या देशात कायदे वाकवले जातात, घटना बदलली जाते व तपासात घोटाळे केले जातात ते फक्त मुसलमानांच्या लांगूलचालनासाठीच.
याचसाठी केला होता अट्टहास!
मालेगावचे भाग्य!मालेगाव बॉम्बस्फोटांस पाच वर्षे उलटून गेली, पण अधूनमधून मालेगावच्या नावाने लहानसहान ‘स्फोट’ होत असतात. मालेगाव स्फोटांतील सात आरोपींना आता सरकारने सोडले आहे व त्याबद्दल महाराष्ट्रातील कॉंग्रेस राज्यकर्त्यांनी ‘आपणच एकमेव मुसलमानांचे तारणहार आहोत’ असा प्रचार आणि प्रसार सुरू केला आहे. महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विभागाचे मंत्री नसीम खान यांनी या आरोपीच्या सुटकेचे सर्व श्रेय सोनिया गांधी आणि पृथ्वीराज चव्हाणांना देऊन टाकले. मालेगाव स्फोटांतील हे जे आरोपी सोनिया किंवा पृथ्वीराजांच्या अथक प्रयत्नाने सोडण्यात आले ते फक्त मुसलमान आहेत म्हणून की ते खरोखरच निर्दोष आहेत म्हणून त्यांची सुटका केली गेली? त्यांच्या विरुद्ध पुरावेच नसल्याने त्यांना सोडले आहे का? आपला कायदा आणि न्यायव्यवस्था सांगते, शंभर अपराधी सुटले तरी चालतील, पण एकाही निरपराध्यास शिक्षा होता कामा नये. या न्यायाने मालेगावचे सात अपराधी सुटले आहेत, असे आम्ही मानत नाही. मालेगाव बॉम्बस्फोट तपासात घोटाळा झाल्यामुळे या सात आरोपींना मोकळीक मिळाली. आमच्या देशात कधी कसले घोटाळे उघडकीस येतील याचा आता अजिबात भरवसा नाही. बोफोर्स, शेअर घोटाळा, कॉमनवेल्थ घोटाळा, टू जी स्पेक्ट्रम घोटाळा, आदर्श घोटाळा तसा हा मालेगाव बॉम्बस्फोट तपास घोटाळा म्हणायला हरकत नाही. या सात आरोपींना मालेगाव स्फोटप्रकरणी पाच वर्षांपूर्वी अटक झाली. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक, सी.बी.आय. वगैरेंनी तपास करून चांगले भरभक्कम पुरावे गोळा करून या आरोपींना अटक केली, पण त्यांच्या अटकेनंतर पाच वर्षांनी हा तपास नव्याने स्थापन झालेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने केला व या सर्व आरोपींविरुद्ध कोणताही पुरावा नसल्याने त्यांना आता सोडून दिले. मधल्या काळात मालेगाव स्फोटांचा तपास हेमंत करकरे यांनी सुरू केला व मालेगावच्या स्फोटात हिंदू संघटनांचा हात असल्याचे पुरावे समोर आणून साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहित, स्वामी दयानंद, मेजर रमेशचंद्र उपाध्याय अशा मंडळींना अटक केली व सनसनाटी निर्माण केली. स्वामी असीमानंद नावाचे पात्रदेखील या तपास घोटाळ्यात येऊन गेले. परिणामी हिंदूंच्याच हिंदुस्थानात ‘हिंदूं’ना दहशतवादी ठरविण्यात आले व
हिंदूद्वेष्ट्यांच्या हाती आयतेच कोलीत सापडले. मालेगावचा स्फोट हिंदू संघटनांनीच घडवून आणला हे सिद्ध
करण्यासाठी हेमंत करकरे यांनी प्रचंड श्रम तेव्हा घेतले होते व त्याबद्दल अनेक मुस्लिम संघटना, कॉंग्रेस पुढारी यांच्या कौतुकास ते पात्र ठरले. आताही मालेगाव स्फोटांतील सुटलेल्या सर्व आरोपींनी हेमंत करकरे यांचे आभार मानून शुक्रगुजारी केली आहे, पण ही शुक्रगुजारी पाहण्यासाठी दुर्दैवाने करकरे हयात नाहीत. इस्लामी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात ते शहीद झाले व हा हल्ला इस्लामी दहशतवाद्यांनी नव्हे तर हिंदू अतिरेक्यांनी केल्याचा स्फोट दिग्विजय