मुंबईवरील
२६/११ च्या कटू स्मृती अजूनही भारतीयांच्या मनात कायम आहेत. या हल्ल्याने आपण
भारतात सहजपणे दहशतवादी हल्ले घडवू शकतो, हेच जणू
पाकिस्ताननं दाखवून दिलं. या हल्ल्यातील एकमेव जिवंत आरोपी अजमल कसाबला फाशी
देण्यात आलं. मात्र, कसाबची वंशावळ आजही भारतात दहशतवादी हल्ले घडवण्याचे मनसुबे रचत
असणार आहे. या वंशावळीचा पुरता बंदोबस्त कसा केला जाणार, हा खरा
प्रश्न आहे.
देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणा-या मुंबईवरील २६/११च्या
दहशतवादी हल्ल्याच्या कटू स्मृती अजूनही कायम आहेत. दहशतवादी हल्ल्याची चर्चा होते
त्या त्या वेळी २६/११ची घटना डोळ्यांसमोर आल्याशिवाय राहत नाही. विशेष म्हणजे आजही
भारतासमोर दहशतवादी कारवायांचं आव्हान कायम आहे. या हल्ल्याच्या स्मृती जागवताना
दहशतवादाचे आव्हान, त्यामागील कारणं तसंच त्यावर मात करण्याच्या उपाययोजना यांची चर्चा
गरजेची ठरते. अर्थात, भारतातील दहशतवादी कारवायांसाठी पाकिस्तानकडून दिलं जाणारं
प्रोत्साहन हे उघड सत्य आहे. त्यादृष्टीने काही महत्त्वाच्या बाबींचा वेध घेणं
गरजेचं ठरेल. १६ डिसेंबर २०१४ रोजी पेशावर येथील आर्मी स्कूलमध्ये तेहरिकी तालिबान
या संघटनेच्या अतिरेक्यांनी केलेलं मृत्यूचं तांडव, त्यात जवळजवळ १५० निष्पाप बालके तसेच त्यांचे शिक्षक यांची पडलेली
आहुती, शिया आणि सुन्नी यांच्यातील हिंसक रक्तपात करणारे संघर्ष आणि
वेळोवेळीच्या दहशतवादी कारवाया यामुळे पाकिस्तान हे अतिरेकी संघटनांनी पोखरलेले
राष्ट्र म्हणून नावारूपाला आलं. त्यांनीच पोसलेला ‘अतिरेकी’ रूपी भस्मासुर त्यांच्यावरच उलटत आहे. तरीदेखील पाकिस्तानातील काही
नामवंत नेते या हिंसक घटनांना अफगाणिस्तान आणि भारत यांनाच जबाबदार समजतात.
त्यामुळे काश्मीरचं तुणतुणं वाजवून तिथं लागू असलेल्या कलम ३७०च्या विरोधातील
वातावरणाचा फायदा उठवत पाकिस्तानातील जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी पुन्हा २६/११
सारखं दुष्कृत्य करण्यास प्रवृत्त होण्याची शक्यता बळावत आहे.
पाकिस्तानात जवळजवळ ५० वर्ष ‘मिलिटरी रूल’च होता. याचं महत्त्व आणि अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी तेथील
जनतेचं त्यांच्यावर होणा-या अन्यायावरून लक्ष विचलित करण्यासाठी पाक लष्कर कोणत्या
ना कोणत्या कारणानं भारतासोबत नवनवीन कुरापती काढून संघर्ष सुरू ठेवण्याचा सतत
प्रयत्न करत होते. १९६५ आणि १९७१ मध्ये झालेल्या युद्धांमधील दारुण पराभवानंतर
भारताबरोबर प्रत्यक्ष युद्ध करणं परवडणारं नाही, याची जाणीव पाकिस्तानी लष्कर आणि तथाकथित पाकिस्तानी सरकारलाही
झाली आहे. आतापर्यंत भारताबरोबरच्या संघर्षाला आपणच जबाबदार आहोत याची जाणीव
असूनही त्या पराभवाचा सल त्यांच्यामध्ये धुमसत आहे. पाक सैनिकांच्या मनामध्ये फक्त
भारतीयांविषयी सुडाचीच भावना असल्याने ते लढण्यासाठी उद्युक्त होतात. भारताच्या
तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांना अमेरिकन आणि रशियन देशांच्या
दबावाखाली न राहता पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फीकार अली भुत्तो यांच्यावर दबाव
टाकून पाकव्याप्त काश्मीरची सोडवणूक करून घेता आली असती. पण नेहमीसारखं आपलं
राजकीय नेतृत्व दुबळं ठरलं आणि ताश्कंदमधल्या कराराचीच पुनरावृत्ती होऊन आम्ही
सैनिकांनी बंदुकीच्या जोरावर जे कमावलं ते राजकीय नेत्यांनी वाटाघाटीमध्ये गमावलं.
