जागतिक आर्थिक मंचाने नुकत्याच प्रकाशित केलेल्या ‘ग्लोबल जेंडर गॅप’ अहवालामुळे पाकिस्तानमधील महिलांविषयक काही विस्मयजनक आकडेवारी समोर आली आहे. त्या आधारे पाकिस्तानमधील महिलांच्या दुर्दशेवर भाष्य करणारा हा लेख...
आपण एकविसाव्या शतकात पोहोचलो आहोत, याचा अर्थ असा नाही की, विज्ञान आणि तंत्रज्ञानापासून जीवनातल्या प्रत्येक आयामाचा विकास तुमच्यापर्यंत पोहोचलाच असेल. जगातील अनेक भाग असे आहेत, जे आजही मध्ययुगीन दुर्दशेलाच बळी पडलेले आहेत. आपण आपला शेजारील देश पाकिस्तानचा विचार केला, तर ते या दुर्दशेचे एक जीवंत उदाहरण असल्याचे दिसते. पाकिस्तानला अस्तित्वात येऊन ७० वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला. पण, हा देश विकासमार्गात अडथळे आणणाऱ्या रूढीवादी, कट्टरतावादी धोरणाला अजूनही दूर लोटू शकलेला नाही. परिणामी, अशा कारभारामुळे असंख्य अडीअडचणींत आपले आयुष्य कंठणाऱ्या पाकिस्तानच्या बहुसंख्याक जनतेचे, ज्यात महिला आणि धार्मिक अल्पसंख्याकदेखील आहेत, त्यांच्या जीवनाचा नरक झाल्याचे स्पष्ट होते. पाकिस्तानमधील महिलांची नरकसदृश्य स्थिती याचे चालतेबोलते उदाहरण ठरावे. जागतिक लोकसंख्येत पाकिस्तानचा वाटा २.६ टक्के इतका असून, त्यांचा जागतिक लोकसंख्येच्या क्रमवारीत सहावा क्रमांक लागतो. पाकिस्तानच्या एकूण लोकसंख्येत महिलांची संख्या ४९.२ टक्के आहे. जागतिक आर्थिक मंचाने नुकत्याच प्रकाशित केलेल्या ‘ग्लोबल जेंडर गॅप’ अहवालामुळे काही विस्मयजनक आकडेवारी समोर आली आहे. हा अहवाल १४९ देशांतील चार विषयगत आयामांमध्ये लैंगिक समानतेच्या दिशेने होत असलेल्या त्यांच्या प्रगतीबद्दल सांगतो. हे चार आयाम म्हणजे, आर्थिक भागीदारी आणि संधी, शिक्षणाची उपलब्धता, आरोग्य आणि जीवन जगण्यासाठीची अनुकूल परिस्थिती व राजकीय सशक्तीकरण, हे होय. याव्यतिरिक्त या वर्षापासून कृत्रिम बुद्धिमत्तेशी (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) संबंधित लिंग गुणोत्तराचाही अभ्यास करण्यात आला आहे. पाकिस्तान, विशेषत्वाने या सर्वच आयामांत सर्वात खालच्या पायरीवर राहिला आहे. पाकिस्तानने १४९ देशांच्या यादीत थेट तळाशी म्हणजे १४८ वा क्रमांक पटकावला आहे. केवळ राजकीय सशक्तीकरणात पाकिस्तानला ९७ वा क्रमांक मिळाला. लैंगिक समानतेची गोष्ट पाहता,पाकिस्तान जगातील दुसऱ्या सर्वात वाईट देशाच्या रुपात समोर येतो. सीरियासारखा देशदेखील पाकिस्तानच्या पुढे आहे, तर केवळ युद्धग्रस्त येमेन हा देशच पाकिस्तानच्या मागे आहे. सोबतच पाकिस्तान दक्षिण आशियामध्ये सर्वात खालच्या पातळीवर आहे. एवढेच नव्हे, तर भूतानसारखा आर्थिक दृष्टिकोनातून दुबळा देशदेखील पाकिस्तानपेक्षा पुढे आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांची संख्या असूनही पाकिस्तानमध्ये महिलांची