धर्मांध हल्लेखोरांच्या धर्मवेडापायी काश्मिरी पंडितांच्या उष्ण रक्ताच्या चिळकांड्या तिथल्या थंडगार बर्फावर उडाल्या. पण,काश्मीरला इस्लामच्या चांदताऱ्याखाली आणण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना ना कोणाचे रुदन दिसले ना कोणाची वाताहत! सांगा फारुख अब्दुल्ला, या सगळ्याला मोदीच जबाबदार होते काय?
केंद्रात नरेंद्र मोदींचे सरकार सत्तेवर आल्यापासून देशाच्या माथ्यावरची भळभळती जखम असलेला काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक ते सर्व मार्ग अवलंबले गेले. पण, ज्यांच्या तीन पिढ्या काश्मीरच्या धगीवर पोसल्या गेल्या, त्या फारुख अब्दुल्लांनी डोळे मिटून घेतल्याने त्यांना मोदी सरकारचे प्रयत्न दिसलेच नाहीत. म्हणूनच फारुख अब्दुल्लांनी काश्मिरी युवकांचे आपणच एकमेव तारणहार असल्याच्या थाटात काश्मीरमधील हिंसाचाराला नरेंद्र मोदीच जबाबदार असल्याचा आरोप केला. “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सगळ्यांचेच हृदय जिंकले असते, तर मुलांनी हातात बंदुका घेतल्या असत्या का?” हा सवाल फारुख अब्दुल्ला यांनी एका मुलाखतीतून विचारला. फारुख अब्दुल्लांच्या या प्रश्नात एक आरोपही आहे, तो म्हणजे नरेंद्र मोदींमुळेच काश्मिरात हिंसाचार बळावला. पण, जम्मू-काश्मीरच्या राजकारणात जवळपास ४०-४५ वर्षांपासून वावरत असलेल्या या इसमाने मोदींवर हिंसाचाराचा आरोप करणे म्हणजे बालिश असल्याचे प्रमाणपत्र स्वतःच स्वतःला दिल्यासारखे. कारण, काश्मीर प्रश्न काही नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासूनचा म्हणजेच गेल्या साडेचार वर्षांतला नाही, तर तो मागच्या ७० वर्षांचा रक्तरंजित इतिहास आहे. फाळणीपासून सदैव पेटत्या राहिलेल्या काश्मीरच्या मुद्द्याने देशाचे राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण पुरते ढवळून काढले. काश्मीरचा घास आपल्यालाच गिळता यावा म्हणून पाकिस्तानने लादलेल्या तीन-तीन युद्धांमध्ये भारतमातेच्या हजारो सुपुत्रांना आपला जीव गमवावा लागला. जमिनीवरच्या युद्धात भारताने पाकिस्तानला वेळोवेळी चारी मुंड्या चित केल्याने पुढे त्या देशाने घुसखोरीचा, दहशतवादाचा मार्ग पत्करला. ९०च्या दशकात पाकिस्तानच्याच अफाट भूमीलालसेपायी काश्मिरात‘जिहादी युद्ध’ सुरू झाले. धर्मांध हल्लेखोरांच्या धर्मवेडापायी काश्मिरी पंडितांच्या उष्ण रक्ताच्या चिळकांड्या तिथल्या थंडगार बर्फावर उडाल्या. काश्मिरी दहशतवादाच्या निर्दयी पिंजऱ्यात भेदरलेल्या लाखो कबुतरांची-मानवी जीवांची राखरांगोळी झाली. आईच्या, बापाच्या, मुलांच्या, विधवांच्या हंबरड्याने हिमालयही थरारला. पण एवढे होऊनही काश्मीरला इस्लामच्या चांदताऱ्याखाली आणण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना ना कोणाचे रुदन दिसले ना कोणाची वाताहत! सांगा फारुख अब्दुल्ला, या सगळ्याला मोदीच जबाबदार होते काय?