पाकिस्तानची निर्मितीच धर्माच्या आधारावर तसंच भारत द्वेषावर झाली
आहे. पाकिस्तान मुस्लीम राष्ट्र म्हणून निर्माण झालं असलं तरी त्यातील पंजाब, सिंध, गुजरात, वजरीस्तान, स्वात खोरे आणि बलूच यामध्ये एकात्मता नाही. आजवर त्यांच्यावर
पंजाब प्रांताची पकड राहिली आहे. तसंच त्यांच्यातील सिया आणि सुन्नी यांच्यातील
मतभेददेखील ब-याच वेळा उफाळून येतात. ब-याचदा दोन्ही पंथांच्या सणाच्या वेळी मोठा
नरसंहार होतो. त्यांच्यातील आंतरिक भेदभाव नेहमी खदखदत असतो. स्वातंत्र्य
प्राप्तीनंतर कुठल्याच पाकिस्तानी नेत्यानं शेतीविषयक आणि एखादी औद्योगिक क्रांती
घडवून आणल्याचं ऐकिवात नाही. त्यामुळे तो देश खनिज तेलामुळे समृद्ध झालेल्या
मुस्लीम देशांच्या कुबडय़ा घेऊन जगत आहे.
तेथील भ्रष्टाचार हीदेखील चिंतेची बाब आहे. बेनझीर भुत्तो पंतप्रधान असताना त्यांचे पती असिफ अली झरदारी सरकारच्या कुठल्याही योजनेमध्ये आपलं दहा टक्के कमीशन घेत. म्हणून त्यांना राजकीय क्षेत्रात ‘टेन परसेंट’ असंही नाव पडलं होतं. या सर्व अंदाधुंद परिस्थितीमुळे तिथं लोकशाही नांदत आहे, असं चित्र उभं करण्यात आलं असलं, तरी त्या देशावर लष्कर प्रमुख आणि आयएसआय यांची पकड मजबूत आहे. म्हणून कुठलाही निर्णय तेथील सरकारला सैन्याच्या परवानगीशिवाय घेता येत नाही.
तेथील भ्रष्टाचार हीदेखील चिंतेची बाब आहे. बेनझीर भुत्तो पंतप्रधान असताना त्यांचे पती असिफ अली झरदारी सरकारच्या कुठल्याही योजनेमध्ये आपलं दहा टक्के कमीशन घेत. म्हणून त्यांना राजकीय क्षेत्रात ‘टेन परसेंट’ असंही नाव पडलं होतं. या सर्व अंदाधुंद परिस्थितीमुळे तिथं लोकशाही नांदत आहे, असं चित्र उभं करण्यात आलं असलं, तरी त्या देशावर लष्कर प्रमुख आणि आयएसआय यांची पकड मजबूत आहे. म्हणून कुठलाही निर्णय तेथील सरकारला सैन्याच्या परवानगीशिवाय घेता येत नाही.
