Total Pageviews

Saturday, 10 November 2018

फटाके फोडल्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते-tarun bharat-mohitrao

फटाके फोडल्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते आणि नागरिकांच्या स्वास्थ्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो, त्यामुळे कमी आवाज करणारे, प्रदेषण कमी होईल असेच फटाके रात्री दोन तास म्हणजे आठ ते दहा या वेळेत फोडावेत, असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिवाळीच्या पंधरा दिवस आधी दिला. झाले, हा निर्णय येताच देशभर एकच गदारोळ सुरू झाला. स्वाभाविकही आहे. दिवाळी हा हिंदूंचा सगळ्यात मोठा सण आहे. फटाके फोडण्याची परंपराही पूर्वापार चालत आलेली आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने ऐन दिवाळीच्या पंधरा दिवस आधी दिलेल्या या निर्णयाबाबत जनमानसात नाराजी, असंतोष पसरणे गैर नव्हते. शिवाय, आजकाल कोर्टाचे अनेक निर्णय हे हिंदूंच्या सणांविरोधातच येत असल्याने फटाक्यांबाबतच्या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया उमटली नसती तरच नवल!
सणवार, उत्सव असताना फटाके फोडावेत असे कुठल्याही हिंदू धर्मग्रंथात नमूद नसले तरी फटाके फोडण्याची परंपरा फार जुनी आहे. त्यामुळे अचानक कुणी जर सांगितले की फटाके फोडूच नका, दोनच तास फोडा, अमकेच फटाके फोडा, तमके फोडू नका, तर ते स्वीकारणे थोडे अवघडच असते. शिवाय, आणखी एक प्रश्‍न उपस्थित केला जातो आणि केला जाणे गरजेचेच आहे, तो म्हणजे-प्रत्येक वेळी हिंदूंच्या सणाच्या वेळीच असे निर्णय का दिले जातात? अन्य धर्मीयांच्या बाबतीत जेव्हा निर्णय देण्याची वेळ येते तेव्हा देशात अराजकता माजू शकते, अशी भीती का दाखविली जाते? या प्रश्‍नांची समर्पक उत्तरे जोपर्यंत मिळत नाहीत, तोपर्यंत फटाके फोडण्याच्या निर्णयाला होत असलेला विरोध अनाठायी आहे, असे अजीबात म्हणता यायचे नाही.
फटाके फोडल्यानंतर जो धूर आकाशात आपल्याला दिसतो, त्या धुरामुळे श्‍वास घेण्यास त्रास होतो, अनेकांना श्‍वसनाचे आजार होतात, घरोघरी आणि रुग्णालयांमध्ये जे रुग्ण आहेत, त्यांना प्रचंड त्रास होतो, या सगळ्या बाबी मान्य केल्या तरी देशात सगळ्यांना समान न्याय का लावला जात नाही, प्रत्येक वेळी फक्त सहिष्णू असणार्‍या हिंदूंवरच का अन्याय केला जातो, या प्रश्‍नांची उत्तरेही सरकारी यंत्रणांना, न्यायालयाला द्यावीच लागतील ना? गेल्या वर्षी दिवाळीत जे फटाके फोडण्यात आले होते, त्यावेळी देशाची राजधानी दिल्लीतच नव्हे, तर देशाच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात ‘स्मॉग’ दिसत होता. त्यामुळे अनेकांना जो त्रास झाला, त्याची आठवण जरी झाली तरी अंगावर काटे येतात. शिवाय, मोठ्या आवाजांच्या फटाक्यांनी कानठळ्या बसतात, ज्येष्ठांच्या छातीत धडधडायला होतं, पाळीव प्राणी घाबरतात, पक्ष्यांची त्रेधातिरपीट उडते. एकीकडे मोठा आवाज आणि दुसरीकडे प्रचंड धूर हा फटाक्यांमुळेच होत असल्याने फटाके कोणत्या प्रकारचे फोडावेत, हे कोर्टाने सांगण्यापेक्षा आपणच सगळ्यांनी त्याबाबतची आचारसंहिता स्वत:साठी लागू करून घेतली पाहिजे. पुन्हा प्रश्‍न येतो तो म्हणजे-आचारसंहिता संपूर्ण देशवासीयांनी लागू करवून घ्यावी की फक्त हिंदूंनी? तसे पाहिले तर अशी आचारसंहिता संपूर्ण देशवासीयांनी लागू करवून घेतली पाहिजे. भोंग्यांवरून होणारा आवाज होत असेल, फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण असेल, डीजेमुळे होणारे ध्वनी प्रदूषण असेल, या सगळ्या बाबतीत सर्व धर्मीयांनी गांभीर्याने विचार करून मानवतेच्या दृष्टीने काय हितावह आहे, ते कृतीत आणण्याची गरज आहे.
