बांगलादेशाची सत्ता पुन्हा एकवार शेख हसीना यांनाच-
तीही ३०० पैकी २८८ जागा सत्ताधारी आघाडीला अशा प्रचंड बहुमताने- देणारा निकाल
तेथील विरोधी पक्षीयांनी संशयास्पद ठरविला नसता तरच नवल. याहीपैकी हसीना यांच्या
अवामी लीगने २६८ जागा जिंकल्यामुळे बांगलादेशात ‘एकपक्षीय लोकशाही’
असल्याचे चित्र कायम झाले आहे. निवडणुकीच्या प्रचारकाळात कोठडीतच
डांबले गेलेले देशभरातील १५०० विरोधी पक्षीय कार्यकर्ते आता एक वेळ सुटतील,
पण विरोधकांची फेरनिवडणुकीची मागणी मान्य होणे अशक्य आहे. राजकीय
हिंसाचारातील बळींची संख्या २१ वर जाऊनही निवडणूक जणू शांततेतच पार पडल्याच्या
थाटात वावरणारे तेथील निवडणूक आयुक्त आणि ‘हिंसाचाराचा फटका
आम्हालाच बसला’ या सत्ताधाऱ्यांच्या म्हणण्याला प्रसिद्धी
देणारी माध्यमे असे आलबेल वातावरण असताना विरोधकांची मागणी हास्यास्पदच नव्हे तर
थेट ‘लोकशाहीविरोधी’सुद्धा ठरविली गेल्यास
नवल ते काय? आपण का हरलो याविषयीचे आत्मपरीक्षण ‘शेख हसीना यांना विरोध’ या एकाच मुद्दय़ासाठी एकत्र
आलेले विरोधकांचे कडबोळे करील तेव्हा करील.. पण शेख हसीनाच पुन्हा का जिंकल्या,
याचा विचार जगातील -किमान त्यांच्या पुनरागमनामुळे हायसे वाटलेल्या
भारतासारख्या अनेक देशांतील- लोकशाहीप्रेमी नागरिकांनी तरी करायला हवा. ‘पर्याय नाही’ हा प्रचार तर हसीना यांच्या बाजूने
होताच, शिवाय हसीना यांच्या कार्यकाळात बांगलादेशची केवढी
प्रगती झाली, मानवी विकास निर्देशांक कसा वाढला हा जगभर
कौतुकाचा ठरलेला विषयही मतदारांवर परिणाम घडविणारा होता. विरोधकांनी आपल्यापुढे
उभेच राहू नये, इतपत दमनशाहीदेखील याच कार्यकाळात सुरू होती.
तेव्हा विरोधकांच्या म्हणण्यात समजा तथ्य असले आणि समजा ही निवडणूक गैरप्रकारांनीच
जिंकण्यात आली असली, तरी समजा गैरप्रकार झाले नसते तर हसीना
हरल्याच असत्या असे नव्हे. हसीना यांनी सत्तेकडून सत्तेकडे प्रवास केला, एवढेच आता खरे. ही सत्ता म्हणजे दमनशाही, असे विरोधक
मानतात आणि कदाचित बांगलादेशी सामान्यजनांनाही ते पटत असेल. पण शेजारील देशांनी
-विशेषत: भारताने- हसीना यांच्या विजयाचे स्वागतच केले आहे, ते
का? दक्षिण आशियाई देशांमध्ये कितीही अंतर्गत अस्वस्थता असो,
त्या देशांतील धोरणकर्ते भारतमित्र असणे, हे
भारताचे दक्षिण आशियातील स्थान -आणि सुरक्षादेखील- टिकविणारे ठरते, हे यामागचे कारण. आपल्या सहाही शेजाऱ्यांना चीन कहयात ठेवू पाहात असताना
मालदीव, श्रीलंका व भूतान येथील सत्तापालट आपल्या दृष्टीने
विशेष स्वागतार्ह ठरतात. केवळ ‘वन बेल्ट वन रोड’ प्रकल्पासाठी बांगलादेशातील चिनी गुंतवणूक ३० अब्ज डॉलरवर असेल, तर भारताने साडेचार अब्ज डॉलरची कर्जरूपी मदत बांगलादेशला देऊ केली आहे.
