भारत हा गरीब लोकांचा देश आहे. त्यात स्वच्छतेच्या बाबतीत कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्याने आघाडी घेतली असली तरी देशाच्या स्वच्छतेबरोबर मनाची स्वच्छता होणे आवश्यक आहे.
‘नाही निर्मळ जीवन काय करील साबण’ या वाक्याची आठवण लहानपणी व्हाळावर आंगोळीला जात असताना वडील करून द्यायचे. आज हे वाक्य तंतोतंत खरे ठरताना दिसत आहे. याचे एकमेव कारण म्हणजे कवी केशवसुतांच्या शब्दांत सांगायचे तर ‘नरेचि केला हीन किती नर’ याचा अर्थ असा की माणसाने माणसाला रसातळाला पोहोचवले आहे. हे सध्या खरे ठरत आहे. त्यासाठी एकमेकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. केवळ घरासमोरील केरकचरा काढणे आणि दुस-याच्या अंगणात टाकणे म्हणजे स्वच्छता करणे नव्हे, तर स्वच्छतेबरोबर प्रत्येक भारतीयांची मने स्वच्छ होणेही देशाच्या विकासाच्या दृष्टीने गरजेचे आहे.
प्रत्येकांनी आपला देश स्वच्छ करण्यासाठी जसे प्रयत्न केले जातात तसे प्रयत्न मनाची स्वच्छता करण्याकरिता केले पाहिजेत. मनाची स्वच्छता झाल्यास आपोआप देशाची स्वच्छता होईल. यासाठी देशातील वाढती गटबाजी जबाबदार आहे. गटबाजी हा महारोग आहे. हा महारोग स्वच्छतेपेक्षा महाभयंकर आहे. अशा महारोगाचे निर्मूलन केले पाहिजे. या रोगामुळे कलह वाढून तिरस्कारात भर पडते आणि हा तिरस्कार विकासाला घातक ठरतो. अशा तिरस्काराला तिलांजली देऊन सर्वानी एकत्र येऊन देश स्वच्छ करण्याचा संकल्प केला पाहिजे, तरच ख-या अर्थाने देश स्वच्छ होईल ही सध्याची गरज आहे.
आपल्या स्वच्छ देशासाठी २०००-०१ पासून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंती (२०१४) निमित्ताने स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहेत; परंतु योग्य नियोजनाच्या अभावामुळे हे अभियान योग्य प्रकारे राबविण्यात आले नाही. त्याचे उदाहरण द्यायचे म्हणजे, आजही स्वच्छ पाण्याचा अभाव व अस्वच्छ परिसर ब-याच ठिकाणी पाहायला मिळतात. यात शहरी भागातील नदीनाल्यांचा विचार न केलेला बरा.
देशातील जमीन, पाणी व नैसर्गिक जीवांचा नाश होत आहे. याचा परिणाम प्रदूषणामध्ये वाढ होत आहे, त्यामुळे पावसाळय़ामध्ये रोगराईचे वाढते प्रमाण दिसून येते. यासाठी वाडी, गाव, पंचक्रोशी, तालुका, जिल्हा व राज्य स्वच्छ करावी लागतील. केवळ आश्वासने देऊन चालणार नाही, तर योग्य प्रकारे स्वच्छता करून दरुगधी कमी करावी लागेल. त्यासाठी दूषित पाण्याचा निचरा योग्य प्रकारे करणे आवश्यक आहे.
साथीच्या रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हागणदारीमुक्त गाव जरी केले तरी सांडपाण्यावर प्रक्रिया करावी लागेल. ग्रामीण भागात सक्तीच्या हागणदारीमुक्त धोरणामुळे कच्चे संडास बांधणे, संडासाची टाकी उघडी ठेवणे, सांडपाणी जवळच्या नाल्यात सोडणे अशा अनेक कारणांमुळे पाणी दूषित होते. त्यासाठी संडास योग्य पद्धतीने बांधले गेले पाहिजे. जेणेकरून पर्यावरण संतुलन राहिले पाहिजे. सध्या हागणदारीमुक्तीच्या नावाखाली ग्रामीण भागात गावचे सरपंच महाशयांच्या मार्गदर्शनाखाली संडास बांधत असल्यामुळे वाढीव रकमेच्या नावाखाली त्यांचे साग अथवा फणसाच्या झाडांची लूट केली जात आहे. जणू काही पार्टटाईम धंदा काढलेला दिसतो. याला म्हणतात डोकं. विशेष म्हणजे जे सांडपाणी आहे त्याच्यावर योग्य प्रक्रिया करून वाडीतील झाडांना पाण्याचा वापर करावा. ओला व सुखा कचरा असे कच-याचे वर्गीकरण करावे. कच-यावर योग्यप्रकारे प्रक्रिया करून त्याचा विविध कारणांसाठी वापर करावा. प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर टाळावा. घरातील अथवा परिसरामधील कच-याची योग्य प्रकारे विल्लेवाट लावावी. सांडपाण्याचे नियोजन करून योग्य प्रकारे त्याचा विचरा करावा; त्यामुळे परिसर स्वच्छ राहतो. यामध्ये पाणी हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणून पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन पाणी वाचवापेक्षा पाणी जपून वापरा अशी स्वत:पासून कृती करावी. याचा परिणाम रोगराईचा प्रादुर्भाव तसेच साथीच्या रोगांना आळा बसून जीवनमान सुधारण्यात मदत होईल. यासाठी वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवून बेका-यांना योग्य नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत.
आपला स्वच्छ भारत देश होण्यासाठी निबंध व घोषवाक्य स्पर्धा आयोजित करून चालणार नाही, तर कायद्याच्या चाकोरीतून स्वच्छ मोहीम राबवावी लागेल. प्रत्येकामध्ये स्वच्छतेची भावना निर्माण झाली पाहिजे. केवळ योजना राबवून देश स्वच्छ होणार नाही, तर प्रत्येक भारतीयांची मने स्वच्छ होणे गरजेचे आहे, यासाठी देशात प्रामाणिकपणे जनजागृती करावी लागेल. त्यासाठी देशाच्या स्वच्छतेबरोबर मनाची स्वच्छता होणे आवश्यक आहे, तरच ख-या अर्थाने आपला देश स्वच्छ होईल.
No comments:
Post a Comment