Total Pageviews

Monday, 3 December 2018

नौदल होत आहे भक्‍कम   ब्रिगेडियर हेमंत महाजन



पाकिस्तानने 3 डिसेंबर 1971 रोजी संध्याकाळपासून भारताच्या 11 हवाई अड्ड्यांवर अचानक हल्ला केला. त्याच रात्री भारतीय वायुदलाने पाकिस्तानच्या हवाई अड्ड्यांवर हल्ले केले. त्याचबरोबर बंगलादेशच्या सीमेवर सज्ज असलेल्या भारतीय सेनेने एकाच वेळी बांगलादेशात प्रवेश करून हल्ले सुरू केले. 3 डिसेंबरच्या रात्रीच भारताच्या तीन विद्युत क्लास मिसाईल बोटी पाकिस्तानच्या सीमेवर 400 किलोमीटर अंतरावर पोचल्या होत्या! त्या वेळी कराची हे पाकिस्तानचे एकमेव व्यापारी दृष्टीने आयात-निर्यात करणारे बंदर आणि पाकिस्तानी नौसेनेचे मुख्यालय होते! त्यामुळे कराची बंदराची नाकेबंदी करण्याचा निर्णय घेतला गेला होता. रात्री 10:30 वाजता पाकिस्तानच्या समुद्रकिनार्‍यावरून जवळ जाऊन तिथल्या पेट्रोलच्या टाक्यांवर मिसाईल बोटींनी हल्ला करून त्या उद्ध्वस्त केल्या. त्याच वेळी पाकिस्तानी नौदलाची पी.एन.एस. खैबर ही युद्धनौका भारतीय नौदलाच्या मिसाइल बोटीच्या टप्प्यात आल्यावर त्यांनी तिच्यावर मिसाइलचा मारा केला! त्या वेळी पाकिस्तानच्या युद्धनौकेला भारतीय नौदलाच्या युद्धनौका कराची बंदराच्या इतक्या जवळ आल्या आहेत, हे समजलेच नाही. त्यांना वाटले हा भारतीय वायुदलाच्या विमानांचा हल्ला आहे! म्हणून त्यांनी युद्धनौकेवरील विमान विरोधी तोफा आणि मशिनगन हवेतच गोळीबार प्रारंभ केला. त्याचबरोबर कराची बंदरातच अमेरिकेची एम.व्ही. व्हिनस चॅलेंजर ही बोट पाकिस्तानी सैन्यासाठी दारूगोळा घेऊन येत होती. तिच्यावरही भारतीय युद्धनौकांनी तोफगोळे आणि मिसाइलचा मारा करून तिच्या ठिकर्‍या ठिकर्‍या केल्या. इतक्या तत्परतेने 4 डिसेंबरला रात्री 11:30 वाजेपर्यंत पाकिस्तानची युद्धनौका खैबर, अमेरिकेची युद्ध सामग्री आणणारी बोट आणि कराची बंदरातील पेट्रोलच्या टाक्या उद्ध्वस्त करून भारतीय नौसेनेच्या युद्धनौका मुंबईकडे यायला परत निघाल्या. ऐतिहासिक दृष्टीने भारताची मर्यादित क्षमता असूनसुद्धा अत्यंत अल्पकाळात म्हणजे 4 डिसेंबर 1971 रोजी एका रात्रीतच पाकिस्तानच्या नौदलाला त्यांचे मुख्यालय कराचीतच पोचून त्यांचा पराजय करण्याची क्षमता ही भारताच्या सैनिकी क्षेत्रात एक प्रेरणादायक घटना ठरली आहे.
भारतीय नौदलाची पहिली विमानवाहू युद्धनौका आणि 1971 च्या पाकिस्तानबरोबरच्या बांगलादेश युद्धात पाकिस्तानचा पराजय करण्यात महत्त्वाचे योगदान भारतीय नौदलाच्या विक्रांत युद्धनौकेचे होते. विक्रांतने बंगालच्या उपसागरातील त्या काळच्या पश्‍चिम पाकिस्तानातील बांगलादेशचे महत्त्वाचे बंदर असणारे चितगाव आणि कोक्सबाजार या बंदरांची नाकेबंदी केल्यामुळे पाकिस्तानी नेव्हीला कोणती मदत किंवा हालचाली करणे अशक्य झाले आणि युद्ध लवकर संपले.
2008 मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारने 15 हजार कोटी रुपये खर्च करून सागरी सुरक्षा व्यवस्था तयार करण्याचा निर्णय घेतला होता. देशाला लाभलेल्या 7516 किलोमीटर इतक्या लांबीच्या आपल्या समुद्र किनार्‍यावर आता इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या माध्यमातून लक्ष ठेवले जात आहे. त्याचबरोबर समुद्रातील गस्तीही वाढवण्यात आल्या आहेत. मध्यंतरी, आपण समुद्रामध्ये लक्ष ठेवण्याकरिता नॅशनल कमांड कंट्रोल कम्युनिकेशन अँड इंटेलिजन्स नेटवर्क म्हणजे एनसी3आयहे एक इलेक्ट्रॉनिक जाळे तयार केले आहे.  