पाकिस्तानी दहशतवादाच्या काळसर्पाने काश्मिरातल्या शांततेला, एकतेला दंश केला. याच विषारी दंशाला अमृताची उपमा देणाऱ्या स्थानिक धर्मांधांचीही पुरेपूर साथ मिळाली. सर्वसामान्य मुसलमानांना काश्मीरच्या आझादीची स्वप्ने दाखवली गेली. कपाळावर आपल्या धर्माच्या श्रेष्ठत्वाची राख फासलेल्या लोकांनी मशिदी-मशिदीतून ‘हिंदू कुत्ते चले जाव’ सारख्या चिथावणीखोर घोषणा दिल्या. या सगळ्याच कारवायांमागे पाकिस्तानचा हात तर होताच आणि आहेही, पण काश्मिरातल्या राजकीय पक्षांनीही या गोष्टींना ठोस विरोध केला नाही.पाकिस्तानच्या आर्थिक आणि लष्करी मदतीवर राज्य टिकवून ठेवणाऱ्या अब्दुल्लांचीही यात निश्चित अशी भूमिका आहेच आहे. आज जशा काश्मीर प्रश्नावरून भूमिका बदलल्या जातात, कोलांटउड्या मारल्या जातात, वादग्रस्त विधाने केली जातात, तसेच तेव्हाही घडले. पाकिस्तान आणि भारताच्या भांडणात राज्याची सत्ता आपल्याच हाती कशी राहील, याचे डावपेच आखले गेले. अब्दुल्ला कुटुंबीय यात अजिबात मागे नव्हते. फुटीरतावाद्यांच्या आडून आपल्या राज्यकारभाराची धन कशी होईल, हेदेखील अब्दुल्ला कुटुंबीयाने नेहमीच पाहिले. स्वातंत्र्यानंतर महाराजा हरिसिंगांकडून शेख अब्दुल्लांकडे आलेल्या काश्मीरची सत्ता आपल्यालाच मरेपर्यंत मिळावी, ही इच्छा फारुख असो वा ओमर अब्दुल्लांनी बाळगली. सत्तेत वा दिल्लीत असल्यावर भारताची बाजू घ्यायची आणि सत्तेतून बेदखल झाले की, काश्मिरात पाऊल ठेवले की, पाकिस्तानचे प्रियाराधन करायचे, फुटीरतावाद्यांशी चर्चेची मागणी करायची, त्यांना आश्रय द्यायचा, हाच कित्ता अब्दुल्लांनी गिरवला. अगदी गेल्या एक-दोन वर्षांतली त्यांची विधाने तपासली तरी त्याची प्रचिती येते. सत्तेपासून पारख्या झालेल्या फारुख अब्दुल्लांनी, ‘पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानचेच आहे’,‘काश्मीर समस्या सोडविण्यासाठी भारताने अमेरिका आणि चीनची मदत घ्यावी’,‘पूर्ण भारतीय लष्करही आले तरीही काश्मिरातील दहशतवाद मोडून काढू शकत नाही’, ‘कश्मीर तुम्हारे बाप का है क्या?’, अशी एक ना दोन अनेक वादग्रस्त विधाने केली. यातूनच फारुख अब्दुल्लांची पाकप्रेमी आणि फुटीरधार्जिणी मानसिकता दिसून येते. आपल्या याच मानसिकतेतून काश्मिरातल्या मुलांनी हातात बंदुका घेतल्याचे, लष्करी जवानांवर गोळीबार करू धजावल्याचे अब्दुल्ला मात्र विसरले. त्यामुळे फारुख अब्दुल्लांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बेछूट आरोप करण्याऐवजी स्वतःच आत्मपरीक्षण करावे, आपण गेल्या कित्येक वर्षांत काश्मीरला धुमसते ठेवण्यात कसा आणि किती हातभार लावला, ते पाहावे.
पाकपुरस्कृत दहशतवादाचे भूत काश्मीरमध्ये प्रदीर्घ काळापासून धुमाकूळ घालताना दिसते. केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून मात्र या पिसाटलेल्या भुताच्या मुसक्या आवळण्याच्या कारवायांनी जोर पकडला. परिणामी, स्थानिक युवकांच्या हाताला रोजगार न देता शस्त्र देण्याचा खेळ खेळणाऱ्या मंडळींच्या अंगांगाला मिरच्या झोंबल्या. याला उत्तर म्हणून दहशतवाद्यांना संरक्षण देण्यासाठी काश्मिरी युवकांच्या हातात दगड ठेवण्यात आले, जे त्यांनी देशाच्याच लष्करावर भिरकावले. आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत काश्मीरसाठी, काश्मिरी जनतेसाठी कोणतेही भरीव कार्य न करणाऱ्या अब्दुल्लांचेच राजकारण यामागे आहे, हे नक्की. त्यामुळे काश्मिरी मुलांच्या हातात बंदुका असो वा दगड देण्याचे पाप आपणच केल्याचे फारुख अब्दुल्लांनी लक्षात घ्यावे, उगाचच मोदी वा भाजपवर बिनबुडाचे आरोप करू नये. शिवाय काश्मीर प्रश्न भारत आणि पाकिस्तानमधला असताना फुटीरतावादी हुर्रियत कॉन्फरन्सशी बोलणी करण्याची वकिलीही अब्दुल्ला करत आले व कालपरवाही ते तसे बोलले. पण, ज्यांना पाकिस्तानच्या मदतीवरच तुकडे तोडावे लागतात, त्या फुटीरतावाद्यांशी भारत सरकारने का चर्चा करावी? फुटीरतावादी हे काही काश्मिरी जनतेचे अधिकृत प्रतिनिधी नाहीत, ना त्यांच्यामागे काही जनाधार आहे. अशा लोकांची तळी अब्दुल्ला का उचलून धरतात? यातूनच या दोघांतले मतलबी संबंध सहज कळून येतात. दुसऱ्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वांचे हृदय जिंकण्याबाबत... नरेंद्र मोदींनी कोट्यवधी देशवासीयांचे हृदय याआधीच जिंकल्याचे फारुख अब्दुल्लांनी सर्वप्रथम लक्षात घ्यावे. त्यामुळेच आज मोदी हे प्रत्येकाला आपले आदर्श वाटतात. पण फारुख अब्दुल्लांचे काय? त्यांनी आपल्या उभ्या आयुष्यात निदान काश्मिरी नागरिकांचे तरी हृदय जिंकले का? काश्मिरी नागरिकांच्या जखमांवर फुंकर घातली का? काश्मिरी पंडितांचे अश्रू पुसले का? की पाकिस्तानचे हृदय जिंकता जिंकता काश्मिरी नागरिकांना हृदय असल्याचेच ते विसरून गेले? हे आधी सांगावे
No comments:
Post a Comment