Total Pageviews

Thursday, 1 November 2018

पोसलेला नरभक्षक By shankar.pawar-pudhari

पूर्वमध्य भारतामध्ये बोकाळलेल्या नक्षली माओवादी हिंसाचाराने आजवर अनेक बळी घेतलेले आहेत. पण, तिथे प्रथमच एका पत्रकाराचा बळी पडला आहे. दांतेवाडा या छत्तीसगडच्या भागात नक्षली प्रभाव मोठा असून, तिथल्या निलावया गावानजीक हा हल्ला झाला. छत्तीसगड राज्यात विधानसभेचे मतदान या महिन्यात व्हायचे असून, नक्षलप्रभावी  मतदारसंघात पहिली फेरी पार पडेल आणि दुसर्‍या फेरीत उर्वरित  जागांचे मतदान व्हायचे आहे. तिथल्या अनेक गावांत मतदानावर बहिष्कार घालण्याचे आदेश नक्षली संघटनांनी दिलेले आहेत. त्याच भागातला बंदोबस्त दाखवण्यासाठी व चित्रित करण्यासाठी दूरदर्शनच्या काही पत्रकारांना सुरक्षा दलाच्या तुकडीसोबत पाठवण्यात आलेले होते. त्यांचा ताफा चालला असताना या गावानजीक अकस्मात त्यांच्यावर चहूकडून गोळीबार सुरू झाला आणि अधिक सैनिकांची मदत येण्यापूर्वी अनेक जण जखमी होऊन गेले. दोघा पोलिस अधिकार्‍यांचा जीव गेलाच; पण त्यात दूरदर्शनचे हे पत्रकार कॅमेरामन जखमी झाले. त्या जखमी अवस्थेतही कॅमेरामन अच्युतानंद साहू यांनी आपला कॅमेरा चालू ठेवला होता. आपण जगणार नाही, असे वाटल्यावर त्यांनी जन्मदातीला एक संदेश चित्रित करून ठेवला. त्यांच्या सहकार्‍यांनी हल्ला संपल्यावर तपासला असता तो संदेश उपलब्ध झाला; मात्र तोपर्यंत साहू यांचे निधन झालेले होते. त्यांच्या जखमा प्राणघातक ठरल्या आणि तोच त्यांचा आपल्या जीवलगांशी अखेरचा संवाद ठरला. त्याचे चित्रण सोशल माध्यमातून व्हायरल झाले आहे. त्यात साहू आपल्या आईला स्पष्ट सांगतात, कदाचित यातून आपण जगणार नाही. आपल्याला मृत्यूची भीती नाही; पण आई माझे तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे. काळजाला हात घालणारे हे चित्रण कुठल्याही सुबुद्ध माणसाला हेलावून टाकणारे आहे. नक्षली हिंसा किंवा माओवाद हा विचार मानणार्‍यांसाठी डोळ्यांत अंजन घालणारा आहे. कारण, हा पत्रकार सशस्त्र पोलिस वा सैनिक नव्हता आणि तिथल्या गावकर्‍यांच्या व्यथा चित्रित करण्यासाठी तिथे गेलेला होता. त्याने नक्षली वा गावकरी यापैकी कोणावरही हल्ला केला नव्हता. अगदी सैनिकांच्या ताफ्यानेही तिथे कोणावर हल्ला केलेला नव्हता. सैनिकी कारवाईतही कुणा नि:शस्त्रावर हल्ला होत नाही. समोरून हल्ला झाल्यास उत्तर दिले जाते आणि चकमकी सुरू होतात, हे सत्य डोळसपणे स्वीकारण्याची वेळ आता आलेली आहे. राजकीय विश्‍लेषकांपासून न्यायालयांपर्यंत प्रत्येकाने हे सत्य स्वीकारले नाही, तर असे हल्ले नागरी जीवनात धुमाकूळ घालू लागणार आहेत; मात्र दुर्दैव असे, की त्याचेही मतलबी राजकारण झाले आहे. पत्रकारी जगातली शांतता अधिक विचलित करणारी आहे. गौरी लंकेशच्या हत्येनंतर उठलेल्या गदारोळापेक्षा अच्युतानंद साहूच्या हत्येनंतरची शांतता अधिक भयावह आहे.
