Total Pageviews

Saturday, 1 December 2018

पोलिसांवर हल्ले ,आरोपी मोकाट



राज्यात कायदा व सुव्यवस्था शिल्लक आहे का, असा प्रश्न उपस्थित करण्याजोगी सध्याची स्थिती आहे. तस्करांच्या कारवाया चालूच आहेत. पोलिसांचे मुडदे पडत आहेत. राज्यावर पोलिसांचे शासन आहे की गुन्हेगारांचे असा उद्वेग नागरिकांच्या ओठी आहे. ऑगस्टच्या प्रारंभी भंडारा जिल्ह्यात रोहा येथे रेती तस्करांनी थेट पोलिसांवर हल्ला केला. ऑक्टोबरच्या अखेरीस नागपूर जिल्ह्यात उमरेडमध्ये रेती तस्करांनी नायब तहसीलदारांना चिरडण्याचा प्रयत्न केला. नोव्हेंबरमध्ये अशा तस्करांची हिंमत वाढली. अकोल्यात गुटखा माफियांनी पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न केला. चंद्रपूर जिल्ह्यात नागभीडजवळ दारू तस्करांनी पोलीस उपनिरीक्षकाला चिरडले. आणि हे सर्व कमी म्हणून की काय नागपुरात मॅटॅडोर चालकाने सहायक फौजदारावर गाडी घातली. ही सर्व लक्षणे गुंडगिरीवर गृहखात्याचा वचक न उरल्याची आहेत. अगदी अलीकडची पोलिसांवरील हल्ल्यांची प्रकरणे आणखी घातक आहेत. यवतमाळ जिल्ह्यात मारेगावात एका आरोपीने त्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच हल्ला चढवून एकाला ठार केले. अन्य दोन पोलीस जखमी झाले. नागपुरातील मार्टिननगर पेट्रोल पंपावर रांग न पाळल्याबद्दल हटकले म्हणून पोलिसावर चाकूहल्ला झाला. तीन महिन्यांतील विदर्भातील हा घटनाक्रम भयग्रस्त करणारा आहे. गृहखात्याचे प्रमुखपद विदर्भाकडे असताना विदर्भात असला नंगानाच वाढतोच आहे. प्रश्न खरेतर विदर्भ किंवा बाकीचा महाराष्ट्र असाही नाही. कायद्याचे असे गर्भगळित होणे क्षम्य नाही. 'रुद्ध मनांशी ठेवा ऋजुता, मत्तजनांशी कसली मृदुता…' असा पवित्रा हवा. अनेक महिने फरारी राहिलेल्या मुन्ना यादव या गावगुंडाला राजकीय सन्मान आणि राज्यमंत्री पदाचा दर्जा देणारे सत्ताधीश सामान्यांच्या जीवावर उठलेल्या रेती, गुटखा आणि दारू तस्करांवर कडक कारवाई कधी करणार? पोलिसांवर हल्ले सुरूच आहेत. आरोपी मोकाट आहेत. या पार्श्वभूमीवर सध्या मुन्ना यादवच्या वाढदिवसांचे फलक झळकत आहेत. निवडणुका येत असल्याने राजकीय शरणतेचे याहून संतापजनक चित्र दिसले तर नवल नाही. 

No comments:

Post a Comment