Total Pageviews

Tuesday, 6 November 2018

चिनी हत्तीचे दात-By arun.patil-PUDHARI



हत्तीचे दात दाखवायचे वेगळे आणि खाण्याचे वेगळे, असे म्हणतात. पाकिस्तान हा भारताचाच एक जुना भाग असल्याने तिथेही हिंदीतली ही उक्‍ती प्रचलित आहे; पण आपला पूर्वीचा हिंदुस्तानी इतिहास पुसून टाकायला उतावीळ झालेल्या पाकिस्तानी राजकारण्यांना तीच उक्‍ती शेवटी चिनी हत्तीकडून शिकावी लागली आहे. पाकिस्तान आता पुरता दिवाळखोरीत गेलेला असून, त्याचा राजकीय उपयोग संपल्यानेच अमेरिकेने त्याला कधीपासून भीक घालणे थांबवलेले आहे. अरबी देश व सौदी अरेबियाकडे गयावया करून रोजची चूल पेटवावी, अशी पाकिस्तानची दुरवस्था झालेली आहे. भारताचा द्वेष करताना आणि जिहादी उचापती चालविताना, देशाचा कारभार व आर्थिक घडी पूर्ण विस्कटून गेलेली आहे. मग तिला ठिगळे लावण्यासाठी चिनी सापळ्यात पाकिस्तान पुरा अडकला आहे.
चिनी कर्ज व आर्थिक मदत म्हणजे सावकारी पाश होय, हे समजायला खूप उशीर होऊन गेला आहे. परिणामी, आज दिवाळखोर झालेल्या पाकिस्तानला जगाच्या विविध आर्थिक संस्थांच्या दारात वाडगा घेऊन उभे राहणे इतकाच पर्याय उरला आहे; पण सुंभ जळले, तरी पीळ जात नाही, तशी पाकच्या धार्मिक व राजकीय नेत्यांची मस्ती आहे. म्हणूनच, त्यांनी आपला जीवाभावाचा मित्र चीन आपल्याला कुठल्याही गाळातून बाहेर काढणार, अशी शेखी मिरवलेली होती; पण चिनी राजधानीत पोहोचलेल्या पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांना तिथे जो अनुभव आला, त्यातून आपण काय लायकीचे आहोत, त्याची यातनामय जाणीव झालेली आहे. कारण, हाती वाडगा घेऊन पोहोचलेल्या इम्रान खान यांना रिकाम्या हातांनी माघारी पाठवण्याची चतुराई चीनने दाखवलेली आहे.
खान यांनी शब्दाची कितीही कसरत केलेली असो, एका मोठ्या पाक वर्तमानपत्राने आपल्या पंतप्रधानाच्या या चीनवारीचे धिंडवडे काढलेले आहेत. सहा अब्ज डॉलर्सची मदत घेऊन इम्रान मायदेशी परत येतील, अशी हवा करण्यात आलेली होती; पण चीनने त्यांना रीत्या हाताने परत धाडलेले आहे. सहा अब्ज सोडा, सहा कोटी डॉलर्सही वाडग्यात पडलेले नाहीत. कारण, अशा बांडगुळांना पोसण्यासाठी सध्या चीनपाशीही खुळखुळणारा पैसा राहिलेला नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी उत्पादनांवर निर्बंध वा कर लादून जी कोंडी केली आहे, त्यामुळे चिनी अर्थव्यवस्थेला दणका बसला आहे. त्याला पाकिस्तानचे लाड करण्यासाठी काही कोटी डॉलर्सची रक्‍कम बाजूला काढणे शक्य नसेल, तर सहा अब्ज डॉलर्सची गोष्टच सोडून द्या. ती शक्यता या इम्रान यांच्या चीन भेटीच्या पार्श्‍वभूमीवर चिनी अभ्यासकांनी आधीच व्यक्‍त केली होती; पण तरीही पाक अभ्यासक, पत्रकार व संपादक फुकाच्या गमजा करीत होते. आता त्यांचेही डोळे उघडले असतील. कारण, नवी मदत वा अर्थसाह्य सोडून द्या, आधीपासून चीन-पाकिस्तान महामार्गाचा जो प्रकल्प अर्धवट पडला आहे, त्याच्या कर्जाच्या अटीही नव्याने ठरवायचा मुद्दा चिनी नेत्यांनी गुंडाळून ठेवला आहे.
