Total Pageviews

Saturday, 5 November 2011

FAILURE POLICING IN MUMBAI

कीनन आणि रूबेन यांच्यावर ओढवलेला प्रसंग उद्या कोणावरही ओढवू शकतो, याच भावनेने संपर्कमाध्यमांवर सामाजिक संघटनांपासून संवेदनशील नागरिकांनी एकत्र येऊन जागर सुरू केला आहे. मात्र, तो पोकळ मेणबत्तीबाज जागर ठरू नये.
जगातील सात अब्जावे अर्भक एक मुलगी म्हणून भारतातच जन्माला यावे, यासारखे त्या मुलीचे दुसरे दुर्भाग्य नाही. परस्त्रीला मातेसमान आणि स्त्रीला देवतेसमान स्थान देण्याचा दावा करणा-या आपल्या देशात दोन महिन्यांच्या मुलीपासून सत्तर वर्षाच्या वृद्धेपर्यंत सगळ्यांकडेच केवळ देहभोगाचे एक साधन म्हणून पाहणा-या कामांध विकृतांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. छेडछाड, अत्याचार, हत्या असे गुन्हे वारंवार करण्याचे निर्ढावलेपण या घटकांमध्ये निष्क्रिय पोलिस यंत्रणा आणि दुबळ्या कायद्यांमुळे बळावले आहे. अंधेरीच्या आंबोली परिसरात 20 ऑक्टोबर रोजी घडलेल्या घटनेत तर जितेंद्र राणा या विकृताने त्याही पुढचे पाऊल गाठले. दोन युवतींची छेड काढल्याबद्दल त्याला हटकणा-या कीनन सँटोस आणि रूबेन फर्नाडिस या दोघा मित्रांवर जितेंदरने त्याच्या टोळक्यासह हल्ला चढवला. त्या दोघांवर तलवारीचे वार करून, चाकूने भोसकून ठार केले. संवेदनशील मनांना, विशेषत: कीनन आणि रूबेन यांच्या वयाच्या तरुणाईला या दुर्दैवी घटनेने पुरते हादरवले आहे. इंटरनेटवरील संवाद-कट्टय़ांवर शोकाबरोबरच संतापाचेही तीव्र सूर उमटू लागले आहेत. एवढय़ा संवेदनशील आणि अन्यायाच्या प्रतिकारासाठी व्हर्च्युअल जगात एकवटणा-या या महानगरात प्रत्यक्षात असा हल्लाच व्हायला नको होता. पण, तो झाला तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या शंभराहून अधिकजणांनी हल्लेखोरांना रोखण्याचे धाडस दाखवले नाही. कीननच्या मैत्रिणीचा मदतीचा धावा उपस्थितांच्या बधीर कानांवर पडलाच नाही किंवा तो त्यांनी कानामनावेगळा केला. अशी ही अपवादात्मक घटना नाही. दिवसाढवळय़ा भरगर्दीत अशा प्रकारचे हल्ले होतात, तेव्हा आसपासचा जमाव जणू थिजतो. समाजाचे हे सामूहिक बघेपणच गुंडपुंडांच्या पथ्यावर पडते आहे. पोलिस-गुंडांचा छुपा-उघड दोस्ताना, आरोपींऐवजी साक्षीदारालाच नकोसे करून सोडणारा पोलिसी खाक्या आणि स्वत:चा जीव धोक्यात न घालण्याची नैसर्गिक ऊर्मी यातून हा बघेपणास्वीकारला जातो, हेही लक्षात घ्यायला हवे. छेडछाडीच्या बहुतेक घटनांमध्ये लावली जाणारी कलमे दुबळी असल्यामुळे आरोपी सहज जामीनावर सुटतात. बलात्काराच्या खटल्यातूनही आरोपी सहीसलामत बाहेर येतात. तेच पोलिसांबरोबर चहापाणीघेतात, हसत-खेळत कोर्टाच्या आवारात फिरतात, मोठा सन्मान झाल्यासारखे हात उंचावून निर्लज्जपणे दात दाखवतात; फिर्यादींना बाहेर आल्यावर बघतो तुझ्याकडे, मुकाट तक्रार मागे घे’, असे धमकावण्याची मजल गाठतात. समाजाची बघेपणाची नकारात्मक मानसिकता या अनुभवांतून तयार होते. मात्र, हा बघेपणाआता आपल्याच मुळावर येऊ पाहतो आहे. आंबोलीच्या घटनेत आपत्कालीन साह्याच्या क्रमांकावर फोन वेळेत घेतला गेला नाही, पोलिसांनी असंख्य प्रश्न विचारण्यात वेळ वाया घालवला, वेळेत मदत मिळाली नाही, त्यामुळे कीनन आणि रूबेनचा जीव गेला, असा थेट आरोप त्यांच्या मित्रांनी केला आहे. उगाच कशाला भानगडीत पडायचे, ही सामान्यजनांची वृत्ती समजू शकते; पोलिसांनीही तीच वृत्ती दाखवावी? त्यांची नियुक्ती अशा भानगडींमध्ये सत्वरतेने पडून त्या मिटवण्यासाठी आहे, याची आठवण यानिमित्ताने करून द्यायला हवी. पोलिस कैवार घेत नाहीत आणि आगलावी तोंडपाटीलकी करत फिरणारे राजकीय नेते सामाजिक आरोग्य बिघडवणा-या या विकृतांबद्दल चकार शब्द उच्चारत नाहीत, त्यांना सज्जड इशारे देत नाहीत. कीनन आणि रूबेन यांच्यावर ओढवलेला प्रसंग उद्या कोणावरही ओढवू शकतो, याच भावनेने संपर्कमाध्यमांवर सामाजिक संघटनांपासून संवेदनशील नागरिकांनी एकत्र येऊन जागर सुरू केला आहे. मात्र, तो पोकळ मेणबत्तीबाज जागर ठरू नये. बघेपणा सोडून संघटित ताकद दाखवल्याशिवाय रस्त्यावरची स्त्री ही मनोरंजनाची वस्तू समजणाऱ्या विकृतांना जरब बसणार नाही. कीनन आणि रूबेन यांनी मैत्रिणीच्या आत्मसन्मानासाठी प्राणांची किंमत मोजली, हे त्यांना आदरांजली वाहताना कायम लक्षात ठेवले पाहिजे. तरच ती आदरांजली खरी म्हणायची

No comments:

Post a Comment