Total Pageviews

Friday, 7 December 2018

खलिस्तान चळवळीला पुन्हा खतपाणी-#Indianarmy using technology to curb infiltration on Pak border and #art...

ब्रिगेडियर हेमंत महाजन<<

hemantmahajan@yahoo.co.in
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान व पंजाबचे मंत्री नवज्योतसिंग यांनी कर्तारपूर येथील कार्यक्रमात मुक्ताफळे उधळली. हिंदुस्थान व पाकिस्तान संबंधांविषयी त्यांनी ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ अशी वक्तव्ये केली. सिद्धू हे मुळातच विनोदी नट असल्यामुळे त्यांना गांभीर्याने घेणे अपेक्षित नाही, पण इम्रान खान एका देशाचे पंतप्रधान आहेत. भावनिक भाषा करायची आणि त्याच कार्यक्रमात खलिस्तानी दहशतवाद्यालाही मानसन्मान द्यायचा ही पाकिस्तानची दुटप्पी नीती जुनीच आहे. किंबहुना खलिस्तान चळवळीला पुन्हा खतपाणी घालण्याचा प्रयत्न पाकिस्तानने  सुरू केला आहे. गेल्या महिन्यात अमृतसरजवळील आदलीवाल गावात निरंकारी सत्संगवर झालेली बॉम्बफेक ही याच धोक्याची नांदी आहे.
हिंदुस्थानातील सर्व पंतप्रधानांच्या समझोता प्रस्तावाला गेल्या 70 वर्षांत तत्कालीन पाकिस्तानी नेत्यांनी कसा दहशतवादी प्रतिसाद दिला हे सर्वश्रुत आहेच. अलीकडे मोदींनीही नवाझ शरीफ यांच्या घरी जाऊन कौटुंबिक नाते प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याची परतफेड हिंदुस्थानात हल्ले करूनच केली गेली. म्हणूनच आजही कश्मीरमध्ये छुपे युद्ध खेळणाऱ्यांवर विश्वास ठेवणे अशक्य आहे. अमेरिकेच्या मदत कपातीमुळे आणि जगाने पाकिस्तानला वाळीत टाकल्यामुळे पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान इम्रान खान यांना हिंदुस्थानचा पुळका आला आहे.
हिंदुस्थानातील डेरा नानकसाहेब आणि पाकिस्तानातील कर्तारपूर येथील शिखांच्या दोन पवित्र स्थानांना जोडणारा मार्ग मोकळा करण्याचा निर्णय हिंदुस्थानने गुरू नानकदेव यांच्या 550 व्या जयंतीच्या निमित्ताने साधला. या मार्गाचा हेतू हिंदुस्थानातील शीख बांधवांना कर्तारपूर येथील गुरू नानक यांच्या समाधीचे दर्शन घेता यावे हा आहे. तथापि, त्यावर आता नकोसे वाटावे असे राजकारण सुरू आहे. यावेळी हिंदुस्थान सरकारनेही आपले दोन मंत्री तिथे पाठविले होते. हा जणू आपला विजय आहे अशा थाटात काँग्रेसचे वादग्रस्त खासदार आणि माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपले पाकिस्तान प्रेम तिथे जाऊन व्यक्त केले.
तथापि, पुन्हा पाकिस्तानने आपले खायचे दात दाखवून दिलेच. पंजाब हिंदुस्थानपासून तोडण्यासाठी चालविण्यात येणाऱ्या खलिस्तान चळवळीचे कट्टर समर्थक आणि हिंदुस्थानविरोधात नेहमी गरळ ओकणारे गोपालसिंग चावला यांनाही या शिलान्यास कार्यक्रमाला निमंत्रित करण्यात आले होते. याशिवाय 2008 च्या मुंबई हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार हाफीज सईद याचे समर्थकही या कार्यक्रमाला उपस्थित होते. गोपालसिंग चावला यांनी पाक लष्करप्रमुख बाजवा यांच्याशी हस्तांदोलन करून आपली त्यांच्याशी जवळीक दाखवून दिली.
एकंदरीतच, हिंदुस्थानच्या भावनांना आणि हिंदुस्थानच्या सार्वभौमत्वाला आपण किती किंमत देतो हे पाकिस्तान सरकारने आणि इम्रान खान यांनी पुन्हा एकदा स्पष्टपणे दाखवून दिले. इम्रान खान यांनी भाषणात कश्मीरचाही उल्लेख केला. तसेच हिंदुस्थानात सत्ताबदल झाल्यास दोन्ही देशांचे संबंध सुधारतील हेदेखील सूचित केले. अशा प्रकारे दोन्ही देशांमध्ये शांतता आणि सौहार्दाचे संबंध प्रस्थापित होणार नाहीत हे पाकिस्तानसह सर्वांना माहीत आहे. तसे संबंध पाकिस्तानला एकतर नकोच आहेत किंवा हवे असले तरी ते स्वतःच्या मनमानी अटींवर हवे आहेत. दुर्दैवाची बाब अशी की, पाकच्या या हिंदुस्थानविरोधी भूमिकेला हिंदुस्थानातील अनेक नेते, संस्था आणि कोणतीही किंमत देऊन पाकशी मैत्री करण्याचा भाबडेपणा अंगात मुरलेले अनेक हिंदुस्थानी मंडळी यांच्याकडूनही कळत नकळत खतपाणी घातले जाते. त्यामुळे पाकिस्तानचा जोर वाढतो आणि या लोकांचा उपयोग तो देश त्याची प्रतिमा जगात सुधारण्यासाठी करतो.