मात्र चीनच्या आहारी न जाण्यासाठी भारताशी सख्य टिकवायचे आणि मुस्लीम देश म्हणून
सौदी अरेबियाकडूनही मदत घ्यायची, असे शेख हसीना यांचे धोरण
दिसते. चीनकडून भले दोन-दोन पाणबुडय़ा घेऊ, पण नौदलाचा
संयुक्त सराव भारताबरोबरच करू, असे या धोरणाचे दोनच
महिन्यांपूर्वी दिसलेले रूप. तेव्हा बांगलादेशात भले लोकशाही जळत असेल, शेजारी देश असलेल्या भारताला मात्र बांगलादेशातील स्थैर्याची ऊबच मिळणार
आहे.
जनतेला
पोट असतं, समूहाने देश म्हणून किंवा नगर म्हणून सोबत राहणे हे सुरक्षा आणि
हितरक्षण, सुख यासाठीच असतं. एकदा पोट भरलं की मग कला,संस्कृती, राजसत्तेची प्रकृती असे सारे आठवत असते. त्यामुळे
जनता कुठलीही असो, त्यांना सुशासन आणि सुरक्षित असे
वातावरण हवे असते. राष्ट्र म्हणून हितरक्षणासाठी
राज्यकर्त्यांनी वेळीच कठोर पावले उचलली तरीही ती जनतेला हवी असतात. शस्त्रक्रिया करणार्या डॉक्टरच्या हातातही चाकूच
असतो, मात्र त्यामुळे दुखणे बरे होणार असते, हीच पेशंटची भावना असते. बांगला देशात शेख
हसिना यांनी चौथ्यांदा विजय मिळविला आहे. त्यांच्या
अवामी लीग पार्टीला सार्वत्रिक निवडणुकीत 300 जागांपैकी 266 जागांवर विजय मिळाला आहे, तर त्यांच्या सहकारी
पक्षाने 21 जागा मिळवल्या आहेत. विरोधी आघाडी नॅशनल युनिटी फ्रंटला अवघ्या 7 जागांवरच विजय मिळाला आहे. हा विजय पुन्हा
जागतिक व्यवस्थेत होणार्या बदलाकडे निर्देश करणाराच आहे. जागतिकीकरणाची लाट आता ओसरते आहे आणि पुन्हा एकदा आपले राष्ट्र आधी, हा विचार पुढे येतो आहे.
जर्मनी
असो, अमेरिका असो की मग फ्रान्स, जपान, चीन... राष्ट्रविचार
आधी केला जातो आहे. देश म्हणून सर्वार्थाने अस्तित्व
आणि अस्मिता कायम राहील तरच विश्व असेल... ‘हम है तो खुदा भी
है!’ हाच तो भाव आहे. बांगला
देशात शेख हसिनांवर, त्या हुकूमशाहीकडे वाटचाल करत आहेत, असा आरोप तिथल्या विरोधकांनी केला होता. त्याकडे
जगाचेही लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला होता. भावनेचे
अन् खोट्या अस्मितांचे राजकारण करणार्यांची सत्ता अनागोंदी आणि भ्रष्टाचाराने बरबटलेलीच असते आणि सत्ता हातची
गेल्यावर त्यांना मग लोकशाहीची अन् समाज म्हणून मूल्यांची
वगैरे आठवण होते. शिस्त पाळावी लागली की प्रशासक कटू
वाटू लागतो. त्याच्या विरोधात, तो हुकूमशहा असल्याच्या अन् लोकशाहीव्यवस्था
मोडीत काढून एकछत्री राजवटीकडे त्याची वाटचाल सुरू असल्याचा कांगावा केला जातो. शेख हसिनांच्या बाबतही तेच झाले. त्यांची
गेल्या दशकभर बांगला देशात राजवट आहे. त्यांच्या
