Total Pageviews

Saturday 5 November 2011

VERY POOR POLICING GOA POLICE

प्रतिमा सुधारा NAVPRABHA

गोव्याचा पर्यटन हंगाम सुरू झालेला असल्याने लक्षावधी पर्यटकांची पावले आता गोव्याकडे वळत आहेत. या पार्श्वभूमीवर बागा - कळंगूट येथे पर्यटक विद्यार्थ्यांना पोलिसांनीच लुटण्याचा जो काही प्रकार घडला, तो गोव्याची आणि आपल्या पोलीस दलाची नाचक्की करणारा आहे. पोलिसांकडून यापूर्वी सरेआम अमली पदार्थांची विक्री झाली, अधिकार्‍यांची ड्रग माफियांशी हातमिळवणी उजेडात आली, पकडलेल्या तरुणीवर पोलीस स्थानकात लैंगिक अत्याचार झाले, असहाय्य विवाहितेवर बलात्कार झाला, अजून पोलीस दलाची अब्रू वेशीवर टांगणारे काय काय प्रकार करायचे बाकी आहेत? हे सगळे एवढे सातत्याने घडते आहे की अनुशासन नावाचा प्रकार राज्याच्या पोलीस दलात अस्तित्वातच नाही की काय असा प्रश्न पडतो. गृहमंत्री रवी नाईक हे मुख्यमंत्री असताना गुन्हेगारांचे कर्दनकाळ ठरले होते. गुंडपुंडांच्या संघटना मोडीत काढून, बड्या गुन्हेगारांना ‘आत’ टाकून, मवाल्यांचे केस भादरून पोलीस दलाचा एक दरारा राज्यात निर्माण करण्यात त्यांना यश आले होते याची आठवण आजही गोव्याची जनता काढते.
परंतु सध्या गृहमंत्री पदावर असूनही ते एवढे निष्प्रभ का आहेत? पोलीस हा जनतेचा संरक्षक आहे आणि तो जनतेचा मित्र असला पाहिजे, परंतु जनतेशी मैत्री करण्यापेक्षा तो अलीकडे दुष्प्रवृत्तींचाच पाठीराखा बनत चालला आहे की काय असा प्रश्न पडावा इतपत सातत्याने त्याची बदनामी करणार्‍या घटना कानी पडत असताना गृहमंत्र्यांचे एवढे मौन चिंताजनक आहे. जे काही बागा - कळंगुटमध्ये घडले तो काही अशा प्रकारचा पहिलाच प्रकार नव्हे. गोव्यात येणार्‍या परराज्यांतील वाहनचालकांना आणि पर्यटकांना पोलीस आणि वाहतूक पोलीस सर्रास लुटत असतात ही तक्रार तशी नेहमीची आहे. मात्र, बहुतेक वेळा अशा प्रकरणांत पुरावा मागे राहात नाही. क्षुल्लक कारणाने कायद्याच्या कचाट्यात सापडण्यापेक्षा चिरीमिरी देऊन सुटका करून घेण्याकडेच बहुतेकांचा कल असतो. त्याचा पुरेपूर फायदा अशा प्रकरणांत घेतला जातो. सुदैवाने नेहमीच्या सराईतपणे विद्यार्थ्यांच्या गटाला अडवून लुटमार करणार्‍या वर्दीतल्या टोळक्याला त्यापैकी एका विद्यार्थ्याच्या पालकाने वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांपर्यंत प्रकरण पोहोचवून दणका दिला आणि दोघा शिपायांना निलंबित करण्यावाचून अधिकार्‍यांना पर्याय उरला नाही. येथे येणार्‍या लक्षावधी पर्यटकांपैकी कितीजणांना आजवर असे लुटले गेले कोणास ठाऊक! वाहतूक पोलीसही अशा खंडणीखोरीत कमी नाहीत. परराज्याची क्रमांकपट्टी लावलेले एखादे वाहन दिसले की अडवायचे हेच काम पणजी आणि इतर प्रमुख शहरांतील वाहतूक पोलीस करीत असताना दिसतात. बाकी सर्वसामान्य वाहनचालकांना वेठीस धरणारी प्रचंड वाहतूक कोंडी, बेशिस्तीने उभी केली जाणारी वाहने, चारचाकी पार्किंगमध्ये उभ्या केल्या जाणार्‍या दुचाक्या, पार्किंग विभागात वाहन सरळ उभे करण्याऐवजी मुद्दामहून वाकडे उभे करून इतर वाहनांची जागा अडवण्याचे सर्रास दिसणारे प्रकार या सार्‍यांकडे पूर्णपणे कानाडोळा केला जातो. त्यामुळेच आज पणजीसारख्या शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली दिसते आहे. वाहतूक पोलीस असोत वा पोलीस असोत, अनेक चांगली माणसे त्या खात्यांतही असतील. प्रामाणिकपणे आजवर सेवा बजावीत आलेली असतील, परंतु बागासारख्या घटनांमधून त्यांचीही छबी कलंकित होत असते. वास्तविक, अनेक गुंतागुंतीची प्रकरणे पोलिस अधिकार्‍यांनी अत्यंत कसोशीने आणि हुशारीने सोडवली आहेत, गुन्हेगारांना गजांआड केले आहे. अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या वर्दीतल्या लुटारूंमुळे संपूर्ण पोलीस दलच बदनाम होते आहे. पोलीस दलाची प्रतिमा राज्यात खालावत चालली आहे, ती सुधारण्याच्या दिशेने काही प्रयत्न होणार आहेत की नाही? निलंबनाचे तोंडदेखले फार्स केल्याने मूळ प्रश्न सुटत नाही. ढासळलेले अनुशासन पुन्हा प्रस्थापित करण्याकडे अधिकार्‍यांनी सर्वप्रथम लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. चित्रपट बघून कोणी ‘सिंघम’ होत नसतो. वर्दीत असताना कोणताही गैरप्रकार करण्याची कोणाचीही टाप होता कामा नये असा दरारा निर्माण झाला पाहिजे. पोलीस दलाची खालावत गेलेली ही प्रतिमा गुंडपुंडांना उद्या रान मोकळे करून सोडील

No comments:

Post a Comment