Total Pageviews

Tuesday, 13 November 2018

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, राजमार्ग, जहाजबांधणी, नदीविकास आणि गंगा पुनरुत्थान खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांच्या डोक्यात अतिशय भन्नाट कल्पना-tarun bharat

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, राजमार्ग, जहाजबांधणी, नदीविकास आणि गंगा पुनरुत्थान खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांच्या डोक्यात अतिशय भन्नाट कल्पना येत असतात आणि त्या कल्पनांना ते मूर्त रूपही देतात, हे आधी महाराष्ट्राने अनुभवले होते, आता संपूर्ण देश अनुभवत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघात म्हणजे वाराणसीत (ज्याला आपण काशी आणि बनारस म्हणूनही ओळखतो) गंगा नदीच्या काठावर, देशातल्या पहिल्या मल्टीमोडल टर्मिनलचे उद्घाटन परवा, सोमवारी पंतप्रधानांच्याच हस्ते झाले. त्या कार्यक्रमाला नितीन गडकरी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही उपस्थित होते. नितीन गडकरी यांनी जेव्हा नद्यांमधून वाहतुकीची कल्पना सर्वप्रथम मांडली होती, तेव्हा अनेक लोक त्यावर हसले होते. भारतातल्या नद्यांमध्ये पाणीच नाही, तर जलवाहतूक कशी करणार, असे सांगत अनेकांनी गडकरींच्या या कल्पनेची हेटाळणी केली होती. पण, या हेटाळणीकडे लक्ष देत आपला इरादा सोडून देतील ते गडकरी कसले? एकदा गडकरी यांनी एखादी बाब मनात आणली, तर ते त्यास पूर्णत्व दिल्यानंतरच मोकळा श्वास घेतात, हे त्यांना जवळून ओळखणार्या सगळ्यांनाच माहीत आहे. गडकरी हे दिवास्वप्ने पाहतात, अशी टीकाही त्यांच्यावर करण्यात आली होती. पण, गडकरींनी त्याकडे कधीच लक्ष दिले नाही आणि ते देत नाहीत. ते आपल्या पद्धतीने मार्गक्रमण करीत असतात.
गंगेतून वाहतुकीच्या बाबतीतही त्यांनी निर्धार केला होता आणि त्यांचा संकल्प पूर्ण झाला आहे. पश्चिम बंगालमधील हल्दिया बंदरातून कंटेनर्स घेऊन निघालेले जहाज गंगा नदीतून प्रवास करीत वाराणसीत पोहोचले आणि आलेल्या कंटेनर्समधील पहिला कंटेनर पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत उतरवण्यात आला. एका जहाजामध्ये दीडशेपेक्षा जास्त कंटेनर्स बसतात ही बाब लक्षात घेतली, तर जलवाहतुकीचे महत्त्व आपल्या सहज लक्षात येईल. एक कंटेनर वाहून न्यायला एक ट्रक लागतो. याचाच अर्थ, एका जहाजात जेवढे कंटेनर्स बसतात, तेवढे जर रस्तेवाहतुकीच्या मार्गाने आणायचे असतील तर दीडशे ट्रक लागतील. हे ट्रक रस्त्यांवरून धावतील. त्यासाठी मोठ्या प्रमाणात इंधन लागेल. या इंधनावर मोठ्या प्रमाणात खर्च होईल. शिवाय, डिझेलच्या वापरामुळे जे प्रदूषण होईल, ते वेगळेच. या सगळ्या बाबी लक्षात घेतल्या, तर जलवाहतूक किती महत्त्वपूर्ण आणि सर्व दृष्टींनी फायद्याची आहे, हे विचारात घेतले पाहिजे. नितीन गडकरी यांच्याकडे गंगा नदी स्वच्छ करण्याची फार मोठी जबाबदारी आहे. वर्षानुवर्षे गंगेकडे झालेले दुर्लक्ष गंगेला कुठे घेऊन आले आहे, हे जेव्हा मोदी सरकारने पाहिले तेव्हाच गंगा नदी स्वच्छ झाली पाहिजे, याचा निर्धार करण्यात आला होता. त्याची जबाबदारी सुरुवातीला नितीन गडकरी यांच्याकडे नव्हती.