जम्मू-कश्मीरमधील फुटीरतावादाला दहशतवादाची जोड देण्याआधी पाकिस्तानने पंजाबात खलिस्तान चळवळीला खतपाणी घातले होते. 1971च्या पराभवाचा बदला घेण्यासाठी पंजाब तोडण्याची ही योजना होती. कश्मीर खोरे 1990पासून धगधगत ठेवणाऱ्या पाकिस्तानी लष्कर व त्यांच्या ‘आयएसआय’ने हिंदुस्थानी पंजाबात खलिस्तान चळवळ पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सोडून दिलेले नाहीत. पंजाबच्या अमृतसर या पवित्र शहरातील आदलिवाल गावात गेल्याच महिन्यात निरंकारी सत्संगात सहभागी झालेल्या लोकांवर बॉम्ब फेकण्याची घटना घडली. ती खलिस्तान चळवळीला पुनरूज्जीवित करण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणावा लागेल. भविष्यातील अशांततेची ही नांदीच म्हटली पाहिजे. त्याआधी लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनीही पंजाबमध्ये पुन्हा एकदा फुटीरतावादी आणि खलिस्तानवादी शक्ती सक्रिय झाल्याचा गंभीर इशारा दिला होता. मात्र पंजाब सरकारने लष्करप्रमुखांचा इशारा गांभीर्याने न घेतल्याने इतके दिवस दबलेल्या अराजकवादी शक्तींनी बॉम्बस्फोट घडवून आणला. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी पंजाबात आम आदमी पक्षाकडून खलिस्तानच्या मागणीचा विचार, शिवाय खलिस्तानवाद्यांना पूरक ठरेल अशी विधानेदेखील करण्यात आली. काही भागात तशा आशयाची पोस्टर्सही चिकटविण्यात आली. निवडणुका झाल्यानंतर सत्तेवर आलेल्या कॅप्टन अमरिंदर सिंग सरकारकडून त्याविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. सोबतच यंदाच्याच वर्षी पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योतसिंग सिद्धूने पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल कमर बाजवा यांची गळाभेट घेतली. देशाचे परराष्ट्र धोरण केंद्र सरकार ठरवत असताना हिंदुस्थानला नेहमीच पाण्यात पाहणाऱ्या देशाच्या लष्करप्रमुखाच्या भेटीची उठाठेव करण्याची खरे तर सिद्धूला काहीही गरज नव्हती, पण सिद्धूने तसे केले तरी काँग्रेसने वा अमरिंदर सिंग सरकारने सिद्धूला ना जाब विचारला ना त्याच्यावर काही कारवाई केली.
कर्तारपूर कॉरिडॉर झाल्यानंतर हिंदुस्थानातील शिखांना व्हिसा न घेता कर्तारपूरला येता येणार असल्याने सार्वमत मोहिमेच्या प्रचाराची व्यापक संधी साधण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न राहील. ‘रेफरन्डम 2020’ याअंतर्गत राज्यात खलिस्तान समर्थकांनी वातावरण निर्मितीचा प्रयत्न करत आहे. जगभरात हिंदुस्थानची  प्रतिमा खराब निर्माण करण्यासाठी ही मंडळी जुंपली आहेत. नुकतीच अल कायदाच्या एका दहशतवाद्याला पंजाबमधून अटक करण्यात आली. तो पंजाबमध्ये हल्ला करण्याच्या व हिंदू नेत्यांना ठार मारण्याच्या उद्देशाने आला होता. खलिस्तान निर्मितीसाठी जगभरच्या शिखांच्या सार्वमताची मोहीम यापूर्वीच सुरू झाली असून कॉरिडॉर कार्यरत झाल्यानंतर कर्तारपूरमध्ये खलिस्तान समर्थनासाठी मेळावा घेण्याची योजना आहे. आपल्या शपथविधी कार्यक्रमात इम्रान खान यांनी हिंदुस्थानविरोधात जो डाव टाकला होता, त्याचीच पुनरावृत्ती कर्तारपूर येथे करण्यात आली. हिंदुस्थानशी मैत्रीचा देखावा करणे, पण प्रत्यक्षात हिंदुस्थान विरोधकांना सक्रिय प्रोत्साहन देणे ही दुटप्पी पाकनीती याहीवेळी पाहावयास मिळाली.

No comments:

Post a Comment