धुके आणि धूर जेव्हा एकत्र मिसळतात तेव्हा स्मॉग तयार होतो आणि या स्मॉगमुळे नागरिकांना श्‍वास घेणे कठीण होते. हे जे मिश्रण असते ना, त्यात विषारी कण असतात आणि तेच मनुष्याच्या आरोग्यासाठी घातक ठरतात. आकाशात स्मॉग असताना जेव्हा आपण श्‍वास घेतो, त्यावेळी हे विषारी कण श्‍वासावाटे फुफ्फुसात पोहोचतात. यामुळे मनुष्याला कॅन्सर, र्‍हदयरोग आणि श्‍वसनाचे आजार होऊ शकतात. गेल्या वर्षी देशातल्या तीन मुलांच्या वतीने त्यांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात धाव घेऊन फटाक्यांवर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी केली होती. कारण, त्या तीनही मुलांना श्‍वसनाचे गंभीर आजार होते. परंतु, तेव्हा जनभावना लक्षात घेत सुप्रीम कोर्टाने बंदी घालण्यास नकार दिला होता. मात्र, दिल्ली आणि आसपासच्या परिसरात आकाशात निर्माण झालेल्या स्मॉगमुळे जी गंभीर परिस्थिती ओढवली होती, ती लक्षात घेत कोर्टाने दिल्ली आणि परिसरात फटाके फोडण्यावर बंधने घातली होती, जी तिथल्या जनतेच्या हिताचीच होती. परंतु, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा काहीही परिणाम दिसून आलेला नव्हता. दिवाळीत लोकांनी दणक्यात फटाके फोडले होते. पण एक परिणाम जरूर दिसला व तो म्हणजे प्रदूषणाची मात्रा थोडी कमी झाली होती. असे असले तरी दिल्ली व आसपासचा परिसर प्रदूषणाच्या खतरनाक विळख्यातून मुक्त झालेला नव्हता आणि नाही.
दिवाळीत जेव्हा फटाके फुटतात, तेव्हा आकाशात मोठ्या प्रमाणात धूर जमा होतो. शिवाय, दिल्लीच्या आसपास असलेल्या हरयाणा आणि पंजाबमध्ये गहू आणि धान उत्पादन झाल्यानंतर त्याची जी ‘पराली’ असते, ती जाळली जात असल्याने तिकडून मोठ्या प्रमाणात धूर दिल्लीकडे येतो, तो दिल्लीतल्या फटाक्यांच्या धुरात मिसळतो, त्याचप्रमाणे दिल्ली आणि परिसरात असंख्य ठिकाणी बांधकामे सुरू असतात, त्या बांधकामाच्या ठिकाणी जी धूळ उडते तीही यात समाविष्ट होते आणि त्याच्या परिणामी स्मॉग तयार होतो. हा खतरनाक स्मॉगच आपल्या आरोग्यासाठी घातक ठरतो. फटाके फोडल्यानंतर जो धूर तयार होतो, त्या सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन मोनो ऑक्साईड, शिसे, आर्सेनिक, बेंझीन, अमोनिया यासारखी कितीतरी विषारी घटक श्‍वासोच्छश्‍वासाद्वारे आपल्या फुफ्फुसात जात असतात. हे घटक आपल्या शरीरातील रक्तातही मिसळतात. त्यामुळे आपल्याला कॅन्सरसारख्या आजारालाही सामोरे जावे लागते. याचा त्रास आपल्याला जसा होतो, तसाच तो पशू पक्ष्यांनाही होतो. अनेकदा अनेक पशूपक्षी यात मृत्युमुखीही पडतात.