स्थिती काय आहे? पाकिस्तानच्या स्थितीवरूनच हे स्पष्ट होते की, पाकिस्तान आपल्या देशातील महिलांबरोबर चांगला व्यवहार करत नाही. याचे कारण, पाकिस्तानातल्या ‘त्या’ परंपरांकडे जाते,ज्यांना या देशाने आपल्या विशिष्ट धार्मिक आणि सामाजिक स्थितीमुळे प्राप्त केले आहे. यापैकी एक आहे, मुस्लीम जगतामध्ये महिलांची वाईट अवस्था ही एक सर्वसामान्य बाब आहे. या देशामध्ये महिलांबरोबर भेदभाव केला जातो आणि सरकारदेखील ज्या सामाजिक सेवासुविधा पुरुषांना प्रदान करते, त्यादेखील महिलांना दिल्या जात नाहीत. मलाला युसूफजाई हिच्यावर झालेला हल्ला हा याचाच दाखला. मलालाला मारण्याचे प्रयत्न करण्यात आले, तेदेखील केवळ तिने मुलींना शिक्षणाचे महत्त्व सार्वजनिकरीत्या सांगण्याचा प्रयत्न केला म्हणून.पाकिस्तानमधील महिलांच्या बिकट परिस्थितीची गंभीर जनकसांख्यिकीय कारणेदेखील आहेत आणि परिणामदेखील. पाकिस्तान सरकार या भ्रांतीमध्ये होते की, पाकिस्तानने जनसांख्यिकीय संक्रमणाच्या चरणात प्रवेश केला आहे. पण, २०१७च्या जनगणनेने त्याला चांगला झटका दिला. लोकसंख्येतील वाढीचा दर सरकारच्या अंदाजाच्या तुलनेत एक तृतीयांश अधिक म्हणजे १.८ टक्क्यांऐवजी २.४ टक्के एवढा होता. तथापि, सामान्य स्थितीत एकूण लोकसंख्येत महिलांचे गुणोत्तर पुरुषांच्या तुलनेत थोडेसे अधिकच असते. याचे कारण महिलांच्या दीर्घकालीन आयुर्मर्यादेतही असू शकते. पण, पाकिस्तानमध्ये असे झालेले नाही आणि याचे कारण पाकिस्तानी समाजात महिलांची अपेक्षित अशी निम्नस्थिती हे आहे. ही स्थिती पाकिस्तानच्या काही क्षेत्रांत अतिशय भीषण झाली आहे. खैबर पख्तुनख्वा आणि फाटासारख्या भागात महिलांचे जीवन अतिशय कडक अशा सामाजिक आणि कौटुंबिक नियमांद्वारे नियंत्रित केले जाते, ज्यात वैयक्तिक स्वातंत्र्यासारख्या गोष्टीला कोणतेही स्थान नसते. पाकिस्तानमध्ये जिथे महिलांना आपल्या जीवनात अगणित अशा अडचणींचा सामना करावा लागतो,जवळपास ६५ टक्क्यांपेक्षा अधिक महिलांना पिण्याचे स्वच्छ पाणीदेखील मिळत नाही. ४० टक्क्यांपेक्षा अधिक महिलांना आपल्या घरगुती आयुष्यात हिंसाचाराचा सामना करावा लागतो. आपण पाकिस्तानात महिलांना प्रदान केल्या जाणाऱ्या आरोग्यविषयक सुविधांबाबत विचार केला, तर ही स्थिती अत्यंत भयानक असल्याचे दिसते. पाकिस्तानात प्रत्येक २० मिनिटाला गर्भधारणेतील जटीलतेमुळे एका महिलेचा मृत्यू होतो. पाकिस्तानातील जवळपास ५५ टक्के गर्भवती महिलांपर्यंत प्रशिक्षित कर्मचारी किंवा महिला आरोग्य कार्यकर्तादेखील उपलब्ध नाहीत. परिणामी, यातील बहुसंख्य महिला आपल्या घरातच असुरक्षित पद्धतीने आपल्या मुलांना जन्म देतात. ‘वट्टा-सट्टा’सारखे जुन्या परंपरा-रुढी आजदेखील प्रचलित आहेत. ज्यात मुलींचा दोन कुटुंबांदरम्यान विवाहाच्या उद्देशाने विनिमय केला जातो.