अफगाण सीमेला लागून असलेल्या बलुच आणि स्वात या प्रांतात तेथील
राजव्यवस्थेनं दुर्लक्ष केल्यानं तसंच स्थानिक संस्था तिथं असलेल्या प्रमुख
टोळय़ांच्याच असल्यानं, त्यांच्यावर जरब बसवण्याची हिंमत आणि ताकद पाकिस्तान सरकारला
झालेली नाही. यामुळे या प्रांताची कुठल्याच प्रकारे प्रगती झाली नाही. अतिशय
दुर्गम आणि मागासलेला असा टेकडय़ांचा हा भाग अल कायदा सारख्या अतिरेकी संस्थांच्या
कारवायांचे तळ उभे करण्यासाठी, ओसामा बिन लादेन सारख्या क्रूरकम्र्याला उपयोगी ठरला. तिथं असलेला
साक्षरतेचा अभाव, कमालीचे दारिद्रय़ आणि धर्मगुरूंचा त्यांच्यावर असलेला पगडा हे
अलकायदा सारख्या अतिरेकी संघटनेला योग्य ठिकाण न वाटल्यासच नवल. ९/११ च्या
अमेरिकेवर केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेत आपली डाळ शिजत नाही, याची जाणीव अल कायदाला झाली. म्हणून त्यांनी आपलं लक्ष भारताकडे
वळवलं. भारताविषयीचा द्वेष ज्वलंत ठेवण्यासाठी या देशातील मुस्लिमांचा किती छळ
होतो, याविषयीच्या भ्रामक कल्पना तेथील गरीब तसंच अशिक्षित तरुण पिढीच्या
मनावर बिंबवून भारताविरुद्ध लढणं हे देशासाठी केलेलं एक पवित्र धर्मकार्य आहे, असं पटवून देण्यासाठी पाक सरकार सतत प्रयत्नशील असतं. या अशा
प्रयत्नांमुळे गरीब जनतेचं लक्ष आपल्या समस्यांपासून दूर नेण्याचा प्रयत्न
करण्याशिवाय पाकला गत्यंतर नाही. पूर्वी इतिहास आणि भूगोल या विषयांच्या
पाठय़पुस्तकात असे संदर्भ यायचे की, भारताला तीनही बाजूंनी समुद्रकिनारा असल्यानं यामार्गे येऊन या
देशावर कोणी हल्ला करणं शक्य नाही. तसंच उत्तरेकडे हिमालय आणि पलीकडे असलेला तिबेट
आपला मित्र असल्याकारणाने उत्तरेकडूनही भारताला काही धोका नाही. खैबर खिंड
(खुष्कीचा मार्ग याच खिंडीतून जातो) दुर्गम भागात असल्याने त्या ठिकाणाहूनही
हल्ल्याची शक्यता नाही. मात्र, यात एका गोष्टीकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केलं जातं की, ज्यांनी भारतावर दीडशे वर्षे राज्य केलं, ते ब्रिटिशही समुद्रमार्गेच आले होते. तसंच भारतावर साडेतीनशे
वर्षे राज्य केलेले महम्मद तुघलक, महम्मद घुरी, बाबर, अल्लाउद्दीन खिल्जी आणि अब्दाली हे सुद्धा खुष्कीच्या मार्गानंच
आले होते. १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतरदेखील पाकने केलेलं काश्मीरमधील
आक्रमण आणि काश्मीरचा बळकावलेला एक तृतीयांश भाग याचाही आपल्याला विसर पडला असावा.
चीननंही १९५८ मध्ये आपला अक्साई चीन आणि बाराहुती पठार हे भाग बळकावले.
सरकारने सैन्याच्या तयारीकडे केलेले दुर्लक्ष तसंच दुस-या
महायुद्धातील कमकुवत आणि कालबाह्य झालेली शस्त्रसामग्री यामुळे व्हायचं तेच झालं.