सिंगसारख्या करकरे यांच्या दोस्तांनी केला. मालेगाव स्फोट तपास घोटाळ्याने हिंदूंची जितकी बदनामी झाली तितकी यापूर्वी कधीच झाली नसेल. मालेगाव स्फोटांचे खरे आरोपी हे मुसलमान नसून हिंदू आहेत हा प्रचार फक्त मुसलमानी मतांच्या लांगूलचालनासाठीच झाला व नव्या तपास घोटाळ्यात पकडलेले साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहित यांचा छळ करून त्या छळ कहाण्यांना वारेमाप प्रसिद्धी देणे हा एका राजकीय षडयंत्राचाच भाग नव्हे काय? यातून हिंदूंचे मनोधैर्य खच्ची व्हावे व मुसलमानी मतांंची बेगमी व्हावी हेच धोरण आहे. पहिल्या तपासात घोटाळा झाला. मग दुसर्या तपासात घोटाळा झालाच नसेल कशावरून? पण दुसर्या तपास घोटाळ्यात फसलेल्या हिंदूंना कोणीच वाचवणार नाही. कारण या देशात कायदे वाकवले जातात, घटना बदलली जाते व तपासात घोटाळे केले जातात ते फक्त मुसलमानांच्या लांगूलचालनासाठीच. याआधी १९९२ च्या मुंबई दंग्यांत काय हिंदू पोरांना अडकवून वर्षानुवर्षे सडवले नव्हते? खरे तर मुसलमानी दंगलखोरांनी आक्रमण केले व त्यांचा प्रतिकार हिंदू पोरांनी केला. तसा प्रतिकार शिवसैनिकांनी केला नसता तर मुंबईत हिंदूंचे सामुदायिक शिरकाणच झाले असते. मात्र
स्वसंरक्षण करणार्या निरपराध हिंदू पोरांना उचलून सरळ खोटे गुन्हे दाखल केले गेले. अगदी टाडा, पोटा, मोक्का,
३०२ पासून ३०७ कलमांपर्यंत सर्व ‘फास’ आवळून पोरांना वधस्तंभावर चढवलेच ना? पण एकही कॉंग्रेजी मायका लाल हिंदूंच्या बचावासाठी पुढे आला नाही. मालेगावातील पोरांचे भाग्य मुंबईतील हिंदू पोरांना लाभले नाही. हिंदू अल्पसंख्याक नाहीत हाच त्यांचा दोष, दुसरे काय? मालेगावातील पोरे निर्दोष असतील तर त्यांच्या सुटकेचे आम्ही खुल्या दिलाने स्वागत करतो, पण ९ पैकी ७ जण सुटले. कारण उरलेलेे दोन जण मुंबई रेल्वे बॉम्बस्फोटातील आरोपी आहेत. आता रेल्वेतील स्फोटही हिंदू अतिरेक्यंानी घडवल्याचे जाहीर करून या दोघांनाही सोडले तरी आश्चर्य वाटायला नको. सोनिया गांधींचे तर आभार या पोरांना मानावेच लागतील. तिकडे अफझल गुरूही सोनियांचेच आभार मानतो व कसाबही दातात अडकलेली बिर्याणीची शिते चघळत सोनियांचेच आभार मानीत असेल. शेवटी हेच या देशाचे प्राक्तन आहे. कोणतीही निर्दोष व्यक्ती तुरुंगात सडत राहू नये असे आम्हालाही वाटते. मग ती कोणत्याही जाती-धर्माची, पंथाची असो. पण हे निर्दोषत्व हिंदूंच्या बाबतीतही सिद्ध व्हावे म्हणून ना कधी सोनिया गांधी प्रयत्न करतील ना महाराष्ट्राच्या खुर्च्या उबवणारे राज्यकर्ते. हिंदूंनी फक्त प्रायश्चित्त घ्यायचे. संयमाचे प्राणवायू घेत जगत राहायचे, सहिष्णुतेचे धडे गिरवायचे. साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहितसारख्यांनी पोलिसी छळ पत्करून रडत राहायचे व स्वत:च्याच हिंदुस्थानात ‘अतिरेकी’ म्हणून बदनामीस तोंड द्यायचे. कारण निधर्मीवाद मजबूत करण्याची जबाबदारी हिंदूंचीच आहे ना. बॉम्बस्फोटातील सुटलेल्या आरोपींची मालेगावात जंगी मिरवणूक निघाली. आता एखादा विजयी मेळावा घेऊन सोनिया गांधी व पृथ्वीराज चव्हाणांनाही बोलवा. म्हणजे कार्य सिद्धीस जाईल व ‘याचसाठी केला होता अट्टहास’ या धोरणावर सरकारचा हिरवा चांदतारा फडकेल.
No comments:
Post a Comment