भामटा माणूस कसा ओळखावा, त्याचे नमुने सध्या बघायला मिळत आहेत. कालपर्यंत ज्या देशात श्रीमंती मिरवली आणि इथल्या पैशावर चैन केली, त्याच देशाविषयी आज शंका घेणे; हा नुसता बेशरमपणा नसतो, तर शुद्ध भामटेगिरी असते. भारतीय बँकांना हजारो कोटी रुपयांना गंडा घालून परदेशी पळून गेलेल्या नामवंत भामट्यांची ही कथा आहे. नीरव मोदी, त्याचा मामा चोक्सी व किंगफिशरचा गुलछबू मालक विजय मल्ल्या, अशी त्यांची नावे आहेत. आधीच्या दहा-बारा वर्षांत या लोकांनी खोट्या व्यवहारांतून विविध भारतीय बँकांकडून हजारो कोटी रुपये कर्ज रूपाने उचलले आणि ते फेडता येत नाहीत, तेव्हा त्यांनी देश सोडून पळ काढलेला आहे. वास्तविक, त्यांची भामटेगिरी संगनमताने झालेली आहे. कारण, त्यांच्या कर्जासाठी कुठलेही तारण घेतले गेले नव्हते किंवा वेळोवेळी त्यांच्या कर्जाची झाडाझडतीही घेतली गेली नव्हती. साहजिकच, जुन्या कर्जाची फेड करण्यापूर्वी त्यांना नवी कर्जे दिली गेली आणि बुडीत जाण्याची हमी असतानाही पुन्हा कर्जे देण्यात आलेली होती. त्यांच्या बनवेगिरीला राजकीय आश्रय होता, हेही आता लपून राहिलेले नाही. दरम्यान त्यांचे ‘मायदेशी’ सरकार बदलले, इतकाच काय तो फरक पडलेला आहे. नव्या सरकारने त्यांचे चोचले बंद केले आणि नवी बुडीत कर्जे नाकारून आधीच्या कर्जाची फेड करण्याचा तगादा लावला. तेव्हा या भामट्यांना मायदेश असुरक्षित आहे, त्याचा अचानक शोध लागला. त्यांनी मायदेश सोडून पळ काढला आणि आता परदेशी त्यांना खूप सुरक्षित वाटते आहे. कारण, भारतीय कायदा त्यांना थेट अटक करू शकत नाही, की उचलून गजाआड डांबू शकत नाही. मग त्यांना मानवाधिकार आठवले आहेत. भारतातील तुरुंग कसे अमानुष आहेत, त्याच्या रसभरीत कहाण्या परदेशी न्यायालयात सांगून ते आपल्या पापावर पांघरूण घालण्याची नाटके रंगवू लागले आहेत. आधी विजय मल्ल्याने ब्रिटिश न्यायालयात भारतातले तुरुंग रानटी असल्याचा दावा केला होता. नीरव मोदीने आता आपले पुतळे होळीच्या दिवशी जाळल्याचे सांगून आपल्या जीवाला भारतात धोका असल्याचे म्हटलेले आहे. खरेच हे नामवंत पांढरपेशा भामटे सामान्य पाकीटमारापेक्षा किती अधिक बदमाश असतात ना? कारण, सामान्य गुन्हेगार पकडला गेल्यास निदान लोकांच्या हातची मारहाण सहन करतो; पण हे भामटे राजरोस कायदेशीर कागदपत्रे बनवून बड्या बड्या बँकांनाही गंडा घालत असतात. तेव्हा त्यांना त्या बँकेत जमा झालेला पैसा याच गरीब, असुरक्षित देशातली कष्टाची कमाई असल्याचे माहीत नसते काय? पैसे लुटताना त्यांना हा देश सुरक्षित वाटला होता; पण जिथे आज सुरक्षित वाटते आहे, तेथे जर त्यांनी अशीच लूट केली असती, तर त्यांना तुरुंंगात सडायला इतका वेळ लागला नसता आणि सुरक्षितता कशाला म्हणतात, ते समजू शकले असते.
