माजी आयएएस अधिकाऱ्याला खाण गैरव्यवहारप्रकरणी अटक
सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, November 14, 2011 AT 03:30 AM (IST)
हैदराबाद - कर्नाटकातील खाणसम्राट आणि भाजपचे नेते गली जनार्दन रेड्डी यांच्या ओबुलापुरम कंपनीला (ओएमसी) आंध्र प्रदेशात खाण व्यवसायास परवानगी देताना झुकते माप दिल्याप्रकरणी माजी "आयएएस' अधिकारी व्ही. डी. राजगोपाल यांना "सीबीआय'ने आज अटक केली. राजगोपाल राज्याच्या खाण विभागाचे माजी संचालक आहेत.
खाण गैरव्यवहारप्रकरणी राजगोपाल यांना "सीबीआय'ने शुक्रवारी (ता. 11) ताब्यात घेतले. काल दिवसभर त्यांची चौकशी करण्यात आली होती. "सीबीआय'ने आज त्यांना अटक केली. त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात वाय. एस. राजशेखर रेड्डी यांचे सरकार असताना राजगोपाल यांनी "ओएमसी' कंपनीला खाण व्यवसायासाठी नियम धाब्यावर बसवून "रेड कार्पेट' सुविधा उपलब्ध करून दिल्या. यामुळे राज्य सरकारचे मोठे नुकसान झाले.
राजगोपाल यांच्याकडे "सीबीआय' दोन महिन्यांपासून चौकशी करीत होते. ते 2005 ते 2010 या काळात खाण विभागाचे संचालक होते. याशिवाय पेन्ना सिमेंटच्या "लाइम स्टोन माईन्स'ला वाय. एस. जगनमोहन यांच्या माध्यम कंपनीत गुंतवणूक करण्यास भाग पाडण्यातही राजगोपाल यांनी महत्त्वाची भूमिका पाडल्याचा आरोप आहे. गेल्या महिन्यात "सीबीआय'ने त्यांच्यासंदर्भात काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली होती. "ओएमसी' खाण गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयने यापूर्वी माजी मंत्री गली जनार्दन रेड्डी तसेच त्यांचा मेहुणा आणि "ओएमसी'चा व्यवस्थापकीय संचालक बी. व्ही. श्रीनिवास यांना अटक केलेली आहे
No comments:
Post a Comment