आधीच्या बेगम खलिदा झिया यांच्या बांगला देश नॅशनल पार्टीची साधारण दशकभर राजवट
होती. त्यांच्याकडून देशाची सूत्रे स्वीकारताना शेख
हसिनांच्या हातात काय आले? अत्यंत बजबजपुरी, अनागोंदीने गैरव्यवस्थांचा बाजार झालेला अन् दारिद्य्राच्या
छायेतच म्हणावे लागेल अशी स्थिती असलेला देश. जगातील
दरिद्री देशांमध्ये पहिल्या पाचात बांगला देशचा क्रमांक होता. शासकीय स्तरावर काम करण्याची पद्धत म्हणजे भ्रष्टाचार हीच झाली होती. खलिदा झिया यांचे चिरंजीव तारिक रेहमान यांच्या हाती वजन पडल्याशिवाय सरकारी
पातळीवरची कुठलीही कामे होतच नव्हती. भ्रष्टाचाराचेही
असे केंद्रीकरण करण्यात आले होते. अमेरिकेच्या
विकिलिक्स अहवालातही तारिक रेहमान यांच्या या कारनाम्यांचा ठसठशीत उल्लेख आहे.
हे
असे सारेच पराकोटीला गेल्यावर अन् खलिदांना
विरोध करणाराच कुणी नाही, असे वाटत असताना, शेख हसिना यांनी त्यांच्या विरोधात मैदान गाठले. एकतर बांगला देशची जनता खलिदांच्या या भ्रष्टाचारी राजवटीने कंटाळली होती. पर्याय नव्हता अन् तो शेख हसिनांनी दिला. बाई रागीट असली, जुळवून घेणारी नसली तरीही
चालते; पण ती चवचाल नको. तसेच
सत्ताधारी कडक असले अन् वेळी त्यांचे काही निर्णय कटू
वाटत असले, तरीही भविष्यातील लाभाचा विचार करता ते
चालून जाते. मात्र, सत्ताधारी
भ्रष्टाचारी नको असतात. जनतेच्या नैतिक कल्पनांत ते
बसतच नाही. शेख हसिनांना म्हणून खलिदांच्या विरोधात
जनमत तयार करणे कठीण गेले नाही. कारण जनतेत संताप होताच, तो धारण करणारा पर्याय हवा होता. तो शेख
हसिनांच्या रूपात मिळाला.
दहा वर्षांपूर्वी त्या सत्तेत आल्या. असे सत्तेत येणे तसे सोपे असते. विद्यमान सत्ताधार्यांच्या विरोधातील जनक्षोभाच्या अस्त्रावर स्वार होऊन सत्तेत येणे सोपे असते,मात्र त्यानंतर आधीच्या सत्ताधार्यांपेक्षा वेगळे वागणे कठीण असते. व्यवस्थापरिवर्तनाचेच आव्हान असते. अशा वेळी जनता या कठोर उपचारांना पाठिंबा देईलच,याची शाश्वती नसते. कारण भावनेच्या आभासी विश्वात विरोधक त्यांना नेतात आणि व्यवस्थेला अनागोंदीची छानपैकी सवय लागलेली असतेच. गंमत म्हणजे त्या विरोधात ओरड करणारी जनताही त्या व्यवस्थेचाच एक भाग असते. तरीही शेख हसिनांनी त्यांच्या राजवटीत बांगला देशचे रूपडेच पालटले, असे म्हणायला हरकत नाही. त्यांच्या सगळ्याच वर्तणुकीचे समर्थन करता येत नाही. तरीही मुस्लिम देशातील सत्ताधार्यांच्या वागणुकीचा उग्र दर्प त्यांच्यात नव्हता. त्यांनी राजकीय विरोधकांवर सूड उगविलाच.
