Total Pageviews

Friday, 23 November 2018

शेतकर्यांची हलाखीची स्थिती, कर्जबाजारीपणा, त्यांच्या आत्महत्या, दुष्काळाची वारंवार उद्भवणारी स्थिती, सतत खोल जात असलेली जमिनीतील पाण्याची पातळी-नितीन गडकरी-अॅग्रोव्हिजनचे दहावे वर्ष

शेतकर्यांची हलाखीची स्थिती, कर्जबाजारीपणा, त्यांच्या आत्महत्या, दुष्काळाची वारंवार उद्भवणारी स्थिती, सतत खोल जात असलेली जमिनीतील पाण्याची पातळी, ग्रामीण भागातून शहरी भागात होत असलेले प्रचंड स्थलांतर अशा ग्रामीण भागाशी निगडित अनेक समस्या, अनेकांना हव्याहव्याशा वाटत असतात. त्यात त्यांचे राजकारण असते. अनेकांचे त्यावर पोट असते. अनेकांना यात नानाविध पुरस्कारांची आशा दिसते. त्यामुळे शेती व शेतीशी संबंधित प्रश्न कधीही सुटू नयेत, ते सनातन राहावेत, अशी व्यवस्था करण्यात ही मंडळी व्यग्र असतात. परंतु, या दुष्टचक्राला भेदणारा एक वैदर्भीय गडी निघालाच. तो म्हणजे नितीन गडकरी! या व्यक्तीने मात्र, शेतकर्यांच्या समस्या मुळातून सुटल्या पाहिजेत, यासाठी रक्ताचे पाणी केले. दहा वर्षांपूर्वी गडकरी केवळ आमदार होते तेव्हा त्यांच्या डोक्यात, शेतकर्यांना अत्याधुनिक कृषितंत्राची व मंत्राची माहिती व्हावी म्हणून एक वार्षिक उत्सव घेतला पाहिजे, अशी कल्पना आली. तेव्हापासून सुरू झालेले अॅग्रोव्हिजन (कार्यशाळा, राष्ट्रीय कृषी प्रदर्शन व परिसंवाद). या वर्षी अॅग्रोव्हिजनचे दहावे वर्ष आहे.
 
 
ते 23 ते 26 नोव्हेंबरपर्यंत नागपुरात चालणार आहे. केवळ शेतकरीच नाही, तर सर्वसामान्य नागरिकांनीही अॅग्रोव्हिजनला भेट द्यायला हवी, इतके ते व्यापक आणि बहुस्पर्शी आहे. गेल्या वर्षी या प्रदर्शनाला पाच लाख लोकांनी भेट दिली, यावरून या प्रदर्शनाची लोकप्रियता आणि उपयुक्तता लक्षात यावी. शेतकरी असलेल्या गडकरींनी कृषिक्षेत्रातील समस्यांचा फार बारकाईने अभ्यास केला, चिंतन केले आहे. यातून जे निष्कर्ष निघालेत, ते त्यांनी अनेकवेळा जाहीर सांगितले आहेत. शेतमालाला उत्पादनखर्चावर आधारित भाव, मोफत वीज, खत-बियाणांवर सब्सिडी इत्यादी वरवरच्या उपायांच्या पलीकडे त्यांचे चिंतन आणि मनन आहे. देशातील 60 टक्के लोकसंख्या शेतीवर निर्भर आहे. ती 40 टक्क्यांच्या कमी होत नाही, तोपर्यंत शेतकर्यांची स्थिती दयनीयच राहणार, असे ते म्हणत.
 
 
प्रत्येक पिढीत शेतीचे तुकडे पडत जातात आणि नंतर इतकी कमी शेती शिल्लक राहते की, त्यावर कुटुंबाची गुजराण होणे अशक्य होते. त्यासाठी शेतीवर अवलंबून असणार्यांची संख्या कमी करणे आणि आहे त्या शेतीतून अधिकाधिक उत्पन्न व शेतीला पूरक व्यवसायांची जोड, हाच मार्ग आहे. हा विचार सांगून ते स्वस्थ बसले नाहीत. समविचारी लोकांना सोबत घेऊन त्यांनी शेतकर्यांचे प्रशिक्षण, त्यांचे मनपरिवर्तन करण्याचा विडा उचलला. असे अनेक प्रयोग त्यांनी केलेत, आजही करत आहेत. परंतु, या सर्वांचे एक दृश्य रूप म्हणजे हे अॅग्रोव्हिजन आहे. शेती हा व्यवसाय नाही, ती जीवननिष्ठा आहे. ही निष्ठा काळानुरूप बदलली पाहिजे. तिने आधुनिक तंत्रज्ञानाला, विज्ञानाला सोबत घेतले पाहिजे. हे परिवर्तन करणे तसे कठीण आहे. ‘ठेविले अनंते तैसेचि राहावे’ ही वृत्ती बदलविण्याचे गडकरी यांनी ठरविले आणि आज दहा वर्षांनंतर त्याची मधुर फळे आपणांस दिसत आहेत.
 