मुबंईत जेव्हा मोठ्या प्रमाणता पाऊस पडतो आणि धोकादायक परिस्थिती निर्माण होते, तेव्हा लोकांनी आवश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असा इशारा दिला जातो. तशीच परिस्थिती दिल्लीत फटाक्यांच्या बाबतीत होते. फटाक्यांमुळे जे प्रदूषण होते, त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होऊ शकतो, असा त्रास होऊ नये यादृष्टीने नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये, असा सल्ला यंत्रणांकडून दिला जातो, जो योग्यच म्हटला पाहिजे. आणखी एक बाब महत्त्वाची आहे. ती लक्षात घेतली पाहिजे. फटाके फोडल्यानंतर जो कचरा निर्माण होतो, त्याची विल्हेवाट कशी लावायची, हा मोठाच प्रश्‍न असतो. समजा हा कचरा जाळला तर त्यामुळे पुन्हा हवेत धूर जाईल, वायूप्रदूषण वाढेल. जर हा कचरा डम्पिंग यार्डमध्ये नेऊन टाकला तर त्यातले जे विषारी घटक आहेत, ते जमिनीत जाऊन भूजल प्रदूषित करतात. हा कचरा जर रिसायकल करायचे ठरविले तरी विषारी घटक हवेत मिसळतात. या सगळ्या समस्यांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात जनजागरण करावे लागणार आहे. सुप्रीम कोर्टाने आदेश देऊन फटाके फोडण्यावर बंदी घालण्यापेक्षा देशातील तमाम जनतेला फटाक्यांपासून होणारे आजार, निर्माण होणार्‍या समस्या समजावून सांगणे आणि त्या माध्यमातून फटाके फोडण्याची प्रमाण नियंत्रणात आणणेच योग्य ठरेल. फटाक्यांमुळे केवळ आणि दिल्ली व आसपासचा परिसरच नव्हे, तर देशभरातील किमान दोनशेपेक्षा जास्त शहरांमध्ये वायू प्रदूषण होते आणि त्याचा फटका त्या सर्व शहरांमधील नागरिकांना बसतो, एवढी बाब लक्षात घेतली तरी पुरेशी आहे.
तशीही आपल्या देशात रात्री दहानंतर फटाके फोडण्यास बंदी आहे. कायद्याने तो गुन्हा मानला गेला आहे. जी व्यक्ती रात्री दहानंतर फटाके फोडताना पकडली जाईल, त्या व्यक्तीला सहा महिनेपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. २००५ साली सुप्रीम कोर्टाने याबाबत आदेश दिला होता आणि आता तर देशात तसा कायदाच अंमलात आला आहे. असे असतानाही आपल्याकडे दिवाळीत अनेक ठिकाणी रात्रभर फटाके फोडले जातात. याला काय म्हणायचे? स्वयंशिस्त नावाचा काही प्रकारच अस्तित्वात राहिलेला नाही. विस्फोटक नियमावली १९८३ आणि विस्फोटक अधिनियम यांचे पालन व्यवस्थित होत नसल्याने खरी समस्या निर्माण झाली आहे. जिथे आपण फटाके फोडतो, त्याठिकाणी १४५ डेसिबलपेक्षा अधिक तीव्रतीचा ध्वनी निर्माण होता कामा नये, असे कायदा सांगतो, सुप्रीम कोर्टाचाही आदेश आहे. पण, आपल्याकडे फटाके फोडताना त्याचे पालन होताना दिसत नाही याचे कारण उत्पादनावरही नियंत्रण असलेले दिसत नाही. १४५ डेसिबलपेक्षा जास्त तीव्रतेचा आवाजच होणार नाही, असेच फटाके तयार केले तर सगळीच समस्या संपुष्टात येईल. बाजारात जे फटाके विकले जातात, त्यांच्या पॅकिंगवर उत्पादनाची तारीख, केमिकलच्या एक्स्पायरीची तारीख आणि किंमत अशा सगळ्या बाबी स्पष्टपणे नमूद असायला हव्यात. या बाबंचा उल्लेख नसलेले फटाके कायद्यानुसार जप्त करण्यात यावेत आण उत्पादकांवर कठोर कारवाई करावी. असे झाले तरच वायू आणि ध्वनी प्रदूषण कमी करण्यास मदत होईल. आपल्याकडे चीनमधूनही मोठ्या प्रमाणात फटाके येतात आणि त्या फटाक्यांमध्ये विषारी घटकांचे प्रमाण खूप जास्त आहे. त्यामुळे या चिनी फटाक्यांच्या आयातीवरही कडक निर्बंध लादणे गरजेचे आहे. फटाक्यांवर निर्बंध घालण्यासाठी दिवाळीची वाट न पाहता वर्षभर जनजागरण आणि आवश्यक ती कायदेशीर कारवाई करणेच परिणामकारक ठरू शकेल. प्रचार माध्यमे आणि पाठ्यपुस्तके याद्वारे आपल्याला विद्यार्थ्यांपासून तर ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांचे प्रबोधन करता येऊ शकेल

No comments:

Post a Comment