‘ऑनर किलिंग’ पाकिस्तानमध्ये एक सर्वसामान्य गोष्ट आहे. गेल्या वर्षी अशाप्रकारच्या एका घटनेत कंदील बलोच हिची हत्या तिच्या भावानेच केली होती. सिंधच्या ग्रामीण भागात ‘कारो-कारी’सारख्या अमानवीय प्रथांद्वारे अवैध संबंधांच्या आरोपात मोठ्या संख्येने महिलांना मारून टाकण्यात आले आणि हे सातत्याने सुरूच आहे. पाकिस्तानी महिलांची शैक्षणिक अवस्था जगात सर्वाधिक वाईट म्हणता येईल, अशीच आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या साक्षरतेचे प्रमाण फारच कमी आहे. पाकिस्तानी महिलांचा सरासरी साक्षरता दर ४४.३ टक्के आहे. पण, हे चित्र पूर्ण नाही. ग्रामीण महिलांमध्ये शहरी महिलांच्या तुलनेत साक्षरतेचा दर केवळ २० टक्के इतकाच आहे. महिलांची शैक्षणिक स्थिती योग्य नसल्यामुळे त्या कधीही एक उच्च क्षमतेचे मनुष्यबळ होऊ शकत नाही. परिणामी, त्यांची आर्थिक स्थितीदेखील सदैव बाधितच राहते आणि आर्थिक स्वावलंबनाच्या अभावामुळे महिलांच्या स्वातंत्र्य आणि सशक्तीकरणाच्या गोष्टी या बेईमानी होऊन जाते. आजही पाकिस्तानमध्ये मोठ्या संख्येने महिलांचे अपहरण, हत्या आणि बलात्कार होत आहेत. पाकिस्तानच्या एका बिगरसरकारी संघटना-औरत फाऊंडेशनच्या अनुसार पाकिस्तानच्या काही पायाभूत सुविधांतील कमतरता, धार्मिक आणि सामाजिक रूढीवादिता, भ्रष्ट पोलीस यंत्रणा आणि प्रवर्तन यंत्रणा, अप्रभावी न्यायिक प्रणालीमुळे महिलांविरोधातील अपराधांना आळा घालणे मोठेच अवघड ठरत आहे. पण,अल्पसंख्याक महिलांची स्थिती तर यापेक्षाही अधिक भयावह आहे. पाकिस्तानमधील सक्रिय मानवाधिकार संघटना ‘मूव्हमेंट फॉर सॉलिडॅरिटी अॅण्ड पीस’च्या (एमएसपी) अनुसार पाकिस्तानमध्ये दरवर्षी जवळपास एक हजार ख्रिस्ती आणि हिंदू मुली-महिलांचे अपहरण केले जाते.ज्यांचे बळजबरीने धर्मांतरण करून मुस्लीम पुरुषांशी विवाह करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जातो.
आर्थिक आणि सामाजिक सशक्तीकरणाशिवाय राजकीय सशक्तीकरणाला काहीही अर्थ नाही. लोकशाही मार्गाने निवडली गेलेली सरकारे महिला आणि पुरुष, दोघांच्याही प्रतिसमान रुपाने उत्तरदायी आहेत. पण, जर आजच्या परिप्रेक्षात विचार केला, तर पाकिस्तानच्या राजकारणामध्ये महिलांच्या भागीदारीसाठी त्यांनी माजी लष्करी हुकूमशहा जनरल परवेझ मुशर्रफ यांचे आभार मानले पाहिजे. मुशर्रफ यांनीच राष्ट्रीय आणि प्रांतीय असेम्ब्लिमध्ये महिलांसाठी जागा आरक्षित केल्या आणि त्याला कठोरपणे अंमलातही आणले. पण, या सशक्तीकरणाची वास्तविकता पूर्णपणे भिन्न आहे. पाकिस्तानच्या विधानसभा वा संसदेत ज्या महिला आहे, त्यातील काहीजणींना सोडले,तर बहुतेकींची स्थिती एखाद्या रबरस्टॅम्पसारखी आहे. ज्यांचे सगळेच राजकीय निर्णय त्यांच्या वडील, पती वा अशाचप्रकारे कुटुंबातील एखाद्या पुरुषाकडून घेतले जातात. अन्य ठिकाणी जिथे अशा प्रकारची कायदेशीर अट नाही, तिथे महिलांचा सहभाग अगदीच नगण्य आहे,मग ती नागरी सेवा असो वा कॉर्पोरेट जगत. आज पाकिस्तानमधील बहुसंख्य लोकसंख्येला अन्याय-अत्याचाराने ग्रासलेले आयुष्य नाईलाजाने जगावे लागत आहे. पण, अशा स्थितीतही पाकिस्तानी शासक नैतिकता आणि माणुसकीच्या उपदेशकाची भूमिका निभावण्यासाठी सदैव उत्साहित असल्याचे दिसते. आज पाकिस्तानमध्ये महिला दुय्यम दर्जाच्या नागरिकांसारखे जीवन जगण्यासाठी लाचार आहेत आणि केंद्र तथा राज्यात मोठ्या संख्येने राजकीय सहभाग असूनही महिला, महिलांची स्थिती सुधारण्यासाठी धोरणे आणि कार्यक्रम तयार करण्यापासूनही वंचित आहेत. हाच पाकिस्तानमधील महिलांच्या दुर्दशेचा यथार्थ आहे.
No comments:
Post a Comment