याशिवाय, आपल्या किनारपट्टीवर 74 अ‍ॅटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम (एआयएस) बसवण्यात आली आहे. प्रत्येक बोटीवर एक इलेक्ट्रॉनिक सिस्टीम बसवलेली असते. या यंत्रणेमुळे प्रत्येक बोटीला पीआयएसद्वारे ओळख पटवून दिली जाते. चारचाकी गाडीला रजिस्टर नंबर दिला जातो, तसाच एक इलेक्ट्रॉनिक नंबर प्रत्येक बोटीला दिलेला असतो. या नंबरद्वारे उपग्रहांद्वारे संबंधित बोटीची ओळख पटवून घेता येते. या नंबरमुळे सागरी क्षेत्रात आलेली बोट कुठल्या देशाची आहे, कुठे जात आहे याची माहिती मिळते. यामुळे कोणत्याही अनोळखी बोटीला आपल्या समुद्र हद्दीत पोहोचणे कठीण झाले आहे. सध्या एआयएसचे प्रमाणपत्र हे 300 टनांहून मोठ्या असलेल्या बोटींसाठी आहे. त्यापेक्षा कमी वजन वाहून नेणार्‍या बोटींसाठी अशा प्रकारचे ओळखपत्र नाही. याचाच अर्थ कुठलीही मोठी अनोळखी बोट भारताच्या समुद्र हद्दीत घुसली तर तिला तत्काळ रोखता येऊ शकते. मात्र, लहान बोटी अशा प्रकारे ओळखता येणे शक्य नाही. आज भारतात मच्छीमारी बोटींची संख्या अडीच ते तीन लाखांच्या घरात आहे. त्यांच्यावर येत्या तीन-चार वर्षांत कमी किमतीचे एआयएस बसवण्यात येऊ शकतात. त्यातून या छोट्या बोटींचीही ओळख पटणे सोपे होणार आहे. भारतीय नौदलाला आता 95 फास्ट इंटरसेफ्टर क्राफ्ट मिळणार आहेत. याशिवाय, 17 इमिजेट सपोर्ट व्हेसल्सही मिळालेल्या आहेत. यामुळे समुद्रकिनार्‍यावर असलेल्या बॉम्बे हायच्या ऑईल प्लॅटफॉर्मचे रक्षण करणे हे सोपे होणार आहे. या प्‍लॅटफॉर्मच्या रक्षणासाठी नौदलाने 1000 नौदल सैनिकांचे सागरी प्रहारी दल तयार केले आहे. 
भारताच्या नौदलाची क्षमता वाढवणारी एक महत्त्वपूर्ण घटना म्हणजे नौदलाच्या ताफ्यात दाखल झालेल्या आण्विक शस्त्रांनी सज्ज आयएनएस अरिहंत पाणबुडीने पाच नोव्हेंबरला आपली फेरी पूर्ण केली. त्यामुळे अमेरिका आणि रशियानंतर भारत हा जगातील तिसरा देश ठरला आहे, ज्याच्या संरक्षण क्षेत्रातील तीनही दलांकडे अण्वस्त्रांनी हल्ला करण्याची क्षमता आहे. सध्या जगात अमेरिका आणि रशिया हे दोनच असे देश आहेत, जे जमिनीवरून, हवेतून आणि पाण्याखालून अण्वस्त्रहल्ला करू शकतात. अरिहंत पाणबुडीच्या आगमनाने या दोन देशांच्या पंक्‍तीत आता भारत जाऊन बसला आहे. चीन आणि पाकिस्तान या भारताच्या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांकडे ही क्षमता नाही. आपल्या देशापुढे संरक्षणाच्या दृष्टीने जी आव्हाने आहेत, त्यांना भिडण्याची ताकद एका पाठोपाठ एक अशा क्रमाने आपण प्राप्त करीत आहोत आणि अरिहंतचे आगमन हा या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. 
भारताच्या तीन बाजूंना समुद्रकिनारा लाभला आहे. मोठी किनारपट्टी लाभणे जागतिक व्यापाराच्या दृष्टीने जसे बलस्थान ठरते, तसेच संरक्षणाच्या दृष्टीने ते मोठे आव्हानही असते. सागरी क्षेत्रात शांतता कायम राखण्यासाठी आणि शत्रूने आगळीक केल्यास प्रत्युत्तर देण्यासाठी सागरी सीमा सुरक्षित असणे गरजेचे असते आणि तेच भारताने केले आहे


No comments:

Post a Comment