म्हणून भारताला १९६२ मध्ये चीनकडून दारुण पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर मात्र
भारतीय सैन्याकडे असलेली आधुनिक साधनसामग्री आणि सैन्याची पुनर्उभारणी झाल्यामुळे
जनरल चौधरी तसंच फिल्ड मार्शल माणिक शॉ यांच्या नेतृत्वाखाली झालेली १९६५ आणि १९७१
ची पाकिस्तान बरोबरची युद्धं आपण जिंकू शकलो. १९७१ च्या लढाईनंतर भारताबरोबर आपण
प्रत्यक्ष युद्ध जिंकू शकत नाही, याची जाणीव तेथील सैन्याला झाली. तरीदेखील भारताबरोबर शत्रुत्व
कायम ठेवण्यासाठी त्यांनी कारवाया सुरूच ठेवल्या. खलिस्तानवादी तसंच काश्मीरमधील
फुटीरवादी नेते यांच्यामार्फत त्यांनी अतिरेकी कारवाया सुरूच ठेवल्या. या अतिरेकी
कारवाया वाढवत त्यांनी त्या बोडो, उल्फा आणि नक्षलवाद्यांपर्यंत पोहोचवल्या आहेत. सुरुवातीला हे
अतिरेकी सहा ते आठ जणांच्या ग्रुपने येत. पण, एवढय़ा मोठय़ा संख्येनं येणं आणि नंतर अतिरेकी कारवाया करणं कठीण जात
असल्याने पुढे ही जबाबदारी दोन ते तीन जणांवरच सोपवली जाऊ लागली.
आपल्या कमकुवत संरक्षण व्यवस्थेमुळे २६/११ ला दहा दहशतवादी
पाकिस्तानी सैनिकांच्या मदतीने एका लहान बोटीमध्ये बसून कोणत्याही अटकावाशिवाय, कोणत्याही प्रतिकाराशिवाय, समुद्रमार्गे मुंबईत आले. त्यांनी मुंबईत विविध ठिकाणी दहशतवादी
हल्ले केले. त्यात शेकडो माणसं मारली गेली. या दहशतवाद्यांमधील फक्त एक दहशतवादी
अजमल कसाब जखमी अवस्थेत पकडला गेला. चौथीपर्यंत शिक्षण झालेल्या आणि हमालाचे काम
करणा-या या दहशतवाद्याने कारागृहात शाही पाहुणचार घेतला. सणासुदीच्या आणि इतर काही
दिवशी त्यानं मटन बिर्याणी आणि मिठाईचाही आस्वाद घेतल्याची चर्चा होती. हा खटला
चार वर्ष चालला. या काळात कसाबवरील संरक्षणावर आणि त्याला खाण्यासाठी लागणा-या
बिर्याणीवर भरघोस खर्च झाला. भारतानं कसाबवर साधारणपणे ३२ कोटी रुपये खर्च
केल्याची माहिती समोर आली होती. भारतीय संसदेवर म्हणजे भारतीय लोकशाहीच्या हृदयावर
प्रत्यक्ष घाव घालणारा काश्मिरी अतिरेकी अफजल गुरू हाही ११ वर्षे भारतीय पाहुणचार
घेत होता. या सर्व गोष्टी अतिरेक्यांचं मनोधर्य वाढवू शकतात आणि पाकिस्तानही
अतिरेक्यांना ठामपणे सांगू शकतं की, भारतात दहशतवादी कारवायांमध्ये पकडला गेलात, तरी तुम्हाला विशेष शिक्षा होईलच असं नाही आणि झालीच तरी आम्ही
एखादं विमान हायजॅक करून तुमची सुटकाही करू शकतो.
भारतीय कायद्यानुसार गुन्हेगार १८ वर्षाखालील असला, तर त्याला बालगुन्हेगार म्हणून फाशीची किंवा सक्त मजुरीसारखी कठोर
शिक्षा होऊ शकत नाही. त्याला बालसुधारगृहात पाठवलं जातं. हे लक्षात घेऊन नजीकच्या
काळात पाकिस्तानकडून १८ वर्षाखालील किंवा अगदी १६ वर्षाखालील मुलांना भारतात
पाठवून त्यांच्याकडून दहशतवादी हल्ले घडवून आणले जाण्याची शक्यता नाकारता येत
नाही. एवढंच नाही, तर त्यांना कसाब आणि अफजल गुरूचं उदाहरण देऊन ‘तुम्ही दिलेलं काम झाल्यानंतर स्वत:ला इजा होऊ न देता शरणागती
पत्करा, म्हणजे निदान चार-पाच वर्षे तरी मृत्यूचं भय बाळगण्याचे कारण नाही.