 
शेतकर्याला पुरेशा दाबाने 24 तास वीज, सिंचनाची सुलभ सोय आणि बारमाही रस्ते दिले की, तो आपली प्रगती स्वत:च करील, हा विचार आता मागे पडला आहे. जगात इतका बदल आणि तोही इतक्या वेगाने होत आहे की, शेतकर्याला या तीन गोष्टी देऊनही त्याच्या समस्या संपल्या नसत्या. शेतमालाला उत्पादनखर्चावर आधारित भाव देण्यासाठी शेतमालाचे समर्थनमूल्य वाढविणे, एवढाच एक मार्ग नसतो. शेतमालाचे भाव वाढविले की तिकडे ग्राहक ओरडतो. त्यामुळे शेतकर्यांचा उत्पादनखर्च कमी कसा होईल, तसेच त्याला पूरक उद्योगांची जोड देऊन त्याच्या खिशात पैसा सतत खेळता ठेवणे, यासाठी काय काय आणि कसे प्रयत्न करावे लागतील इत्यादींचा सविस्तर ऊहापोह, चर्चा, मार्गदर्शन या अॅग्रोव्हिजनमध्ये होत असते. शेतकरी ऐकीव माहितीपेक्षा डोळ्यांनी प्रत्यक्ष बघण्यावर अधिक विश्वास ठेवतो. त्या दृष्टीने या प्रदर्शनात शेतीमधील अत्याधुनिक तंत्र, मंत्र, प्रात्यक्षिके यांची मांडणी असते. शेतकर्यांना हे सर्व दाखविण्यात येते. सोबतच शेतीसंबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शनही उपलब्ध असते. हा सर्व अनुभव घेऊन शेतकर्याने गावी जावे आणि कास्तकारीतील स्वानुभव व हे ज्ञान यांची वास्तवपूर्ण सांगड घालून, आपल्या कास्तकारीला योग्य ती दिशा द्यावी, अशी अपेक्षा असते.
 
 
आतापर्यंत शेतकर्यांसाठी कमी योजना नाहीत आल्यात! शेतकर्यांना संकरित गायी पाळण्यास सांगितले, बकर्यांचे वाटप केले, नीलगिरी, साग, सुबाभूळ वगैरे लावण्यास सांगितले. पडीत जागेवर फळबाग उभी करण्यास सांगितले. या योजनांवर सरकारने अमाप पैसाही खर्च केला. पण, फलनिष्पत्ती अत्यंत निराशाजनक राहिली. शेतकर्यांसमोर जोपर्यंत असले प्रयोग केलेल्या यशस्वी व्यक्ती उभ्या होत नाहीत, त्यांच्या तोंडून स्वानुभव मांडले जात नाहीत, तोपर्यंत शेतकरीही या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. अॅग्रोव्हिजनमध्ये नेमके हेच केले जाते. पारंपरिक शेतकरी आणि यशस्वी प्रयोगशील शेतकरी व तज्ज्ञ यांना समोरासमोर आणले जाते. अॅग्रोव्हिजनच्या या उपक्रमामुळे विदर्भातील शेतकर्यांच्या मानसिकतेत किती बदल झाला, हे ग्रामीण भागाचा सघन दौरा केला की लक्षात येईल. शेतकर्यांची तरुण पिढी या नवतंत्राचा व मंत्राचा आग्रहाने वापर करत आहे, हे दिसून येईल. हे अॅग्रोव्हिजनचे यशच म्हटले पाहिजे. कृषिक्षेत्राशी संबंधित प्रत्येक पैलूचा विचार करून, त्याबाबतचे मार्गदर्शन शेतकर्यांना मिळावे, या उद्देशाने कार्यशाळांचे विषय निवडण्यात येतात.
 
 
भारतातला शेतकरी जगातील बाजारपेठत सशक्तपणे उभा राहावा, यासाठीच ही सारी धडपड असल्याचे दिसून येते. प्रत्येक गोष्टीत नावीन्य, भव्यता, निर्दोषता आणि उत्कृष्टता इत्यादींचा ध्यास नितीन गडकरी यांना आहे. ते गुण शेतकर्यांमध्येही उतरले पाहिजे, असा त्यांचा आग्रह आहे. शेतीतून उत्पन्न होणारा प्रत्येक माल हा नावीन्यपूर्ण, निर्दोष आणि उत्कृष्ट असेल तर त्याला देशीयच नाही, तर जागतिक बाजारपेठही उपलब्ध होऊ शकते, हे शेतकर्यांवर बिंबविण्याचे काम या प्रदर्शनातून होत असते. हे प्रदर्शन वर्षातून एकदाच आणि तेही तीन-चार दिवस होत असले, तरी हा विषय गडकरींच्या मन-मस्तिष्कात 365 दिवस असतो! भारतात आणि जगभरात प्रवास होत असताना, काही नवीन तंत्र, यंत्र, शोध, प्रयोग दिसले की, याचा माझ्या शेतकर्यांना काय उपयोग होऊ शकतो, याचाच विचार त्यांच्या मनात असतो. त्यामुळे अॅग्रोव्हिजनमध्ये नवीननवीन विषय, नवीननवीन प्रयोग, नवनवीन तज्ज्ञ यांचा सातत्याने समावेश होत गेला. इतरत्र आयोजित होणार्या कृषिप्रदर्शनासारखे हे प्रदर्शन एकसुरी व रटाळ झाले नाही, याचे श्रेय गडकरी यांनाच आहे. गडकरी यांच्या या धडपडीचे कौतुक करीत असतानाच, त्यांची कल्पना साकार करणार्या अॅग्रोव्हिजन चमूचेही सर्वांनी अभिनंदन केले पाहिजे अन् तेही या प्रदर्शनाला भेट देऊनच!

No comments:

Post a Comment