Total Pageviews

Wednesday, 7 November 2018

संरक्षणसज्जतेचा ‘त्रिशूल’ (अग्रलेख) सकाळ

यंदाची दीपावली समस्त भारतीयांसाठी एक शुभ वर्तमान घेऊन आली आहे! भारतीय नौदलाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदला जाणारा हा क्षण असून, त्यामुळे अवघ्या भारतवर्षाची मान ताठ झाली आहे. एका अर्थाने धनत्रयोदशीच्या दिवशी, स्वदेशी बनावटीची पहिली आण्विक पाणबुडी ‘आयएनएस अरिहंत’च्या रूपाने भारतीयांना मोठीच भेट मिळाली आहे. ‘अरिहंत’मुळे आता जमीन, सागरी आणि आकाश अशा तिन्ही मार्गाने आण्विक मारा करण्याची क्षमता आपल्याकडे निर्माण झाली आहे. त्यामुळे ‘अण्वस्त्रांच्या जोरावर भारताला धमक्‍या देणाऱ्या देशांना आपण दिलेले हे ठोस उत्तर आहे,’ असे सार्थ प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. या निमित्ताने काही जुन्या स्मृती जागृत होणे स्वाभाविकच म्हणावे लागेल. भारताने १९७१ मध्ये बांगलादेश मुक्‍तिसंग्रामात उडी घेतली, तेव्हा भारतावर दबाव आणण्यासाठी अमेरिकेने आपले ‘सातवे आरमार’ बंगालच्या उपसागरात आणले होते. त्या वेळी अर्थातच भारतीय नौदलाकडे अशी अणुसज्जता नव्हती. तरीही इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत त्या दबावाला बळी पडला नव्हता. त्यानंतरच्या पाच-साडेपाच दशकांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. सत्तरच्या त्याच दशकात भारताने पोखरणमध्ये यशस्वी अणुचाचणी करून, आपल्या सामर्थ्याचे दर्शन घडविले. पुढे नव्वदच्या दशकांत पुनश्‍च एकवार अणुचाचणी करून भारत आता मागे नाही, याची प्रचिती तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी जगाला आणून दिली. तेव्हापासून भारत संरक्षणसज्जता वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे आणि आता ‘अरिहंत’ या आण्विक पाणबुडीने आपली पहिली गस्त यशस्वीरीत्या पुरी केल्यामुळे भारत हा आण्विक पाणबुडी बनविणारा अमेरिका, रशिया, चीन अशा काही देशांनंतरचा सहावा देश ठरला आहे.
खरे तर अशा प्रकारच्या आण्विक पाणबुडीच्या निर्मितीस १९७० मध्ये मंजुरी दिली गेली होती. त्यानंतर या पाणबुडीच्या निर्मितीची योजना तपशीलवारपणे आखली गेली. मात्र, अनेक कारणांनी ती प्रत्यक्षात उतरू शकली नाही. पुढे २००९ मध्ये तत्कालिन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या उपस्थितीत ‘अरिहंत’ नौदलामध्ये दाखल झाली. ‘न्यूक्‍लिअर कमांड ॲथॉरिटी’च्या अखत्यारीत असलेल्या या पाणबुडीची अनेक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये आहेत. मुळात ‘अरिहंत’ या शब्दाचा अर्थच शत्रूचा विनाश करणारा, असा आहे. मात्र, ‘भारताची अण्वस्त्रक्षमता ही कोणत्याही देशावर आक्रमण करण्यासाठी नाही,’ असे पंतप्रधानांनी या पाणबुडीवरील कर्मचारी व अधिकाऱ्यांचा सत्कार करताना स्पष्ट केले आहे. यापूर्वी भारताकडे भूपृष्ठावरून म्हणजे जमिनीवरून अण्वस्त्रे डागणारी ‘अग्नी-पाच’ क्षेपणास्त्रे उपलब्ध होती. आता या पाणबुडीमुळे जलपृष्ठावरून म्हणजेच सागरातून अण्वस्त्रे डागण्याची क्षमता आपण संपादन केली आहे. त्यामुळे अण्वस्त्रांचा धाक दाखवून भारताला ‘ब्लॅकमेल’ करू पाहणाऱ्या देशांना एका अर्थाने दिलेला हा स्पष्ट संदेशच आहे. ‘अरिहंत’मुळे कोणत्याही प्रकारच्या संघर्षात प्रतिस्पर्धी आक्रमकाला जशास तसे उत्तर देण्याच्या भारताच्या क्षमतेत मोठीच वाढ झाली आहे. गेली काही दशके भारतीय नौदल अशा प्रकारची पाणबुडी आपल्या ताफ्यात कधी दाखल होते, याची वाट बघत होते. आता ते काम पूर्ण झाल्यामुळे समस्त नौदल सैनिकांनी ‘शं नो वरुण:’ या आपल्या ब्रीदवाक्‍याचा गजर केला असणार, यात शंकाच नाही.
‘अरिहंत’ पाणबुडीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ती पाण्याखाली असताना सहजासहजी कोणत्याही यंत्रणेच्या माध्यमातून ‘डिटेक्‍ट’ होऊ शकत नाही! शिवाय, अणुभट्टीच्या माध्यमातून मिळणाऱ्या ऊर्जेवर ती चालत असल्यामुळे ‘अरिहंत’ प्रदीर्घ काळ पाण्याखाली राहू शकते. या पाणबुडीवर ७५० ते ३५०० किलोमीटर इतक्‍या प्रदीर्घ अंतरापर्यंत डागता येणारी शस्त्रास्त्रे आहेत. त्यापेक्षा जास्त म्हणजे पाच हजार किलोमीटरपर्यंत अण्वस्त्रे डागता येणाऱ्या अशा प्रकारच्या पाणबुड्या फक्‍त अमेरिका, रशिया आणि चीन यांच्याकडेच आहेत, हे लक्षात घेतले की या पाणबुडीच्या निर्मितीनंतरही भारताला पुढे बरीच प्रगती करावयाची आहे, हे लक्षात येते.
अर्थात, जागतिक स्तरावर रोजच्या रोज आधुनिक शस्त्रांस्त्रांच्या निर्मितीत होत असलेली वेगवान प्रगती लक्षात घेतली, तरीही भारताच्या वाटचालीतील हा एक गौरवशाली क्षण आहे. अशा प्रकारच्या आण्विक पाणबुडीच्या निर्मितीने भारताने एक मोठी झेप घेतली आहे. आपल्या शेजाऱ्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे संरक्षणधोरणात अशा प्रकारच्या सामर्थ्यसंपादनाला अलीकडील काळात अधिक महत्त्व आले आहे. देशाच्या सीमा सुरक्षित राहण्यासाठी आणि शांतता नांदण्यासाठी सदैव संरक्षणसज्ज असणे गरजेचे आहे आणि ‘अरिहंत’ हे त्या दिशेने टाकलेले दमदार पाऊल आहे, हे निःसंशय.

No comments:

Post a Comment