तसंही तुम्ही भारतात शहीद होण्यासाठी गेले असल्याकारणाने मराल त्यावेळी शहीद
झाल्यानं तुम्हाला स्वर्गप्राप्ती होणारच’ अशी मानसिकता निर्माण केली गेली, तर मात्र भारतात मोठं संकट उभं राहू शकतं. काही वर्षापूर्वी
अतिरेकी संघटना तरुण मुलींना प्रशिक्षण देऊन भारतात अतिरेकी म्हणून पाठवण्याच्या
तयारीत होत्या. पण, त्या तरुण मुली कारवाई दरम्यान मरण पावल्या, तर त्यांच्या शरीराला परपुरुषाचा स्पर्श होईल या भीतीनं आणि
धार्मिक भावनेनं ती योजना बाजूला ठेवण्यात आली; परंतु ती पुन्हा कधी उचल खाईल, सांगता येत नाही. मध्यंतरी आय. एस. आय. नं असं जाहीर केलं होतं की, भारतात भुसुरुंग पेरल्यास, भारतीय सैनिक मारल्यास काही हजार रुपये आणि त्यांचं शिर कापून
आणल्यास पाच लाख रुपयांची बक्षिशी दिली जाईल. यातून पाकची मानसिकता लक्षात येते.
१९९३ मध्ये मुंबईत घडवण्यात आलेल्या बॉम्बस्फोट मालिकांमागील
प्रमुख सूत्रधार दाऊद इब्राहिम आणि २६/११ च्या मुंबई हल्ल्याचे सूत्रधार
पाकिस्तानात आहेत, याचे ठोस पुरावे केंद्रीय गृहमंत्र्यांनी इंटरपोलच्या आमसभेत
देऊनसुद्धा पाकिस्ताननं त्याबाबत ठोस कारवाई केली नाही. खरं तर पाकिस्तानच्या
संदर्भातील आपल्या वेळोवेळच्या राज्यकर्त्यांचं मवाळ धोरणच त्या देशाचं मनोबल
वाढवण्यासाठी कारणीभूत ठरलं आहे. आपण कितीही अरेरावी केली, उर्मटपणा दाखवला, दहशतवादी कृत्ये केली, तरी भारताचे राज्यकरते नरमाईनं घेऊन स्वत:च सलोख्याचे संबंध
प्रस्थापित करण्यास तयार होतात, याची त्यांना जाणीव आहे. विशेष म्हणजे आपले प्रवक्ते ओसामा बीन
लादेनला ‘लादेनजी’ म्हणून, तर हाफिजला ‘साहेब’ म्हणून संबोधत असतील, तर उद्या दाऊदलाही असाच शाब्दिक सन्मान दिला जाणार का, हा खरा प्रश्न आहे. शत्रूला गोळ्या घालायच्या असतात, शत्रूचे मनसुबे नष्ट करायचे असतात, शत्रूच्या बलस्थानांवर हल्ले करून त्याचं कंबरडं मोडायचं असतं, शत्रूची जास्तीत-जास्त हानी हाच आपला लाभ हे लक्षात घ्यायच असतं.
आपल्या संरक्षणापुढे, आपल्या स्वार्थापुढे शत्रूचा स्वार्थ, शत्रूचे हीत याचा विचार करायचा नसतो, ही रणनीती राज्यकरते प्रत्यक्ष कृतीत आणणार नाहीत, तोपर्यंत पाकिस्तानची डोकेदुखी थांबणार नाही. त्यामुळे एका कसाबाचा
अंत झाला असला, तरी असे कसाब वेळोवेळी भारतात येतच राहणार आणि आपला त्रास वाढवत
राहणार, हे लक्षात घ्यायला हवं
No comments:
Post a Comment