Total Pageviews

Wednesday, 5 December 2018

काश्मीरमधील ‘सोशल’ आव्हान : Dec 06 2018 1:38AM   ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)


राज्यपालांनी जम्मू-काश्मीरची विधानसभा बरखास्त केल्यानंतर राजकीय घडामोडीही अनेक घडल्या आहेत. त्या पलीकडे संरक्षणाच्या दृष्टीने घडलेली एक महत्त्वाची घटना म्हणजे काही स्नायपर रायफल घेतलेले दहशतवादी काश्मीर खोर्‍यात घुसले आहेत. स्नायपर रायफलचा अर्थ दुर्बीण लावलेली रायफल. ज्यामधून 500 ते 600 मीटर दूर असलेल्या सैनिकांवर लपून हल्ला चढवता येतो. या दुर्बिणींमधून रात्रीही दिसू शकते. अशा दोन डिटॅचमेंट कार्यरत असण्याचा अंदाज आहे. गेल्या आठवड्यात काही दहशतवाद्यांनी दुरूनच भारतीय लष्करावर हल्ला केल्याने एक सीआरपीएफचा, एक सीमा सुरक्षा दलाचा, एक सीआयएसचा आणि एक सैन्याचा, असे चार जवान मारले गेले होते. याचाच अर्थ स्नायपर रायफल वापरणार्‍या दहशतवाद्यांची क्षमता लक्षणीय आहे. त्यांना लवकरात लवकर मारणे गरजेचे आहे. याविषयी भारतीय लष्कर लक्ष ठेवून लष्करी प्रत्युत्तर देईल; 
परंतु सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे, काश्मीर खोर्‍यातील दहशतवादाचे बदलते स्वरूप. काश्मीर खोर्‍यात सरकारने शिक्षणाचा प्रचंड प्रसार केला आहे. बहुतांश काश्मिरी विद्यार्थ्यांना सरकारी शिष्यवृत्ती मिळाल्याने काश्मीर खोरे मध्यमवर्गीय, सुशिक्षित झाले आहे. शिक्षणाचा उद्देश असा, की ते देशाचे चांगले नागरिक होतील; मात्र ही अपेक्षा फोल ठरत हे सर्व शिक्षित युवक फेसबुक किंवा सोशल मीडिया दहशतवादी किंवा वॉरियर बनले आहेत. त्यांनी सोशल मीडियामध्ये उग्रवादाचा प्रचार करायला सुरुवात केली आहे. आपल्या देशात सोशल मीडियाचे अनेक प्रकार आहेत. त्यात व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक, ट्विटर, स्नॅपचॅट अशी जवळपास 20 वेगवेगळी माध्यमे आहेत. याचा चांगला वापर करता येतो तसा गैरवापरही करता येतो. याचा काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात गैरवापरच होतो आहे. भारतीय सैन्य शोधमोहीम किंवा धरपकड करायला कोणत्याही गावात प्रवेश करते तेव्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून निरोप पाठवला जातो, की सैन्य आले आहे आणि आजूबाजूच्या गावांतील लोकांना सैन्यावर दगडफेक करण्यासाठी बोलावले जाते. त्यामुळे सैन्याची शोधमोहीम सुरू होते, तेव्हा शेकडोंनी युवक गोळा होतात आणि सैन्यावर दगडफेक करायला सुरुवात करतात. एका बाजूला दहशतवाद्यांना तोंड द्यायचे आणि मागच्या बाजूने दगडफेकीलाही तोंड द्यायचे, अशा प्रकारचे दुतर्फा आव्हान सैन्याला पेलावे लागत आहे. 
एवढेच नव्हे, तर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक फेक न्यूज किंवा चुकीच्या बातम्या, फोटो पाठवले जातात. उदाहरणच द्यायचे झाल्यास, सोशल मीडियावर एक बातमी आली होती, ती म्हणजे सैन्याने एका भागात असलेल्या सर्व हातगाड्या जाळून टाकल्या. त्या बातमीने हाहाकार माजला होता; मात्र नंतर ही बातमी चुकीची असल्याचे स्पष्ट झाले. आज काश्मीर खोर्‍याची 70 टक्के लोकसंख्या ही तरुणवर्गातील आणि 35 वर्षे वयोगटातील आहे. ते मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर करतात; पण अलीकडील काळात सोशल मीडियाचा गैरवापर इतक्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे, की सरकारने त्यांच्यावर वेगवेगळे निर्बंध लावायला सुरुवात केली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपच्या अ‍ॅडमिनिस्ट्रेटर्सना डीसी ऑफिसमध्ये स्वतःला नोंदणीकृत करण्यास 

सांगितले आहे. एवढेच नाही, तर अफवा किंवा चुकीची बातमी पसरवली, तर त्याला दोन वर्षे कैदेची शिक्षा होऊ शकते. काश्मीरमध्ये सरकारी कर्मचार्‍यांची संख्या पाच लाखांहून जास्त आहे. त्यांनाही सोशल मीडियाचा गैरवापर करण्यापासून थांबवले जात आहे. 
हे प्रयत्न आवश्यक आणि स्वागतार्ह असताना या विरोधात तिथल्या युवक आणि कर्मचार्‍यांनी एक चळवळ सुरू केली आहे. यात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सर्वात मोठे आव्हान आहे, ते प्रचंड व्याप्ती असणार्‍या सोशल मीडियावर नियंत्रण कसे ठेवायचे? दुर्दैवाने अनेक वेळा व्हॉट्सअ‍ॅ्पवर येणारे मेसेज भारतातून न येता ते पाकिस्तान किंवा इतर देशांतून येतात. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करणार्‍या व्यक्तीची ओळख पटली पाहिजे, यासाठी मोबाईल क्रमांक घेताना जसे सर्व माहिती मोबाईल कंपनीला देतो, तशीच ही माहिती सोशल मीडियाच्या वापरासाठी देणेही सक्तीचे केले पाहिजे. 
अनेक काश्मिरी युवक कुठलीही हिंसाचाराची घटना घडली की त्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग सुरू करतात आणि त्या घटनेला मोबाईलवरून सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. दहशतवादी संघटनेत नव्या तरुणांची भरती करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपसारख्या माध्यमांचा वापर केला जातो. व्हॉट्सअ‍ॅपचा वापर युवकांना कट्टरतावादी बनवण्यासाठी केला जातो. आज काश्मीर खोर्‍यातील तरुण तीन प्रकारे विचार करणारे आहेत. एक म्हणजे, काश्मीर खोरे स्वतंत्र हवे आहे, दुसरे ज्यांना पाकिस्तानात सामील व्हायचे आहे आणि तिसर्‍यांना कट्टरवादी इस्लामिक राष्ट्र होण्याची इच्छा आहे. 
काश्मीर खोर्‍यावतील बंदुकधारी दहशतवाद जरी कमी होत असला, तरी आता की-पॅड जिहादी किंवा फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप दहशतवादी हा नवा वर्ग सुरू होत आहे. जो चुकीच्या बातम्या पसरवून कट्टरतावाद पसरवण्याचा प्रयत्नात आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवून तिथे दुष्कृत्ये करणार्‍यांना पकडणे गरजेचे आहे. त्यातून खोर्‍यामध्ये पसरलेल्या कट्टरतावादाला रोखण्यास मदत मिळेल. 

No comments:

Post a Comment