Total Pageviews

Friday 4 November 2011

manoj sanap & his love for army

सैनिक हो तुमच्यासाठी
सरकारी सुपरस्टार
हर्षदा परब
कॉलेजात असताना एनसीसी कॅडेट आर्मीबद्दलचं प्रेम वाढवलं... त्यानंतर कॅप्टन विनायक गोरेचा झालेला मृत्यू आणि त्यावर त्याच्या आईने लिहिलेला लेख... सोमय्या कॉलेजमधल्या एका युवकाचं भावविश्व हादरून गेलं...त्यावेळी कॉलेजच्या एकपात्री अभिनय स्पर्धेत त्याने शहीद कॅप्टन विनायक गोरे या नावाचा स्वरचित उतारा सादर केला... स्पर्धेसाठी रचलेल्या उतार्‍याचे अर्ध्या तासाचे एकपात्री कार्यक्रम तो तरुण आज करतो...इतकंच नाही तर आर्मीबद्दलचे प्रेम आणि या शहीद जवानाला श्रद्धांजली वाहण्यासाठी त्याने सुरू केलेल्या या एकपात्री कार्यक्रमाचे तीन हजारांहून अधिक प्रयोग झाले आहेत...
माहिती संचालक विभागात सहायक संचालक पदावर काम करणारे मनोज सानप आजही एका डोळ्यात आर्मीचं स्वप्न घेऊन ‘शहीद कॅप्टन विनायक गोरे’ हा एकपात्री कार्यक्रम करतात. मिळेल ते निमंत्रण स्वीकारून कोणत्याही मानधनाशिवाय हा कार्यक्रम करतात. मी फार मोठा अभिनेता नाही किंवा त्याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मी घेतलेलं नाही, पण तरीदेखील आर्मीच्या प्रेमापोटी मी हा कार्यक्रम करतो, सानप सांगतात.
बिल्डिंगच्या पूजेला त्यांनी हा एकपात्री कार्यक्रम सादर केला. त्यानंतर आसपासच्या बिल्डिंग, लोकल शाळा, कॉलेज यामध्ये हा कार्यक्रम होऊ लागला. कार्यक्रमाला मिळणारा प्रतिसाद आणि कार्यक्रमाची मागणी वाढली. दरम्यान, सानप यांची सरकारी सेवेत भरती झाली. सरकारी नोकरीतील कामाच्या व्यापामुळे आर्मीत जाण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं, पण आर्मी मॅन होण्याची त्यांची इच्छा प्रबळ होती. सरकारी कार्यक्रमात एकपात्री अभिनय सादर करणार्‍या सानप यांनी शिवाजी पार्क येथे भरविल्या जाणार्‍या भक्ती बर्वे करंडक स्पर्धेत आग्रहाखातर भाग घेतला आणि त्यात त्यांना प्रेक्षकांच्या आग्रहाखातर विशेष पारितोषिक देण्यात आलं.
दरम्यान, आर्मीत भरती होण्याचं वय आणि संधी हुकल्यामुळे आर्मीचं स्वप्नं अपूर्ण राहू नये यासाठी टेरिटोरियल आर्मीचे ऑप्शन त्यांनी शोधून काढलेे. ‘शहीद कॅप्टन विनायक गोरें’च्या एकपात्री कार्यक्रमाबरोबर टेरिटोरिअल आर्मीची माहिती द्यायला सुरुवात केली. त्यामुळे देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा असलेले अनेक तरुण आणि त्यांचे पालक याबाबत त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊ लागले.
केवळ आर्मीच्या प्रेमापोटी त्यांच्यातील अभिनयगुण त्यांनी जोपासले. या कार्यक्रमातून ‘एनर्जी’ मिळते, देशासाठी काहीतरी करण्याचं स्फुरण मिळतं असं ते मोठ्या अभिमानाने सांगतात. नेहरू युवा केंद्र, पोलीस ट्रेनिंग सेंटर, पोलीस मेळावे मिळेल ते निमंत्रण स्वीकारत आपल्या या एकपात्री कार्यक्रमातून अधिकाधिक तरुणांना सैन्याकडे वळविण्याचा विडा त्यांनी उचललाय जणू.
इतर लोक याला फुकटचा धंदा म्हणतात, पण आई — वडिलांनी कधी यावर आक्षेप घेतला नाही. उलट वडीलही त्यांच्या ओळखीच्या ठिकाणी मनोज यांच्या कार्यक्रमाची चर्चा करतात. त्यांनी म्हणून रोड ते स्टेज, माईक असो वा नसो सानप कार्यक्रम करतात...

...हेच सगळ्यात मोठ्ठं बक्षीसएका गावात सानप यांचा कार्यक्रम झाल्यानंतर एका नव्वद वर्षांच्या रिटायर्ड झालेल्या सैनिकाने सानप यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. भेट झाल्यानंतर त्यांनी सानप यांना शाबासकी दिली तसंच तरुणांना या क्षेत्राकडे वळविण्याकरिता त्यांच्या प्रयत्नाबद्दल त्याने धन्यवाद आणि शाबासकी दिली. आजवर मिळालेल्या अनेक बक्षिसांमध्ये हेच सगळ्यात मोठ्ठं बक्षीस असल्याचे मनोज सानप भावूक होऊन सांगतात.

No comments:

Post a Comment