आपल्या
विरोधात कुणी बोलणार नाही, याची त्यांनी काळजी घेतली. प्रशासन कडक केले. त्यांच्या राजवटीत
भ्रष्टाचार झालाच नाही असे नाही, मात्र त्याला त्यांनी
आळा घातला. जी काय प्रकरणे झाली त्याचा बभ्रा होणार
नाही, याची काळजी घेतली. त्यामुळे
आता देशातल्या सार्याच विरोधकांनी शेख हसिना यांना खाली
खेचायचे, या निर्धाराने आघाडी केली होती. त्यांच्या प्रचाराचा एकच मुद्दा होता आणि तो म्हणजे शेख हसिना यांची
दमनशाही. त्या हुकूमशहा आहेत.लोकांनी
काय खावे- प्यावे, पाहावे
आणि काय करावे, हेदेखील त्याच ठरवितात. माध्यमांची मुस्कटदाबी होत आहे, असे मुद्दे या
निवडणुकीत मांडले गेले.हिंसाचारदेखील घडविला गेला. मात्र, गेल्या दशकात बांगला देश कुठवर आला, हे जगाच्या नकाशावर आहे.
मानव्य
विकास निर्देशांकात डोळे विस्फारून पाहावे (किमान
पाकिस्तानने तरी), अशी प्रगती बांगला देशने केली आहे. तीही सतत पाच वर्षे. बांगला देश हा गरिबांचा
म्हणूनच ओळखला जातो. आता तिथे निम्न मध्यमवर्गीय आणि
मध्यमवर्गीयांची संख्या लक्षणीय आहे. रोजगार वाढला आहे. कृषिक्षेत्रात प्रगती झाली आहे. त्यामुळे
शेतीचे उत्पादन वाढले आहे. वस्त्रनिर्मितीत बांगला देश
आज आघाडीवर आहे. भारतातील अनेक बड्या वस्त्र कंपन्यांना
अन् जगातल्या रेडिमेड ब्रॅण्डस्ना
बांगला देशातूनच मदत होते. एकतर स्वस्त आणि कुशल मजूर
आणि इतर संसाधनांची उपलब्धता, शेख हसिनांनी केलेली ‘मेक इन बांगला’ची चळवळ यामुळे उद्योग अन् रोजगार वाढले. महिला सक्षमीकरणातही त्या
आघाडीवर राहिल्या. कट्टरवाद्यांचे दमन झुगारले अन् बचत गटांच्या माध्यमातून महिला आर्थिक स्वावलंबीदेखील झाल्या.
हे
सारे घडवून आणताना विरोधकांचे अडथळे होणारच. विरोधकांना
मात्र त्यांनी चेंदूनच काढले. खलिदांना तुरुंगात टाकले. काही ठिकाणी रूढ लोकशाही मार्ग त्यांना आखरते घ्यावे लागले. थोडी कडक भूमिका घ्यावी लागली. त्या कडव्या
झाल्या नि प्रथमदर्शनी त्या हुकूमशहाच वाटू लागल्या. त्यांना
विरोधकच उरलेले नाहीत, असे वातावरण होते. अशात तुरुंगवासी बेगम झिया या पक्षाघाताच्या आजाराने अपंग असल्याच्या
चर्चा झडल्या. त्यांचे दिवटे चिरंजीव रेहमान हे
अटकेच्या भीतीने लंडनला फरार आहेत. अशा परिस्थितीत
विरोधकांचे नेतृत्व कमाल हसन या विधिज्ञाकडे होते. ‘जातिया
औक्य फ्रंट’ या नावाने विरोधकांच्या आघाडीत तब्बल 20 पक्ष होते, तरीही शेख हसिना दणक्यात निवडून
आल्या...
हे
सगळेच आपल्याही आसपास घडते आहे आणि हे राजकीय वर्तमान जुळेच आहे, असे वाटू लागले असल्यास थोड्याफार फरकाने तो निव्वळ योगायोग नाही...पुढचे भाष्य आताच करण्यात घाई होईल!