेक्षा होती; पण स्वपक्षातूनच त्यांना प्रतिस्पर्धी निर्माण झाला आणि राजकारणाला कलाटणी मिळाली. त्या पराभवाने धक्का बसलेल्या राजपक्षे यांच्या सहकारी निष्ठावंतांनी लवकरच वेगळ्या राजकीय पक्षाची चूल मांडली होती. श्रीलंका पीपल्स पार्टी हा पक्ष त्यांनीच स्थापन केला. तरी मागील तीन वर्षे राजपक्षे त्यात उघड सहभागी झालेले नव्हते. आता सगळी चक्रे उलटी फिरू लागल्यावर त्यांनी उजळमाथ्याने त्याच पक्षाचे नेतृत्व करण्याचा निर्णय घेतलेला असावा. म्हणून असेल, त्यांनी संसद बरखास्त होऊन निवडणुका जाहीर होताच श्रीसेने यांच्या मुठीतील आपल्याच मूळ पक्षाला रामराम ठोकून नव्या पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. त्याचा अर्थच आता राजपक्षे संसदेची निवडणूक नव्या झेंड्याखाली लढवणार असून, दोन वर्षांनी येऊ घातलेल्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीच्या तयारीला लागणार आहेत. श्रीसेने यांची कारकीर्द बरीच वादग्रस्त ठरलेली आहे आणि त्यातच सत्तेसाठी जुळलेली श्रीसेने व विक्रमसिंघे आघाडी मोडीत निघाल्याने राजपक्षे यांना स्वबळावर यश मिळवण्याची खात्री वाटत असावी. मात्र, हा भारतासाठी शुभशकून मानावा लागेल. कारण विद्यमान अध्यक्ष श्रीसेने अकारण चीनशी सलगी करून भारतविरोधी डावपेचातील प्यादे बनलेले होते. राजपक्षे तसे भारताचे मित्र नसले तरी शत्रूही म्हणता येणार नाहीत, इतके सौम्य आहेत. विक्रमसिंघेही भारताचे खास मित्र नव्हते. श्रीसेने व विक्रमसिंघे यांच्या तुलनेत राजपक्षे दगडापेक्षा विट मऊ असा प्रकार आहे; पण मोठा शेजारी म्हणूनच भारताला हे श्रीलंकेला जाळत सुटलेले मारुतीच्या शेपटासारखे उलटसुलट राजकारण नाजूकपणे हाताळावे लागणार आहे. त्यात ढवळाढवळ करता येत नाही आणि त्याकडे कानाडोळाही करणे परवडणारे नाही. कारण थेट नुकसान नसले तरी चीन पाकिस्तानच्या पोरकटपणाला श्रीलंकेची साथही भारताला परवडणारी नाही ना
No comments:
Post a Comment