पण, गडकरींचा रस्तेवाहतूक क्षेत्रातील झपाटा पाहता, गंगा नदीच्या स्वच्छतेची जबाबदारी आपण गडकरींवर दिली तर निश्चितपणे गंगामय्या शुद्ध होईल, याची खात्री पंतप्रधान मोदी यांना मनातून होती आणि त्यातूनच त्यांनी गडकरींना गंगा स्वच्छतेची जबाबदारी सोपविली. गडकरींकडे या खात्याचा कार्यभार येऊन वर्ष-दीड वर्षच झाले आहे. पण, वाराणसीला गंगा नदीची जी स्थिती आधी होती, त्यात लक्षणीय सुधारणा झाल्याचे प्रत्यक्ष पाहायला मिळाले. वाराणसीत गंगा नदीचा जो किनारा आहे, तो अतिशय स्वच्छ असल्याचे आपल्याला दिसते. नदीच्या पात्रात आणि पाण्यात जी प्रचंड घाण होती, ती किमान 80 टक्के साफ करण्यात गडकरींच्या मंत्रालयाला यश आले आहे. मार्चपर्यंत गंगा नदी संपूर्ण शुद्ध करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असले आणि ते थोडे कठीण असले, तरी नितीन गडकरींच्या वज्रनिर्धारामुळे हे कठीण लक्ष्यही पार केले जाईल, असा विश्वास पंतप्रधानांनाही आहे आणि वाराणसीच्या जनतेलाही आहे. आता गंगा नदी फक्त वाराणसीतच आहे काय? नाही. ती अनेक शहरांमधून वाहते. त्यामुळे गंगा नदी स्वच्छ करताना फक्त वाराणसीचीच निवड गडकरी यांनी केलेली नसून, सर्वदूर गंगा नदीची साफसफाई सुरू आहे. उत्तरप्रदेशात गंगा नदीच्या स्वच्छतेचा मुद्दा निघताच, लोक गडकरींचे नाव अगदी सहजपणे घेतात.
सोमवारी जेव्हा मल्टीमोडल टर्मिनलच्या उद्घाटनासाठी नितीन गडकरी आणि पंतप्रधान मोदी वाराणसीमध्ये येणार होते, तेव्हा शहर या दोन्ही नेत्यांच्या स्वागतासाठी नव्या नवरीसारखे सजले होते. ठिकठिकाणी नितीन गडकरी यांच्या स्वागताचे लागलेले फलक गडकरींच्या कार्यकर्तृत्वाचीच पावती देत होते. कारण, मल्टीमोडल हबसोबतच वाराणसी शहरातील वाहतूक कोंडी फोडणारे दोन मोठे फ्लायओव्हर्सही गडकरी यांच्याकडील भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग खात्याने बांधले होते आणि त्यांच्याही लोकार्पणाचा कार्यक्रम सोमवारीच आयोजित करण्यात आला होता. यानिमित्ताने नागपूरकर आणि वैदर्भीय नितीन गडकरींची लोकप्रियता महाराष्ट्राबाहेरही किती आहे, हे अनुभवास आले. नद्यांमधून जलवाहतूक करण्याच्या गडकरींच्या प्रस्तावावर जे लोक आधी हसले होते, त्यांना गडकरींनी तोंडाने उत्तर न देता प्रत्यक्ष कृतीतून उत्तर दिले आहे! मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर अनेकदा अपेक्षित कामगिरी करायचा नाही, तेव्हा टीकाकार त्याच्यावर तुटून पडत असत. पण, नंतरच्या सामन्यात धुवाधार फलंदाजी करीत सचिन त्याच्या टीकाकारांना बॅटने उत्तर देत असे, तसे गडकरींचे झाले आहे. आपल्याला काय करायचे आहे, हे गडकरी यांना ठाऊक आहे. त्यामुळे टीकाकारांकडे लक्ष न देता ते आपल्या ध्येयाकडे वाटचाल करीत आहेत. गंगा ही अतिशय पवित्र नदी मानली जाते. घरातल्या कुणाचाही मृत्यू झाल्यास त्याच्या तोंडात गंगाजल टाकले जाते, एवढे गंगेच्या पाण्याला आपल्याकडे महत्त्व आहे.
त्यामुळे अशा महत्त्वपूर्ण आणि समस्त भारतीयांना पूजनीय असलेल्या गंगा नदीचे शुद्धीकरण करण्यास गडकरी यांनी सर्वोच्च प्राधान्य दिले नसते तरच नवल! ज्या ठिकाणी पाण्याची पातळी दोन-अडीच मीटर आहे, अशा सर्व ठिकाणांहून जहाजाद्वारे वाहतूक होऊ शकते. त्यामुळे नद्यांमध्ये ज्या ठिकाणी पाण्याची पातळी कमी आहे, तिथे खोदकाम करून पाण्याची पातळी वाढविता येऊ शकते. तंत्रज्ञानाने अफाट प्रगती केली आहे. तंत्रज्ञानातील प्रगतीचा वापर करून भारतातील शंभरावर नद्यांमधून वाहतूक झाली पाहिजे आणि त्याद्वारे वाहतुकीचा खर्च कमी होऊन ग्राहकांना स्वस्त दरात जीवनावश्यक वस्तू उपलब्ध झाल्या पाहिजेत, वायुप्रदूषण कमी झाले पाहिजे, इंधनासाठी लागणारे भारतीय चलन वाचले पाहिजे, रस्त्यांवरील वाहतुकीची कोंडी फुटली पाहिजे, यादृष्टीने कुणीतरी पुढाकार घेणे आवश्यक होते. तो पुढाकार नितीन गडकरी यांनी घेतला, याबद्दल त्यांचे समस्त भारतीयांनी अभिनंदनच केले पाहिजे! वाराणसी येथे उभारण्यात आलेल्या मल्टीमोडल टर्मिनलवर जो खर्च झाला आहे, म्हणजेच गंगेवर जो खर्च झाला आहे, तो पैसा पाण्यात जाऊ देणार नाही, हा गडकरींचा निर्धारही प्रशंसनीय आहे

No comments:

Post a Comment