  महाशक्‍ती होण्याच्या घाईत 
चीनने उत्पादन क्षमतेच्या आधारे जी कमाई केली व अर्थव्यवस्था उभारली, तिच्यात स्वयंभूता नव्हती. युरोप वा अमेरिकेने चिनी उत्पादित माल खरेदी करण्यावरच चिनी कारखाने व अर्थव्यवस्थांचे अस्तित्व पूर्णपणे अवलंबून आहे. असा पैसा कितीही साठलेला असला वा वाटला, तरी पैशाची खाण नसते. म्हणूनच, जी गंगाजळी जमलेली होती, तिची सावध गुंतवणूक करून आपला आर्थिक पाया विस्तारण्याला चीनने प्राधान्य देणे भाग होते; पण त्या अब्जावधी डॉलर्सला आपली शक्‍ती वा संपन्‍नता समजून चीन महाशक्‍ती होण्याचे स्वप्न बघू लागला आणि त्याने दक्षिण आशियातील अनेक लहान-मोठ्या देशांना सोपी कर्जे, आर्थिक मदत देत विकासाच्या संयुक्‍त योजनांमध्ये स्वत:ला गुंतवून घेतले.
भारताला चहूकडून वेढण्यासाठी इतका पैसा गुंतून पडला आहे, की तो अनुत्पादक खर्चाचा पांढरा हत्ती होऊन गेलेला आहे. त्यातच आता अमेरिकेत कारखाने व रोजगाराला पुन्हा चालना देण्यासाठी ट्रम्प यांनी नवे निर्बंध लावल्याने स्वस्त चिनी उत्पादित मालाला वेसण घातली गेली आहे आणि त्याचे चटके चिनी अर्थकारणाला बसू लागले आहेत; पण त्याचेच परिणाम पाकिस्तान व श्रीलंका अशा चिनी गुंतवणूक घेतलेल्या देशांनाही भेडसावू लागलेले आहेत.  त्यामुळेच आता जगभर फिरून भिक्षांदेहीकरण्याची वेळ आलेली आहे; मात्र त्यांना कर्जबाजारी स्थितीतून बाहेर काढायला कुठलीही अर्थसंस्था तयार नाही. कारण, जे नवे कर्ज द्यायचे, ते वसूल होण्यासारखी पाकिस्तानची स्थिती नाही आणि नाणेनिधी वा जागतिक बँक अशा दिवाळखोर देशांना जाचक अटी घालूनच मदत देत असतात.
तिथे कुठले राजकीय निकष नसतात, तर वसुलीची शाश्‍वती द्यावी लागत असते. चीनने हात आखडून घेतल्याने पाकला आता भिकेची झोळी अशाच संस्थांपुढे पसरावी लागणार आहे. मग सत्तापदाचे काटे इम्रानला टोचून रक्‍तबंबाळ होण्याची पाळी येणार आहे; पण भारतासाठी वा दक्षिण आशियासाठी हा शुभ संकेत आहे. कारण, पाकिस्तान आधीच अस्थिर असून, तो अधिकच चीनच्या सावकारी पाशात अडकण्यापेक्षा कुठल्याही अर्थसंस्थेचा कर्जदार असणे अधिक सुरक्षित आहे. पर्यायाने त्याला जिहादी घातपाती हिंसक उचापतीतून बाहेर पडावे लागेल. कारण, हळूहळू नित्य जीवन आवाक्याबाहेर जाऊ लागेल आणि धर्माच्या खोट्या अभिमानातून मुक्‍त झालेली पाकिस्तानी जनता, तिथल्या लष्कर व जिहादींनाही आव्हान देऊ लागेल. सौम्य प्रमाणातले हे यादवी युद्धच असेल; पण ते पाकिस्तानला लष्कर व जिहादी यांच्या पाशातून मुक्‍त करण्याला हातभार लावणारे ठरू शकेल.


No comments:

Post a Comment