नव्या सरकारने जुनी फुगलेली बुडीत कर्जे व दिवाळखोर कंपन्यांना वसुलीसाठी तगादा लावला आणि ही पळापळ सुरू झाली. नीरव मोदी वा मल्ल्याला कशाला पळू दिले जाते, असा सवाल विचारला जातो. पण, साध्या नक्षली संशयितांना पकडताना कोर्टाकडून किती अडचणी उभ्या केल्या गेल्या, तेही बघितले पाहिजे. सामान्य गुन्हेगाराप्रमाणे अशा भामट्यांना कायदा हात लावू शकत नाही, ही भारतीय कायद्याची मोठी अडचण आहे. तत्काळ त्यांचे एकाहून एक नामवंत वकील फौज घेऊन अपरात्रीही न्यायालयाला उठवून कामाला लावतात. कायद्याला नाक मुठीत धरून शरण आणले जाते. नक्षलवादी संशयितांना अखेरीस पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेच; पण त्यात दोन महिने कोर्टाच्या पायर्या झिजवाव्या लागल्या होत्या. मल्ल्या किंवा नीरव मोदी यांच्या बाबतीत किती मोठी जाणत्या वकिलांची फौज कोर्टात उभी ठाकली असती, त्याची नुसती कल्पना करावी. माजी अर्थमंत्री चिदम्बरम यांच्याही बाबतीत त्याच सरकारी यंत्रणा काम करीत आहेत; पण त्यांना कोर्टाच्या किती नाकदुर्या काढाव्या लागत आहेत? ते आपल्यासमोर आहे. इतकी मोठी सवलत मल्ल्या, नीरवला मिळू शकली, तशी पाश्चात्त्य देशांत, अमेरिका-ब्रिटनमध्ये त्यांना नक्कीच मिळाली नसती. ती सवलत घेऊन त्यांनी इथून पळ काढला आणि आता परदेशी बसून ते भारतीय कायद्याला वाकुल्या दाखवीत आहेत. अशीच भामटेगिरी तिथे त्यांनी केली असती, तर त्यांना कुठले संरक्षण मिळणार होते? या प्रकारचे गुन्हे केल्याने अमेरिकेत अनेक नामवंत उद्योगपती व व्यावसायिक तुरुंगात खितपत पडलेले आहेत. उशिरा का होईना, याही लोकांना भारतीय तुरुंगाची हवा खायची वेळ येणारच आहे. आता भारतीय कोर्टात त्यांना इतके संरक्षण मिळणार नसल्याची खात्रीच त्यांना भयभीत करीत आहेत; पण बेशरमपणा कशाला म्हणायचे? ज्या देशात अजमल कसाब किंवा याकुब मेमन यांनी शेकडो निरपराधांना अकारण ठार मारले, त्यांनाही इथे कायद्याने व कोर्टाने संपूर्ण संरक्षण दिले. त्या देशातले तुरुंग वा कायद्यात सुरक्षितता नसल्याचे दावे बेशरमपणा आहे. ज्या पोलिस खात्याचे तीन बडे अधिकारी कसाबकडून मारले गेले, त्याला इजा होऊ दिली नाही आणि कायद्याच्या कसोटीवर गुन्हेगार ठरवून फाशीची शिक्षा मिळण्यापर्यंत प्रतीक्षा केली. त्या देशाच्या कायद्याला असुरक्षित ठरवण्याचे नाटक, ही निखळ भामटेगिरी आहे. देश लुटायला मिळालेली मोकळीक त्यांना सुरक्षित वाटली आणि कायदा हात लावायला पुढे आल्यावर त्यांना असुरक्षित वाटते, हा निर्लज्जपणा झाला. अर्थात, चहूकडून त्यांची कोंडी झालेली आहे. संपत्ती जप्त होत आहे आणि पंतप्रधान मोदींनीही जी-20 देशांच्या परिषदेत अशा गुन्हेगारांच्या बाबतीत दयामाया नको म्हटल्याने ते अधिक विचलित झालेले असावेत.
No comments:
Post a Comment