अर्थात, छत्तीसगडच्या नक्षलवादी उचापतींना दीर्घ काळ राजकीय व बौद्धिक पाठराखण मिळालेली आहे. मागल्याच निवडणुकांच्या कालखंडात असाच भयंकर घातपाती हल्ला तिथे झालेला होता. काँग्रेसचे दिग्गज नेते प्रचाराची यात्रा घेऊन निघालेले असताना त्यांच्यावर इतका भीषण हल्ला झाला, की पक्षाचे छत्तीसगडमधील जवळपास सर्व नेते मारले गेले. नाव घेण्यासारखा कोणी नेता त्या राज्यात पक्षाकडे उरलेला नाही. इतके असूनही, आज नक्षली व माओवादी विषयात काँग्रेसने राजकारण खेळावे, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. या निमित्ताने विविध राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत राहिले, तर ते हिंसा माजवणार्‍यांच्याच पथ्यावर पडते, इतके तरी भान राखले गेले पाहिजे. नक्षली मारेकरी भाजप वा काँग्रेस असा भेदभाव करीत नाहीत. जो लोकशाही व संसदीय प्रणालीचे समर्थन करतो, त्याला शत्रू मानून हल्ले होत असतात. तेवढेच नाही, जो कोणी कायदा, व्यवस्था व सरकारी प्रशासनाशी सहकार्य करील, त्यालाही ठार मारले जात असते. गरीब, वंचित आदिवासी लोकांपर्यंत सरकारी कल्याण योजना पोहोचू नयेत आणि त्यांनी भुकेकंगाल होऊन राहावे; म्हणजे त्यांना हिंसाचारात ओढून घेणे सोपे जाते, ही योजना आहे. म्हणून, सरकारी योजना मोडून टाकायच्या आणि किरकोळ काही स्वयंसेवी संस्थांमार्फत सेवा उपलब्ध करून द्यायच्या, असा दुहेरी डाव खेळला जातो. त्यात क्रांतीची बिजे शोधणार्‍या स्वप्निल शहरी शहाण्यांचे समर्थन हिंसेला मिळाले आहे आणि परदेशी निधीच्या बळावर भारताला खिळखिळे करण्याचे कारस्थान राबवले जात असते. कालपरवाच त्यातले धागेदोरे अ‍ॅम्नेस्टी संस्थेच्या छाप्यात समोर आलेले आहे. यातला मोठा डाव ओळखून सर्व राजकीय पक्ष व प्रशासन संस्थांनी खांद्याला खांदा लावून त्याचा सामना करायला हवा आहे; अन्यथा एकेकाला खिळखिळे केल्यावर देशात नक्षली अराजक पसरायला वेळ लागणार नाही. किंबहुना, जंगलातल्या नक्षलवादाचा चोख बंदोबस्त होऊ लागल्यानेच आता त्यांच्या हस्तकांनी शहरी नक्षलवादाची कास धरली आहे. त्यासाठी बुद्धिवादी संस्था व संघटनांमध्ये त्यांनी शिरकाव करून घेतला आहे. साहूचा बळी अशा लोकांनी घेतला आहे. आज त्यात साहू बळी पडला आहे. ही प्रवृत्ती शिरजोर झाली, तर शहरी भागातही पत्रकारिता अशक्य होऊन जाईल. वेगळे मत मांडण्याची मुभा संपलेली असेल व न्याय मागायलाही नक्षली जनता कोर्टात उभे राहावे लागेल. जिथे आरोपकर्ता, न्यायाधीश नक्षलीच असतात. साहूचे बलिदान व आवाहन आईसाठी असले, तरी प्रत्यक्षात भारतीय पत्रकारिता व माध्यमांना दिलेला हा गंभीर इशाराच आहे. तो मरणाला घाबरलेला नाही, तर येऊ घातलेल्या मोठ्या संकटाला हिंसेच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेचा धोका दाखवतो आहे. आपण त्याकडे डोळसपणे बघणार आहोत की नाही? स्वातंत्र्याच्या अतिरेकातून पोसला जाणारा हा नरभक्षक, अन्यथा आपलाच बळी घेतल्याशिवाय राहणार नाही.

No comments:

Post a Comment